औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरीचा शिरकाव
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरीचा
शिरकाव
काम द्या किंवा मिटींगला बसा ; पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी
औद्योगिक क्षेत्रातील चित्र
पुणे :
राज्यभरातील मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या, राजकीय नेत्यांशी संबंधित असणार्या माथाडी संघटनांनी चाकण औद्योगिक
क्षेत्रात आपल्या कारवाया गतिमान केल्या आहेत. 'आमची माथाडी कारखान्यात
सुरु करा, अन्यथा हप्ते द्या' अशा थेट धमक्या ऐन निवडणुकांच्या
धामधुमीत औद्योगिक भागात देण्यात असल्याच्या तक्रारी होत आहेत. प्रशासनापासून
गुंड व अनेक बड्या राजकारण्यांचे अर्थपूर्ण पाठबळ असल्याने अशा मंडळींच्या वाटेला जाण्यापेक्षा
मोठ्या आर्थिक तडजोडी करून ही प्रकरणे दडविली जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती असून
आपल्या विरोधात धाडसाने पुढे येवून कोणीही तक्रार करीत नसल्याची खात्री झाल्याने या
गुंडांची हिम्मत चांगलीच वाढली आहे. मागील पंधरवड्यापासून चाकण औद्योगिक क्षेत्रातील
काही ठराविक कारखान्यांमध्ये तथाकथित संघटनांचे प्रतिनिधी दादागिरी करीत आमची माथाडी
संघटना घ्या किंवा मिटींगला बसा असे कंपन्यांच्या गेटवर धमकावीत असल्याच्या तक्रारी
समोर आल्या आहेत.
वाहन उद्योगाची पंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या
चाकण एमआयडीसीला निरनिराळ्या समस्यांसह अशांततेचे ग्रहण लागले. ठराविक माथाडी संघटनांच्या उपद्रवाने अद्यापही पाठ
सोडली नसल्याची तक्रार वारंवार होत आहे. विविध
संघटनांच्या नावाखाली कंपन्यांमध्ये हे दादा लोक प्रवेश करतात. काही संघटना पहिल्यांदा कामगारांना माथाडींना ताब्यात घेतात. नंतर त्यांच्या माध्यमातून कंपनी
मालकांना जेवणाचे ठेके, आमच्याच माणसांना कामावर
घ्या, आम्ही म्हणतो तशी वेतनवाढ
द्या, या कामगारांना काढा, त्यांना घ्या, अशा प्रकारची दमबाजी करतात. जे उद्योजक हे ऐकत नसतील त्यांना
आंदोलन करू, तुमची कंपनी मोडून-तोडून टाकू, तुम्हाला येथून पळवून लावू, अशा धमक्याही देतात.
त्यामुळे या प्रकारांनी कंपनी मालक व्यवस्थापकच नव्हेत तर कामगारवर्गही अजूनही धास्तावलेलेच
आहेत . दादागिरी विरुद्ध कोणी 'ब्र' ही काढायला तयार नाही. औद्योगिक क्षेत्रात या राजकीय पाठबळावरील
तथाकथित गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असलेल्या तालुका व जिल्ह्याबाहेरील नावांची दहशत
आहे. यातील काही नावे ऐकली की अनेक व्यवस्थापक
,उद्योजकांना एवढेच काय कामगार वर्गालाही घाम फुटतो.यातील अनेकांना
राजकीयपाठबळ असल्याने कोणाचेही भय, भीती नाही. निर्ढावलेले
हे खादीतील जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यातील
नेत्यांच्या नावाने धमकावून 'वसुली' करीत आहेत.जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे
भागीदारीतील ठेके ,क्रेन ,वाहने चालू आहेत .या सर्व बाबी सिद्ध
करणे अवघड असल्याने या बाबतचा अनुभव भयानक असल्याने उद्योजक आणि त्यांचे प्रतिनिधी निर्भीडपणे काहीही
पुढे येवून सांगण्यास तयार होत नाहीत. संबंधितांशी भाई मंडळींशी पंगा घेतला किंवा तक्रार
केली की काय घडते याचे अनेक थरारक भोग अनेकांनी भोगले आहेत. पर्यायाने या तथाकथित संघटनांच्या
गुंडांचे चांगलेच फावले आहे. राज्यातील काही बडे राजकारणी आणि प्रशासनाच्याच सहकार्याने
सहमतीने या बाबी घडत असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. यात काही कारखानदारही मागे
नाहीत त्यांनीही अधिकाधिक बलशाली गुंड ठेकेदारीच्या माध्यमातून आपल्या पदरी ठेवल्याचेही
विपर्यस्त चित्रही येथेच पहावयास मिळत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात वावरणारी काही मंडळी
राजकारणात मोठा दबदबा ठेवून आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासन
त्यांच्या डोळ्यात डोळा घालण्याचे धारिष्ट्य दाखवीत नाही. गुन्हे करणाऱ्या संघटीत टोळ्यांना अंत झाला आहे
असे कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या प्रशासनकडून ठाम पणे सांगण्यात येत असले तर मग त्याच
टोळ्यांच्या नावांचा वापर करून निरनिराळ्या घटनांत औद्योगिक भागात उद्योजकांपासून कामगारांना
धमकावणारे आणि खुले आम खंडणीच्या ऑफर देणारे आहेत तरी कोण ? हा प्रश्न मात्र निरुत्तरच राहतो.
------------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा