इनरकोनची भीमाशंकर च्या समृद्ध जंगलावर कुऱ्हाड
प्रकल्पांमुळे शेतकरी आदिवासींच्या जीवन शैलीत बदल
*खेडच्या पश्चिम भागाचा होणार अभ्यास दौरा
---------------------------------------
'वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरे'..
असं सांगताना संतश्रेष्ठींनी आपलं जिव्हाळ्याचं नातं निसर्गसृष्टीशी जोडल मात्र आजकाल माणूस नावाच्या प्राण्याचे सगळया
प्राणीजगतावर आणि त्यांची वसतिस्थाने असलेल्या रानावनावर जोरदार आक्रमण सुरु आहे.वृक्षांचे जतन करण्याची गरज असताना भीमाशंकरसारख्या समृद्ध
जंगलावर कुऱ्हाड चालविली गेल्याचे सर्वश्रुत आहेच .या जंगलात इनरकॉन कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्पासाठी लाखो वृक्षांची कत्तल झाल्याचे प्रकरण मध्यंतरी खूप तापलेही होते.
मात्र तरीही तो प्रकल्प आता जवळपास पूर्ण झाला आहे.आता या बाबतचे साधक बाधक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ
यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमीं येथील वन्यजीव,पशुपक्षी ,पाण्याचे नैसर्गिक उदभव ,भूगर्भाची सद्य सखोल माहिती घेणार आहेत.
ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पूर्वीही येथे भेट दिली होती. त्या समितीने या बाबतचा अहवाल केन्द्रीय
पर्यावरण मंत्रालयाला मागील वर्षी सादरही केला होता.
भीमाशंकरच्या जंगलात झालेल्या त्या बेफाम वृक्षतोडीमुळे त्यावेळी येथील वातावरण तापले होते . आणि म्हणूनच ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गा़डगीळ यांच्या
अध्यक्षतेखालील ही समिती इथे आली होती. कंपनीकडून त्या वेळी काही हजार झुडपांची आम्ही तो़ड करतो आहोत असे सांगत काही लाख झाडं अगोदरच धारातीर्थी
केल्याचा तीव्र आक्षेप स्थानिक नागरिकांनी घेतला होता.
या समितीतील तज्ञांच्या माहितीनुसार, इनरकॉन प्रकल्पाला मंजुरी देताना इथे कोणत्याही मोठ्या वृक्षांची नोंद नसल्याचा आणि वन्य प्राण्याचे वास्तव्य
नसल्याचा दाखला वनखात्याने दिला होतां. मात्र या समितीने ज्यावेळी पाहणी केली तेव्हा मोठ्या घनतेचे वृक्ष तोडल्याचे दिसले. त्या तोडलेल्या झाडांचा
साठाही पहायला मिळाला होता .
इनरकॉन कंपनी खेड तालुक्यात 142 पवनचक्क्या उभारते आहे. यातल्या बहुतांश पवनचक्क्या आता उभ्या देखील राहिल्या आहेत. ह्या पवनचक्क्या
उभारण्याकरिता पर्वतरांगांवरच्या उंच ठिकाणी जाण्याकरिता झाडे तोडून प्रशस्त असे रस्ते बनविण्यात आले आहेत. 25 फुट रुंदी असणाऱ्या या रस्त्यांची
लांबी आहे 72 किलोमीटर.येथे एकदा उच्च न्यायालयाने या वृक्षतोडीला स्थागितीही दिली होती. स्थानिक नागरिकांच्या आक्रोशानंतरही बड्या राजकीय
दबावाने सगळी प्रशासने डोळ्यावर कातडी ओढून बसली आणि जंगलतोडीक़डे पाठ फिरवली गेली . आता खेड तालुक्याच्या पश्चिम भागासह वन्यजीव,पशुपक्षी ,
पाण्याचे नैसर्गिक उदभव ,भूगर्भाची याची सद्य सखोल माहिती ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमींच्या काही तुकड्या
घेणार आहेत.या प्रकल्पामुळे तेथील शेतकरी आदिवासी यांच्या एकूणच बदललेल्या जीवन शैलीचा अभ्यासही करण्यात येणार असून सत्यतेच्या मुळाशी जाऊ
पाहणाऱ्या या अभ्यास दौऱ्याबाबत कुठलाही गाजावाजा करण्यात आलेला नाही.
अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा