रक्तचंदनाची सुरक्षितता ऐरणीवर
वनविभागाच्या रखवालीतील रक्तचंदनाची सुरक्षितता ऐरणीवर
छापा मारून पकडलेले रक्तचंदन गायब झाल्याने खळबळ
चाकण वन विभागाच्या याच इमारतीतून २६ लाख ४८ हजारांचे रक्तचंदन लांबविण्यात आले |
चाकण :
तीन आठवड्यापूर्वी चाकण मध्ये छापा मारून ताब्यात घेण्यात आलेले लाखो रुपयांचे रक्तचंदन वनविभागाच्या रखवालीमधून लांबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्या नंतर या मागे ज्या रॅकेटने हा रक्तचंदनाचा साठा येथील गोदामात ठेवला होता , त्यांचाच हात असण्याची शक्यता वन विभाग आणि पोलीस वर्तुळातून वर्तविली जात आहे. मात्र वनविभागाच्या बंद खोलीचा दरवाजा तोडून केलेल्या या धाडसी चोरीने याच ठिकाणी अन्य खोल्यांमध्ये दोन वर्षांपासून ठेवण्यात आलेल्या आणखी रक्तचंदन साठ्याची सुरक्षितता धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बाबतचे वृत्त असे कि, वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी कल्याण नामदेव साबळे यांनी चाकण पोलिसांत सोमवारी (दि. २९) दिलेल्या फिर्यादी नुसार तब्बल २६ लाख ४८ हजारांचे रक्तचंदन वन विभागाच्या चाकण येथील बंद खोलीचा पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून लांबविण्यात आले आहे. आंध्रप्रादेशातून चाकण भागात आलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेला सुमारे साडेसहा टन वजनाचा निर्यातबंदी असलेला रक्तचंदनाचा आणखी एक मोठा अवैध साठा खराबवाडी (ता.खेड ,जि.पुणे ) येथील मधुकरशेठ सातव इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स मधील मोठ्या गोदामात १ सप्टेंबर २०१४ रोजी मिळून आला होता . साबणाचे बॉक्स ठेवण्यासाठी सुरजकुमार पाल (रा.सांताक्रूझ नवी मुंबई) याने भाड्याने घेतलेल्या या गोदामात साबणाच्या बॉक्स मागे हे इतक्या मोठ्या प्रमाणावरील रक्तचंदन लपविल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली होती . वन विभागाने या प्रकरणी भारतीय वन अधीनियम १९२७ कलम ४१ व ४२ नुसार त्याचप्रमाणे महाराष्ट्र वन अधिनियम कलम ६६ अन्वये विना पासिंग वाहतूक ,बेकायदा साठा केल्या प्रकरणी रेंज गुन्हा नंबर ओ ३ / २०१४ /१५ असा गुन्हा दाखल केला होता. हा रक्तचंदनाचा संपूर्ण साठा पोलिसांनी वनविभागाच्या ताब्यात दिला होता. तेंव्हा पासून हा संपूर्ण साठा वन विभागाच्या चाकण येथील कार्यालयातील वनरक्षक बंद खोलीत ठेवण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाला संबधित रक्तचंदनाचा साठा जप्त केल्याचा अहवाल देण्यात आला व पुढील तपास वन विभागाकडून करण्यात येत होता. याच्या तपासाला गती मिळण्यापूर्वीच वनसंरक्षक खोलीत ठेवण्यात आलेला हा रक्तचंदनाचा साठा अक्षरशः वाहनात भरून गायब करण्यात आल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. या धक्कादायक घटनेने वन विभागासह पोलिसांची अक्षरशः झोप उडाली असून खराबवाडी येथील गोदामात ज्यांनी हे रक्तचंदन आणून ठेवले होते त्यांनीच हा साठा गायब केल्याची शक्यता पोलीस आणि वन विभागाकडून वर्तविली जात आहे. दरम्यान वन विभागाची पनवेल भागात रक्तचंदनाची गोदामे असून जप्त करण्यात आलेला साठा तेथे पाठवून सुरक्षित का ठेवण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमके गौडबंगाल काय ?
औषधांसह उत्तेजक गोळ्यांमध्ये वापरले जाणारे रक्तचंदन कर्नाटकच्या जंगलातून जेएनपीटीद्वारे परदेशात पोहोचत आहे. रक्तचंदनाच्या तस्करीचे कनेक्शन नवी मुंबईत असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र हे रक्तचंदन नवी मुंबईत सुरक्षित पाठविण्यापूर्वी मुंबई पासून जवळ असलेल्या चाकण परिसरातील गोदामांमध्ये ठेवून योग्य वेळी बाहेर काढण्यात येत असल्याची बाब येथील खराबवाडी, वाकीतील गोदामांमधील कारवाई ,त्यापूर्वी खेड तालुक्यात अपघातग्रस्त झाल्यानंतर बेवासर स्थितीत आढळलेला संपूर्ण रक्तचंदनाचा ट्रक अशा मोठ्या कारवायांमुळे स्पष्ट झाली आहे. कर्नाटकमध्ये रक्तचंदनाची अनेक दुर्मिळ वने आहेत. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या मृत्यूनंतरही चंदनाची तस्करी बिनबोभाट सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. रक्तचंदनाची झाडे यंत्राने कापून ओंडके कंटेनरमध्ये भरून हे रक्तचंदन परदेशात जाण्यासाठी जेएनपीटीमध्ये पोहोचविले जाते. त्यापूर्वी ते चाकणसारख्या मुंबई पासून तुलनेने जवळ असलेल्या भागात आडबाजूंच्या गोदामांमध्ये ठेवून नंतर पुढे पाठविले जात आहे . चाकण ते मुंबई दरम्यान पोलीस प्रशासनातील काही मंडळीसाठी रक्तचंदनाची वाहतूक म्हणजे दुभती म्हैस झाली होती. पुणे ग्रामीण पोलीस दलातील एलसीबीच्या तत्कालीन अधिकाऱ्यासह तीन कर्मचार्यांची यातीलच कोट्यावधींच्या मलिद्या प्रकरणी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदन तस्करांनी या भागात धुमाकूळ घातला आहे. या मागे असलेल्या तस्करीची पाळेमुळे खोद्ण्याची गरज निर्माण झाली आहे. चंदन तस्करीच्या या गोरख धंद्यात या प्रशासनातील व राजकीय क्षेत्राशी संबंधित काही मंडळी गुंतली असल्याची व व्यक्त होत आहे. छापा मारून पकडलेल्या साठयावरही पुन्हा डल्ला मारला जाण्याच्या या धक्कादायक प्रकाराच्या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून या घटनेमागच्या नेमक्या गौडबंगालचा उकल होणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------------------------ --------
अविनाश दुधवडे,चाकण 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा