राजगुरुनगरला मतमोजणी केंद्रा बाहेर अभूतपूर्व जल्लोष...
राजगुरुनगरला मतमोजणी केंद्रा बाहेर अभूतपूर्व जल्लोष...
क्रीडा संकुल परिसराला छावणीचे स्वरूप ; प्रचंड घोषणाबाजी
चाकण:
गेल्या पंधरवड्यात प्रचाराने थकलेले कार्यकर्ते, गेल्या दोन दिवसांपासून त्यांची ताणलेली उत्सुकता, कोण विजय होणार ? कोण पडणार ? याने रंगलेल्या चर्चेची जागा आज (दि.१९) जल्लोषाने घेतली. साडेआठ वाजले पासून उमेदवारांची निर्णायक आघाडी बाहेर समजू लागली आणि मतमोजणी केंद्राबरोबरच गावागावांत गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीबरोबरच कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला एकच उधाण आले. सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामीण भाग वाद्यवृंदाच्या दणदणाटात जागा राहिला. खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार सुरेशभाऊ गोरे विजयी झाल्याने मिरवणुकांनी अनेक गावांनी अभूतपूर्व जल्लोष अनुभवला.
१५ ऑक्टोंबरला मतदान झाले होते. आज मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे राजगुरुनगर (क्रीडा संकुल येथे ) सकाळी आठ वाजता सुरु झाली. गावागावांतील टोकाची ईर्षा, सत्ता ताब्यात घेण्यासाठी नेत्यांत सुरू असलेली चढाओढ, पराभव समोर दिसू लागल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पैशाचे खुलेआम वाटप झाल्याची चर्चा , भेटवस्तूंवर झालेली लाखोंची उधळण , काळूस आणि कडूस मध्ये झालेले प्रचंड संघर्ष आदी कारणांनी ही निवडणूक विशेष गाजली. त्यामुळे निकालाविषयीही गावागावांत प्रचंड उत्सुकता होती. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाली. काही वेळातच एका पाठोपाठ एक फेऱ्या पूर्ण होऊ लागल्याने तालुक्याच्या विविध भागातील सुरेशभाऊ गोरे यांची आघाडी आणि दिलीप मोहिते यांच्या पिछाडीचे निकाल हाती पडू लागले. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांच्या एकाच जल्लोष सुरू झाल्याचे चित्र राजगुरुनगर येथील क्रीडा संकुलाच्या परिसरात पहावयास मिळत होते, क्रीडा संकुलाच्या बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. सकाळपासूनच निवडणुकीची मतमोजणी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली. येथील क्रिडा संकुलाच्या परिसरात पुणे ग्रामीण पोलीस व बीएसएफचे शसस्त्र जवान यांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता,त्यामुळे या संपूर्ण परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
प्रत्येक फेरीत वाढणाऱ्या शिवसेनेच्या मतांच्या आघाडीमुळे राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये कमालीची धाकधूक होती. शिवसेनेच्या मतांच्या आघाडीचा तणाव उमेदवार दिलीप मोहिते व त्यांच्या येथील प्रतिनिधींच्याही चेहर्यावरही जाणवत होता. सकाळी अकरा पर्यत पंधराव्या फेरी अखेर शिवसेनेचे उमेदवार सुरेशभाऊ गोरे यांनी २५ हजारांच्या पुढे निर्णायक आघाडी घेतली आणि मतदारांनी काय कौल दिला आहे, हे स्पष्ट झाले. जसजसा मतमोजणीच्या फेरीचा निकाल घोषित होत होता तशी पिछाडीवर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते व भाजपचे शरद बुट्टे या उमेदवारांची व प्रतिनिधींची अस्वस्थता स्पष्ट पणे पहावयास मिळत होती. निकालाचे चित्र स्पष्ट होताच येथेच थांबणे दिलीप मोहिते यांनी कठीण झाले व 'लोकांना विकास नको आहे'... एवढीच प्रतिकिया पत्रकारांना देत सकाळी आकरा वाजनेचे सुमारास मतमोजणी ठिकाणाहून आपल्या वाहनात बसून त्यांनी निघून जाणेच पसंत केले. शेवटच्या अठराव्या फेरी अखेर गोरेनी १ लाख ३ हजार २०७ मतांसह राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांच्यावर ३२ हजार ७११ मतांची आघाडी घेत मोठा विजय संपादन केल्याचा निकाल जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षांचे कुणीही मतमोजणी केंदावर उपस्थित नसल्याची चर्चा येथे रंगली होती.
क्रीडा संकुलाच्या बाहेर तोबा गर्दी:
सकाळी निवडणूक मतमोजणी अतिशय तणावाच्या वातावरणात सुरु झाली. सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते चाहते हजारोच्या संखेने निकालाची वाट पाहत होते. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपलाच उमेदवार निवडून येण्याची खात्री होती. विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांची हॅट्रिक होणारच असल्याचा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता ,तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडून काढून सुरेशभाऊ गोरे यांच्या विजयाने पहिल्यांदाच खेड तालुक्यावर भगवा फडकणार असल्याचा विश्वास सेनेच्या कार्यकर्त्यांना होता. त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच येथे प्रत्येक फेरी नंतरचा निकाल ऐकण्यासाठी तोबा गर्दी केली होती. मात्र दिलीप मोहिते यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या नायफड- वाशेरे भागातून पहिल्याच फेरीत शिवसेनेचे गोरे यांनीच आघाडी घेतल्याने काय निकाल लागणार हे स्पष्ट झाले होते.
कोण आला रे कोण आला:
खेड आळंदी विधानसभा मतदार संघात मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार सुरेशभाऊ गोरे यांनाच कौल दिल्याचे स्पष्ट होताच खासदार शिवाजीराव आढळराव , राजगुरुनगरचे माजी सरपंच अतुल देशमुख , शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू जवळेकर,तालुकाप्रमुख गणेश सांडभोर, विजयाताई शिंदे, अमृता गुरव आदींसह प्रमुख पदाधिकारी मतमोजणी ठिकाणी (क्रीडासंकुलात) आले. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त घोषणाबाजी करीत सर्वांचे स्वागत केले. त्या नंतर सर्वात शेवटी याठिकाणी विजयी उमेदवार सुरेशभाऊ गोरे यांचे आगमन होताच प्रचंड घोषणाबाजीने हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हजारो कार्यकर्त्यांनी गोरे यांचे आगमन होताच ‘कोण आला रे कोण आला’ ..... ‘शिवसेनेचे वाघ आला’ ... अशा गगनभेदी घोषणांनी सुरेशभाऊ गोरे यांचे स्वागत केले.
------------
अविनाश दुधवडे,चाकण 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा