पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी...
पीक नियोजन कोलमडले ; पावसाच्या फक्त हुलकावण्या
शेतातील ढेकळे जशीच्या तशी
रासे (ता.खेड) शेतातील ढेकळं जशीच्या तशी असून या सर्वच भागात नांगरटीवर पावसाचे थेंब पडण्याची आस शेतकऱ्यांना लागली आहे. (छाया:अविनाश दुधवडे,चाकण) |
चाकण:वार्ताहर-
पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी...
शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी...
आकाशाकडे पाहून प्रत्येक शेतकरी व्याकूळ होऊन ही हाक घालतो आहे. दोन दिवसांपासून आकाशात ढग दाटून येत असले तरी ते पुन्हा पसार होत आहेत. पावसाचे आगमन लांबतच चालल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पीककर्ज काढून जमिनीची मशागत व बियाणे खरेदी करून बसलेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. नांगरटी झाल्या असून नांगरटीवर थेंब पडावेत, शेतातील ढेकळं विरघळावीत ही अपेक्षा जुलै सुरु झाला तरी अद्याप कायम आहे.
खरीप हंगामासाठी रोहिणी, मृग व आद्र्रा ही तिन्ही नक्षत्रे योग्य असतात. या काळात पिकांची लागवड झाल्यास पिके शेवटपर्यंत तग धरतात. रोगाला बळी पडत नाही. उत्पादनही चांगले येते, परिणामी उत्पादन खर्चही कमी होतो. मात्र, रोहिणी आणि मृग कोरडी गेली. पावसाचे हुलकावणी सत्र या भागात अद्यापही कायम असल्याने पुढेही शेतकऱ्यांचे स्वप्न भंगण्याच्या मार्गावर आहे. कमी-अधिक पर्जन्यमानावर, निसर्गाच्या लहरीपणावर हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांची घोर निराशा होत आहे. पावसाने ताण दिल्याने शेतीशी निगडित हजारो कुटुंबे हवालदिल झाली आहेत. शेतमजुरांची उपासमार, भूजल पातळी खालावत असल्याने पेयजलाची टंचाई तसेच चार्याअभावी पशूधनाचे हाल, पुढे दुधाची टंचाई आदी कितीतरी संकटांची रांग निर्माण होण्याची भीतीही आता व्यक्त होत आहे. पाऊस नसल्याने कीटकजन्माची आणि त्यावर अवलंबून असलेली पक्ष्यांच्या अन्नाची साखळी तुटण्याचा आणि पक्ष्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. चाकण परिसरातील आगरवाडी,पठारवाडी,राक्षेवाडी सह मेदनकरवाडी ,कडाचीवाडी,खराबवाडी, रासे ,भोसे, मोहितेवाडी,बहुळ ,साबळेवाडी ,कुरुळी,मोई, निघोजे,महाळुंगे,खालुंब्रे ,येलवाडी, वाकी,भाम, पश्चीम भागातील बिरदवडी ,आंबेठाण, वसुली, वराळे ,आदी भागांतील शेतकऱ्यांनी पेरण्या लांबत चालल्याने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
------------------------
Avinash Dudhawade ,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा