बैलगाडा शर्यतींना न्यायालयाचा अडथळा
'माझ्या मामाची रंगीत गाडी हो..
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो..
कशी दौडत दौडत येई हो..
मला आजोळी घेऊन जाई हो'...
गावा कडच्या यात्रा जत्रांमध्ये सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या बैलगाडा शर्यतींची आठवण करून देणारी ही कविता नोकरी व्यवसाया निमित्त शहरांमध्ये
वास्तव्यास असणाऱ्या मंडळींना गावाकडची ओढ लावत असली तरी यंदा मात्र गावाकडच्या यात्रांमध्ये भिर्र.. झाली उचल की टाक ..हा नेहमीचा
घाटातील सूर कानी पडणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. बैलगाडा शर्यत बंदीबाबत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये असा
फतवा पोलीस प्रशासनाने काढला असल्याने याभागातील बहुतांश गावातील यात्रा कमिट्यांनी बैलगाडा शर्यती रद्द केल्या आहेत.
सुमारे 100 मीटर लांबीची 10 मीटर रुंदीची चढण म्हणजे घाट त्या लगत बसलेले शर्यत शौकीन..
घाटाच्या सुरुवातीच्या टोकाला बांधलेला चौथरा त्यावर दाटीवाटीनं उभे सगळे गावचे कारभारी, मानकरी ..
लाऊडस्पीकरची गर्जना.. वाजंत्र्यांचा कडकडाट .. कारभारी, बलगाडय़ावाले शेतकरी, बल, गाडा सगळेच भंडार,
गुलालानं माखलेलं. एका वेगळ्याच उन्मादानं बेधुंद झालेला परिसर. फुरफुरणारी , तरणीबांड खिल्लार बैल जोड ही उमदी जनावरं
पाहण्यासाठी गर्दीची रेटारेटी ...शुभ्र पांढऱ्या रंगांची, टोकदार शिंगांची , काळ्याभोर डोळ्यांची, देखणी मुसमुसणारी खिल्लारं.
शिंगांना सोनेरी रंग, शेंब्या, गुलाबीरिबिनी आणि दृष्ट लागू नये म्हणून काजळाचं बोट.ग्राम दैवताच्या नावानं चांगभलंचा गजर आणि
कमीत कमी वेळात घाट पर करणारी खिल्लार बैलांची जोड हे नेहमीच यात्रा जात्रांमधील चित्र यंदा मात्र पहावयास मिळणारच नसल्याचे चित्र
यंदा पुन्हा लादण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत बंदीने निर्माण झाले आहे.
*पोलिसांचा फतवा
सध्या यात्रा जत्रांचा हंगाम असल्याने बहुतांश गावांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यात्रांच्या कार्यक्रम पत्रिकांमध्ये बैलगाडा शर्यतींचा
उल्लेखही करण्यात आला होता.मात्र पोलीस प्रशासनाने कधी नव्हे ती तत्परता दाखवीत सर्व गावांतील यात्रा कमिट्या आणि ग्रामपंचायतीला
नोटीसा बजावल्या असून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्याचे दम भरले आहेत.काही गावांमध्ये उत्साही आयोजकांनी
शर्यती भरविल्या नंतर पोलिशी कारवाई करण्यात आल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आणि बंदी असताना भरविण्यात येणाऱ्या शर्यती असे दोन वेगवेगळे गुन्हे शर्यती भरविणारया आयोजकांवर
दाखल करण्यात येणार आहेत.
*शेतकरी म्हणतात ...
शर्यतीसाठी बलांचा छळ होतो, या आरोपाला आणि बंदीला शेतकरी ठाम विरोध करतात. शर्यतीच्या बलांसाठी आम्ही अगदी घासातला घास
बाजूला काढून ठेवतो. शर्यतीच्या बलाला ऊनसुद्धा लागू देत नाही. त्याला शेतीच्या कामालाही जुंपत नाही. मग आम्ही त्याचा छळ करतो
असं कसं म्हणता असा सवाल बैलगाडा मालक उपस्थित करीत आहेत. शहरातली घोडय़ांची रेस तुम्हाला चालते, मग आमच्या कष्टाच्या
आयुष्यातला हा आनंद हिरावून घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? अशी रास्त प्रश्नांची अखंडित मालिका शेतकऱ्यांकडेही आहे.
--------------------------------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा