चाकणच्या समावेशाबाबत स्पष्ट अभिप्राय पाठवा
चाकणच्या समावेशाबाबत स्पष्ट अभिप्राय पाठवा
शासनाचे पिंपरी चिंचवड मनपाला पत्र
'होय किंवा नाही' अशा स्पष्ट अभिप्रायाची मागणी
मनपाच्या महासभेत ठराव पारित न झाल्याकडे वेधले लक्ष
चाकण:
पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून मनपा हद्दवाढीबाबतच्या प्रस्तावात चाकण हे गाव मनपा हद्दीत समविष्ट केलेले नसल्याने चाकण हे गाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करणे शक्य नसल्याचे कळविल्या नंतरही राज्य शासनाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना नुकतेच पत्र पाठवून चाकण या गावाचा मनपा हद्दीत समावेश करणे किंवा स्वतंत्र चाकण नगरपरिषद स्थापन करणे या बाबत 'होय किंवा नाही' अशा स्पष्ट स्वरुपात अभिप्राय पाठवावेत अशा सूचना केल्या आहेत. दरम्यान चाकणच्या निर्णयाचा ठराव महासभेत पारित झाला नसल्यानेच या बाबतची अंतिम कार्यवाही पूर्ण झाली असे म्हणता येणार नसल्याचे राज्य शासनाने पिंपरी चिंचवड मनपाला कळविले आहे.
त्यामुळे चाकणचा समावेश पिंपरी चिंचवड महापालिकेत न होता त्यांच्या महासभेत या बाबतचा ठराव कधी पारित होतो याकडे चाकणकरांचे लक्ष लागले आहे. या बाबतचे वृत्त असे कि, मागीलवर्षी (७ मे २०१३ रोजी) राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित झाला झाल्यानंतर देहू, आळंदी, चाकण,हिंजवडीसह २० गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याबाबतचा अभिप्राय शासनाने मागवला होता. त्यानंतर खेड तालुक्यातील चिंबळी, कुरुळी,मोई, निघोजे, आदी गावे पिंपरी महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत तीव्र विरोधाची भूमिका चाकण सह संबंधित गावांनी नोंदवली होती. या बाबत अडीच महिन्यांपूर्वी ( १० जुलै २०१४) पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून (पत्र क्र. नरवी /कावी /१०/जनरल/७१५/२०१४) मनपा हद्दवाढीबाबतच्या प्रस्तावात चाकण हे गाव मनपा हद्दीत समविष्ट केलेले नसल्याने चाकण हे गाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करणे शक्य नसल्याचे पत्राद्वारे कळविले होते , त्यामुळे खेड तालुक्यातील अन्य प्रस्तावित गावांवरील टांगती तलवार कायम राहिली मात्र चाकणचा समावेश पिंपरी चिंचवड मनपा मध्ये करण्याचा प्रश्न निकाली लागल्याने चाकणकरांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता. मात्र त्या नंतर खेड तालुक्यातील केवळ राजगुरुनगर येथेच नगरपरिषद लागू झाली. चाकणचा प्रस्ताव आधीचा असूनही चाकणसाठी स्वतंत्र नगरपालिकेचा विषय राज्य शासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळे थंड बस्त्यातच पडला होता. त्या नंतर १६ सप्टेंबर २०१४ रोजी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पत्र (पत्र क्रमांक- एमयुपी/ २०१२/प्र.क्र.६६/पुन--२२/नवि १९ ) पाठवून चाकणच्या निर्णयाचा अंतिम ठराव महासभेत पारित झाला नसल्यानेच या बाबतची अंतिम कार्यवाही पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही असे नमूद केले असून हद्दवाढीत अंतिमतः किती गावांचा समावेश आहे त्यामध्ये चाकण गावाचा समावेश आहे किंवा भविष्यात होणार आहे किंवा कसे ? चाकण या गावाचा मनपा हद्दीत समावेश करणे किंवा स्वतंत्र चाकण नगरपरिषद स्थापन करणे ? या बाबत 'होय किंवा नाही' अशा स्पष्ट स्वरुपात अभिप्राय पाठवावेत अशा सूचना केल्या आहेत.
म्हणून कार्यवाही अपूर्ण :
२० गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याबाबतचा अभिप्राय व सविस्तर अभ्यास अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाने मनपा आयुक्त व जिल्हाधिकार्यांना केली होती. त्यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समावेशास खेड तालुक्यातील गावांनी ठराव करून विरोध तीव्र दर्शविला होता. तरीही पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्याच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात चाकणचा समावेश पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही मात्र मनपा हद्दीच्या उत्तरेकडील आळंदी,चिंबळी, कुरुळी,मोई, निघोजे,देहू,विठ्ठलनगर, हि सात गावे आणि पश्चिमेकडील हिंजवडी,जांभे,माण,मारुंजी,नेरे ,गहुंजे, सांगवडे अशी एकूण १४ गावे मनपा मध्ये समाविष्ट करून घेण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असून मनपाच्या महासभेने सदर विषयावर अद्याप निर्णय ठराव पारित केलेला नाही त्याच प्रमाणे चाकणचा सद्यस्थितीत महानगर पालिका हद्दीत समाविष्ट करणेचा प्रस्ताव नसल्याचेही राज्य शासनाला पाठविलेल्या १९ एप्रिल २०१४ रोजी च्या अहवालात स्पष्ट केले होते . मात्र निर्णयाचा ठराव महासभेत पारित झाला नसल्यानेच या बाबतची अंतिम कार्यवाही पूर्ण झाली असे म्हणता येणार नसल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे.
------------------------------ -------
अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा