खेड तालुक्यात आता 'रामराज्य' सरू झाले ; आमदार गोरे
चाकण मध्ये विजयी सभा
चाकण:
खेड तालुक्यातील 'रावणराज' संपून आता खऱ्या अर्थाने 'रामराज्य' सुरु झाले आहे , माझ्या विजयामुळे तालुक्यातील सर्व सामान्य माणसाला आता आपल्याच भूमीत मोकळा श्वास घेता येईल असा विश्वास देत यापुढे आमदार हा राज्यकर्ता नव्हे तर जनसेवक असतो हे मी माझ्या कृतीतून तालुक्याला पटवून देईन असे प्रतिपादन खेडचे नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी चाकण (ता.खेड) येथे केले.
शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या विजयामुळे त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या चाकण पंचक्रोशीतील सामान्य नागरिक ,शेतकरी, व्यापारी, कार्यकर्ते आदींनी रविवारी (दि.१९) रात्री उशिरा पर्यंत येथे त्यांच्या विजयी मिरवणुकीच्या स्वागतासाठी तोबा गर्दी केली होती. चाकणच्या महात्मा फुले चौकात हजारो चाकणकर नागरिकांच्या समोर पुढे बोलताना आमदार गोरे म्हणाले कि, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शब्द बारामतीप्रमाणेच एकमेव खेड तालुक्याने कधीही पडू दिला नाही . त्यामुळे येथे नेहमीच पवारांच्या विचारांचा आमदार निवडून गेल्याचा मागील अनेक वर्षांचा इतिहास आहे. आम्हीही खेड तालुक्याच्या आमदारांना बदला असा विचार त्यावेळी राष्ट्रवादी पक्षापुढे मांडला मात्र पक्ष बदल करीत नसल्याचे लक्षात येताच आम्ही बदलण्याचा निर्णय घेतला. आणि खेड तालुक्याच्या जनतेने त्याचे उत्स्फूर्त स्वागत केल्याचे मोठ्या मताधिक्क्याने स्पष्ट झाले. आणि तालुक्यातील राष्ट्रवादी व कॉंग्रेसची मक्तेदारी संपुष्टात आली. माझ्या साठी तालुक्यातील अनेक जणांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली, शिवसेनेतील अनेक इच्छुकांनी माझ्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला त्या सर्वाचा ऋणी आहे. आता कुणावरही खोट्या केसेस होणार नाहीत, कुणालाही सत्तेचा दुरुपयोग करून त्रास दिला जाणार नाही, असे आश्वासन यावेळी गोरे यांनी दिले व तालुक्याच्या मानगुटीवर बसलेले भूत तुम्हीच उतरविले असून तमाम जनतेचा मी ऋणी असे अशा शब्दात आभार मानले. यावेळी , शिवसेनेच्या विजयाताई शिंदे , काळूराम कड, रामदास जाधव,लक्ष्मण जाधव ,प्रकाश वाडेकर, आदींनीही विचार व्यक्त केले. यावेळी राजगुरुनगर बँकेचे संचालक अशोक भुजबळ, विजयसिंह शिंदे ,चंदन मुऱ्हे , बाजारसमितीचे संचालक बाळासाहेब गोरे, चाकण पतसंस्थेचे माजी अध्यक्ष नितीन गोरे, सुरेश कांडगे, चाकणचे माजी सरपंच नंदकुमार गोरे,काळूराम गोरे, अभिमन्यू शेलार ,दत्तराज वाफगावकर, अरुण शेवकरी, प्रकाश भुजबळ ,अशोक जाधव, रामदास जाधव, संतोष जाधव, राहुल गोतारणे, संतोष साळुंके, प्रमोद बनकर, पांडुरंग गोरे, राजेंद्र गोरे, आदींसह विविध गावाचे सरपंच उपसरपंच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
दरम्यान राजगुरुनगर नंतर आळंदी परिसरात मतदारांचे आभार मानण्यासाठी विजयी मिरवणुकीत असलेले सुरेशभाऊ गोरे चाकण मध्ये रात्री उशिरा येणार असतानाही दुपारपासून रात्री उशिरा पर्यंत चाकणकर नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्साह जैसे थे असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. रात्री दहाचे सुमारास चाकण मध्ये आलेल्या आमदार गोरेंचे स्वागत करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर आले होते. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजीही करण्यात आली.
आता माझी सटकली...:
खेड तालुक्यातील कुठल्याही गावातील आणि वाडी-वस्ती वरील कोणत्याही नागरिकाकडे डोळे वाकडे करून बघाल तर याद राखा आता तुमचा दहशतवाद खपवून घेणार नाही, 'आता माझी सटकली'.... असा जबरदस्त इशारा नूतन आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी राष्ट्रवादीच्या मावळत्या आमदारांना दिला. इतके दिवस मी राष्ट्रवादीत होतो आता शिवसेनेत आहे हे लक्षात ठेवा आणि ज्या सत्तेच्या जोरावर तुम्ही उन्मत्त झाला होतात ती सत्ताही जनतेने तुमच्या कडून काढून टाकली आहे. त्यामुळे चुकूनही कुणाला धमकावले गोरगरिबांना त्रास दिला तर माझ्याशी गाठ आहे असा इशाराच यावेळी दिला.
------------------------------ --
अविनाश दुधवडे,चाकण , ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा