......अन् माया डोळस चा इनकाउंटर झाला


......अन् माया डोळस चा इनकाउंटर झाला
16 नोव्हेंबर 1991 ला अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या परिसरात अचानक पोलिसांच्या गाड्या घोंघावू लागल्या. काही साध्या गाड्यांमधूनही युनिफॉर्ममधल्या आणि साध्या वेषातल्या मंडळींचा वावर अनपेक्षितपणे वाढल्याचं पाहून रहिवासी काहीसे गांगरूनच गेले. त्यातच राज्य राखीव दलाचे पोलिस कमांडो यांना पाहून तर 'कुछ तो बडा लफडा है', अशी चर्चा बारिक आवाजात सुरू झाली. लोखंडवाला माकेर्ट आणि स्वामी समर्थ चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात या प्रकारची टेहळणी कशासाठी चालली आहे, हे कोणालाच कळेना. या धनिकांच्या वस्तीला या साऱ्याची कधीच सवय नसल्याने अनेक जणांनी फ्लॅटचे दरवाजे बंद केले. जे घराबाहेर होते, त्यांनी फोन करून घरातच बसून राहण्याच्या, आतून दार बंद करण्याच्या सूचना दिल्या. दुकानंही पटापट बंद होऊ लागली. एरवी संध्याकाळी इथलं माकेर्ट फुलून गेलेलं असतं. गाड्या अन्यत्र थांबवून पोलिस अधिकारी, शिपाई, कमांडोज वेगवेगळ्या मार्गाने एका बिल्डिंगच्या दिशेनं चालू लागले. अतिशय सावधपणे. त्या बिल्डिंगचं नाव 'स्वाती'. आजही ती बिल्डिंग आहे. आत शिरताच त्यांना एक जीप आणि एक मारुती कार दिसली. एका गाडीचं रजिस्ट्रेशन गुजरातमधलं, तर दुसरीचं मध्य प्रदेशातलं. आपलं सावज इथेच आहे, याची पोलिसांना खात्री पटली. गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून त्या काळी ओळखले जाणारे ए. ए. खान यांनी अधिकाऱ्यांना, कमांडोजना त्यांच्या जागा आखून दिल्या. काय आणि कधी करायचं, ते सांगितलं. मी सांगितल्याशिवाय गोळीबार करायचा नाही, असा त्यांचा आदेश होता. पण दुसऱ्या बाजूने गोळीबार झाला तर... हा प्रश्न प्रत्येक अधिकाऱ्याला, शिपायाला आणि कमांडोला होता. अर्थात तसं भीतीचं कारण नव्हतं, कारण प्रत्येकाच्या अंगात बुलेटप्रुफ जॅकेट होतं. कारवाई करायची होती दुसऱ्या मजल्यावर. तिथेच माया डोळस आणि त्याचे साथीदार लपले आहेत, याची पक्की खबर होती. त्यांच्याकडे शस्त्रं आहेत, हेही माहीत होतं. पण नेमकी काय शस्त्रं आहेत, याचा अंदाज नव्हता. माया डोळस दाऊद इब्राहिमच्या टोळीतला कुख्यात गुन्हेगार. असंख्य हल्ले, कित्येक खून, कैक खंडण्या, दारूचे अड्डे, चोऱ्या अशा गुन्ह्यांची यादीच त्यावेळी त्याच्या नावावर होती. एका प्रकरणात त्याच वषीर् त्याला अटक झाली होती. एका केससाठी त्याला मुंबईत आणलं जात असताना माया डोळसने यशस्वी पलायन केलं होतं. तब्बल ९६ दिवस तो पोलिसांपासून लपून होता आणि माया डोळस याच बिल्डिंगमध्ये आहे आणि तिथूनच खंडणीसाठी धमक्या देत आहे, अशी माहिती हाती आली होती. एका बिल्डरने तशी तक्रारही केली होती. स्वाती बिल्डिंगचा ताबा घेताच पोलिसांनी सर्व रहिवाशांना घराचे दरवाजे बंद करून घेण्याच्या सूचना दिल्या. कोणाला फोनही करू नका, असं सांगितलं. मग मेगाफोनवरून ए. ए. खान यांनी माया डोळसला शरण येण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एका फ्लॅटमधून गोळीबार झाला. माया नेमका कुठे आहे, हे पोलिसांच्या लक्षात आलं. लगेच पोलिसांनी त्याप्रकारे फिल्डिंग लावली. कमांडोही पुढे सरसावले. गोळीबार करू नका, अशा सूचना होत्या आणि समोरून अंदाधुंद गोळीबार सुरू झाला होता. त्या आवाजातच 'हथियार नीचे डालके सरेंडर हो जाओ, हम तुम्हे नही मारेंगे' असं ए. ए. खान मेगाफोनवरून सांगत होते. आत शिरलेल्या कमांडोज आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या गेल्याचं लक्षात येताच खान आणि इन्स्पेक्टर जयसिंग पाटील यांनी मायाला दहा आकड्यांचा वेळ दिला. दहा म्हणून होईपर्यंत शरण न आल्यास आम्हाला सर्वांना आत शिरावं लागेल आणि मग काय होईल, ते सांगता येणार नाही, असा इशारा देण्यात आला. पण फ्लॅटमध्ये असलेला माया डोळस पोलिसांना शिव्या घालत होता. पोलिसांवर गोळ्या चालवण्याचे आदेश आपल्या साथीदारांना देत होता. एका क्षणी फ्लॅटच्या बाहेरून गोळ्या झाडल्या आहेत, हे लक्षात आल्यावर कमांडोज थेट गच्चीवर गेले आणि तिथून त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. ते खाली येत असल्याचं पाहून त्यांच्यावर जिन्यातून गोळ्या झाडल्या गेल्या. बुलेटप्रुफ जॅकेटमुळे ते बचावले. पण त्यांनी गोळ्या झाडणाऱ्या दोघांना ठार केलं. अखेर फ्लॅटचा दरवाजा तोडला. तो तोडताच माया डोळसने एके-४७ रायफल उगारली. पण तो गोळीबार सुरू करणार, इतक्यात पोलिसांच्या गोळ्या त्याच्या अंगात शिरल्या. लोखंडवाला शूटआऊटचा तो अंत होता. या शूटआऊटमध्ये माया डोळस, दिलीप कोहक ऊर्फ बुवा, अनिल पवार, राजू नाडकणीर्, गोपाळ पुजारी, विजय चकोर आणि अनिल खुबचंदानी असे सात जण ठार झाले. त्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये इन्स्पेक्टर एम. ए. कवी, सबइन्स्पेक्टर झुंजारराव वराळ, इक्बाल शेख, महेंद पिंपळकर, भानुदास बगेर् आणि के. के. पटनाईक असे सहा अधिकारी आणि हवालदार देसाई मरता मरता वाचले.असे सांगण्यात येत होते. वाचण्याचं कारण होतं अंगातलं बुलेटप्रुफ जॅकेट. आज माया डोळस हे नाव कित्येकांना माहीतही नसेल. पण तो कदाचित एकमेव गुन्हेगार असेल, वयाच्या पंचविसाव्या वर्षी या कोवळ्या गुन्हेगाराला ताब्यात घेण्यासाठी एवढा पोलिसफाटा कामाला लागला होता. तोही शस्त्रांनिशी आणि त्याचं कारण म्हणजे माया डोळस हा अतिशय क्रूर आहे आणि तो आपल्याला मारण्याचे प्रयत्न करेल, याची पोलिसांना खात्री होती. आज माया डोळस नाही. पण त्याची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा 'माया डोळस अमर रहे' अशा घोषणा देणारी मंडळी होती. ट्रकवरून अंत्ययात्रा निघाली. त्या शूटआऊटवर एक चित्रपट निघतो, यातच त्या प्रकरणाविषयी किती उत्सुकता असू शकते, हे कळतं. पुढे या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. त्यातील अधिकाऱ्यांना पोलिस अवॉर्ड मिळालंच नाही. त्या गुन्हेगारांकडील वस्तू, दागिने, पैसे गायब झाल्याच्याही तक्रारी झाल्या. दोन-तीन वर्षांनी ए. ए. खान यांनी निवृत्ती स्वीकारली. डोळस आणि त्याला खतम करणारे खान दोघंही विस्मरणात जात असताना शूटआउट लोखंडवाला चित्रपट आला होता. ...............अविनाश लक्ष्मण दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)