खेड बाजार समितीच्या सभापती पदी रामदास ठाकूर
खेड बाजार समितीच्या सभापती पदी रामदास ठाकूर
उपसभापतीपदी धारू गवारी
सभापती पदासाठी मतदान तर उपसभापतीपद बिनविरोध
चाकण :
मावळते सभापती विलास कातोरे तसेच उपसभापती कैलास गाळव यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती पद रिक्त झाल्याने नव्या निवडीसाठी आज (दि.१९) चाकण येथील उपबाजाराच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रामदास ठाकूर यांची सभापतीपदी तर धारू गवारी यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली . सभापतीपदासाठी ठाकूर यांच्यासह रामदास मेदनकर यांचाही अर्ज आल्याने गुप्त मतदान घेण्यात आले त्यात ठाकूर यांना १३ तर , मेदनकर यांना अवघी ५ मते मिळाली. उपसभापतीपदासाठी गवारी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
मावळते सभापती व उपसभापती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नवीन सभापती कोण होणार, यावरुन बाजार समितीमध्ये चर्चेला उधाण आले होते. आमदार दिलीप मोहिते यांच्या सुचनेनुसार सभापती पदाची माळ रामदास ठाकूर व उपसभापती पदाची माळ धारू कृष्णा गवारी यांच्या गळ्यात पडणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. त्या नुसारच आज येथे नवीन पदाधिकारी निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत सकाळी सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशन स्वीकारण्याच्या बारा ते सव्वाबारा वेळेत सभापती पदासाठी रामदास ठाकूर व रामदास मेदनकर यांचे तर उपसभापतीपदासाठी धारू गवारी यांचा एकमेव अर्ज आला होता. रामदास ठाकूर यांच्या अर्जावर माजी सभापती रमेश पवार यांची सूचक म्हणून तर मेदनकर यांच्या अर्जावर माजी सभापती हिरामण सातकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली होती. यावेळी बाजार समितीचे १८ संचालक उपस्थित होते. माघारीच्या वेळेत कुणीही माघार न घेतल्याने सभापती पदासाठी मतदान घेण्यात आले त्यात ठाकूर यांना १३ तर मेदनकर यांना ५ मते मिळाली . त्यामुळे सहायक निबंधक सहकारी संस्था व निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे यांनी सभपती पदी ठाकूर यांची तर उपसभापतिपदी गवारी यांची निवड झाल्याचे दुपारी साडेबारा वाजता जाहीर केले. त्यानंतर आमदार मोहिते समर्थक कार्यकर्ते व नूतन सभापती ठाकूर समर्थक कार्यकर्त्यांनी मार्केट यार्डाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला. नवीन सभापती -उपसभापतींचा भव्य नागरी विविध गावच्या ग्रामस्थांसह शेतकरी बांधवांकडून यावेळी करण्यात आला. नूतन सभापती ठाकूर व नूतन उपसभापती गवारी यांनी यावेळी बेलताना सांगितले कि, आमच्यावर आमदार मोहिते यांनी जी जबाबदारी टाकली आहे ती आम्ही समर्थपणे पार पाडून बाजार समितीचा कारभार व नावलौकीक अधिक वाढेल यासाठी प्रयत्न करू.
-------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा