दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री हवा आहे का?
दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री हवा आहे का?
उद्धव ठाकरे यांचा सवाल ...
शिवसेनेची चाकणला विराट सभा
चाकण (ता.खेड,जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना उद्धव ठाकरे (छायाचित्र :अविनाश दुधवडे,चाकण)
|
चाकण:वार्ताहर -
शहेन शहा असो की बाद शहा, दिल्लीपुढे मान झुकविणार नाही हा शिवरायांचा बाणा, महाराष्ट्र झुकेल तो फक्त शिवराय , जिजाऊ आणि जनते समोर , केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे हे बोलण्यासाठी ठीक आहे. दिल्ली हमारी, राज्यातही आम्हीच. अरे तुमचा मुख्यमंत्री कोण? कोण आहे तुमच्याकडे चेहरा ? दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री तुम्हाला हवा आहे का ? असा परखड सवाल उपस्थित करीत राज्यात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चाकण येथे विराट जाहीर सभेत व्यक्त केला.
खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ चाकण (ता.खेड,जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात आज (दि.९ ) आयोजित विशाल जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि भाजपाच्या सर्वच नेत्यांवर टीकास्त्र सोडले व दिल्लीत आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे, या ‘भाजप विचाराची’ त्यांनी जबरदस्त खिल्ली उडविली. पुढे बोलताना ते म्हणाले कि,दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असावे, हा विचार बोलण्यासाठी ठीक आहे. देशभरात मोदी लाटेची भरती आली होती आम्हीही लोकसभा निवडणुकीत मोदींसाठी मते मागितली होती याचा त्यांना आता विसर पडला आहे . महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी दुष्ट मनसुबे रचले जात आहेत शिवसेनेची राज्यात सत्ता आल्यानंतर अखंड महाराष्ट्र ठेवूनच विदर्भाचा विकास केला जाईल. महाराष्ट्राचे तुकडे पडणार नाहीत असे पंतप्रधान सांगतात लगेच त्यांचेच नेते वेगळ्या विदर्भाची घोषणा करतात. मात्र कुठल्याही स्थितीत महाराष्ट्राचे तुकडे पडू न देता शिवसेनेची एक हाती सत्ता आणून राज्याचा विकास करू , शिवरायांनी घडवलेला, जोजवलेला अखंड महाराष्ट्र तोडण्याचे कपटकारस्थान सुरू आहे. स्वराज्यावर चालून येणार्या, शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे पाडायला निघालेल्या शत्रूंशी संघर्ष झाला तरी बेहत्तर, पण शिवसेना महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असा जबरदस्त एल्गार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करताच 'कोण आला रे कोण आला .. शिवसेनेचा वाघ आला' ... ‘जय भवानी, जय शिवाजी’चा प्रचंड गजर चाकण मध्ये विराट सभास्थळी घुमला. मुंडे - महाजन कुटुंबांशी आमचे नाते टिकून आहे. त्यामुळेच पंकजा, प्रीतम यांच्या पाठीशी भाऊ म्हणून मी खंबीर उभा आहे. या बहिणींच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नाही. पंकजा, प्रीतम निवडून आल्याच पाहिजेत, पण आजूबाजूला धनुष्यबाण चालला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी खेडच्या विद्यमान आमदारांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला व खेड तालुक्यातील दहशत वाद संपविण्यासाठी सामन्यांचा चेहरा असलेल्या गोरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. उमेदवार सुरेशभाऊ गोरे यांनी यावेळी खेड तालुक्यात परिवर्तन घडणार असून तालुक्यातील सगळी जेष्ठ व तरुण मंडळी आणि तमाम जनता येथील दहशतवादाला संपविणार आहे. जनतेने कौल दिल्यानंतर त्याचा जनतेला माझ्याकडून कदापीही त्रास होणार नाही, लोकांच्या विकासाची कामे होतील आणि चुकूनही पैशांची लालसा ठेवणार नाही असे उमेदवार गोरे यांनी सांगताच तमाम जनतेने गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर ,खासदार शिवाजीराव आढळराव, यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेश जवळेकर,राजगुरुनगरचे माजी सरपंच अतुल देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, उपजिल्हाप्रमख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख अॅड.गणेश सांडभोर, विजया शिंदे, युवा सेनेच्या अॅड. अमृता गुरव ,प्रकाश वाडेकर, माजी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाण, प्रीतम शिंदे, पांडुरंग गोरे, अजित बुट्टे, चंदन मुऱ्हे, काळूराम गोरे, रामदास जाधव, दत्ता कंद, शेखर पिंगळे,यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर तालुकाप्रमुख अॅड.गणेश सांडभोर यांनी आभार मानले.
चाकण (ता.खेड) येथील विराट जाहीर सभेत बोलताना शिवसेनेचे उमेदवार सुरेशभाऊ गोरे व उपस्थित प्रचंड जनसमुदाय |
रामदास ठाकूर यांच्यासह अनेकांचे सेनेत प्रवेश :
खेड पंचायत समिती व बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी आपल्या तमाम
समर्थक कार्यकर्त्यांसह यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने सुरेशभाऊ गोरे यांचे मताधिक्य आणखी वाढणार असल्याची चर्चा या जाहीर सभेत जमलेल्या नागरिकांमध्ये होत होती. खराबवाडीच्या उपसरपंच व तालुका कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षा नंदाताई कड,मनसेचे योगेश आगरकर, व विविध गावाचे सरपंच उपसरपंच यांनी यावेळी सेनेत प्रवेश केले. तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी राजेश जवळेकर, अतुल देशमुख, रामदास ठाकूर , रामशेठ गावडे यांच्यासह अनेकांनी तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी घेतलेल्या एकत्रित भूमिकेचे यावेळी जोरदार स्वागत केले. या सभेला तालुक्याच्या सर्वच भागातून मोठ्या प्रमाणावर आलेल्या विराट जनसागराने आणि परिवर्तन घडणारच असल्याचा विश्वास अनेकांनी यावेळी व्यक्त केला.
-----------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा