चाकण ग्रामपंचायत देणार वीज वितरणला झटका


चाकण ग्रामपंचायत देणार वीज वितरणला झटका
*वीज वितरण च्या विरोधात 9 मार्च पासून उपोषण
*पाणी पुरवठ्याला अखंडित वीज देण्याची मागणी

------------------------------

चाकण च्या सध्याच्या विस्कळीत पाणी पुरवठ्यासाठी वीज वितरणचा भोंगळ कारभार कारणीभूत असून पाणी पुरवठ्याच्या योजनेचा तांत्रिक बिघाडा नंतर खंडीत
होणारा वीज पुरवठा दुरुस्ती साठी तासंतास वेळ लागत आहे .त्या नंतर अधून मधून विजेने झटके दिल्यास पुन्हा वकी केटी बंधाऱ्यावरून पाणी पुरवठ्याच्या टाकीत पाणी
येण्यास सुमारे दोन तास लागत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होतो त्यामुळे चाकण ला पाणी पुरवठा होणाऱ्या वाकी केटी बंधाऱ्यात मुबलक पाणी साठा
उपलब्ध असतानाही पाण्याची बोंबाबोंब होत आहे.त्यामुळेच झोपेचे सोंग घेतलेल्या वीज वितरणाला जाग आणण्यासाठी चाकण ग्रामपंचायतीचे
कारभारी येत्या 9 मार्च पासून आमरण उपोषणास बसणार आहेत.याबाबत वीज वितरण कंपनीला पत्रही देण्यात आले आहे.

ढिम्म वीज वितरणच्या ढिल्या कारभारा मुळे विस्कळीत पाणी पुरवठ्याची समस्या गेल्या काही वर्षांपासून चाकण मध्ये अविरत पणे सुरु आहे.
चाकण मध्ये बऱ्याचदा नळांना एकही थेंब पाणी येत नसल्याने घरांतील उरले सुरले पाणीसाठेही पूर्णपणे संपुष्टात येत असून चाकण करांची
चांगलीच दैना होत आहे. वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने चाकणला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरता न आल्याने कित्येकदा पाणी पुरवठा होऊ शकत नाही
चाकण च्या पाणी पुरवठा योजने साठी अखंडित वीजपुरवठा करण्याची तजवीज चाकण ग्रामपंचायतीने व वीज वितरण कंपनीने करावी अशी जोरदार मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

चाकण शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने गेल्या काही वर्षापूर्वीच चाकण ची पाणीपुरवठा योजना एकीकडे कालबाह्य ठरलेली असताना आहे त्या पाणीपुरवठा
योजनेला अखंडीत वीज पुरवठा होत नसल्याने चाकण करांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.सद्यस्थिती मध्ये दरडोई दहा लिटर्स पाणी नागरिकांना पुरवणे
सुद्धा ग्रामपंचायतीला अशक्य होत असून चाकण ची सुसाट वेगाने वाढती लोकसंख्या पाहता पाणीपुरवठ्या साठी अखंडित वीजपुरवठ्या बरोबरच संपूर्ण पाणी पुरवठा
योजने बाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण करांसाठी कालबाह्य झालेल्या टाकी एवजी नवी पाण्याची
टाकी उभारण्या साठी पंचवीस लाख रुपयांचा निधी दिला , खेड चे आमदार दिलीप मोहिते यांनी 'चाकण औद्योगिक क्षेत्र व लागत ची 19 गावे पाणी पुरवठा
योजना 'योजना राबउन चाकण करांना दिलासा दिला असला तरी तहानलेल्या चाकण करांसाठी यापेक्षा अधिक प्रयत्न करण्याची सद्यस्थितीत तीव्र गरज निर्माण झाली आहे.
खासदारांनी कालबाह्य झालेल्या पाण्याच्या टाकी साठी निधी दिल्याचे स्वागत चाकण कारांकडून झाले आहेच मात्र या टाकी मध्ये पाणी येण्यासाठी वाकी केटी बंधाऱ्यावरून
आलेली जलवाहिनी सुद्धा नव्याने करण्याची गरज असून यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च आहे.या बाबत चाकण ग्रामपंचायतीचे सरपंच काळूराम गोरे व
उपसरपंच साजिद सिकीलकर यांनी सांगितले की,ज्या राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेने या भागा मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कारखानदारी आली व त्या मुळे सुसाट
वेगाने यथील लोकसंख्या वाढली त्यांना मात्र येथील समस्यांबाबत काहीही देणे घेणे नाही . मोठ्या शहरांपुढे कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या पायघड्या टाकणाऱ्या
शासनाला येथे सुसज्य पाणीपुरवठा योजना राबविणे शक्य होत नसल्या बाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.चाकण च्या औद्योगिक क्षेत्रातुन तीस हजार कोटी
रुपयांहून अधिक कररूपी निधी मिळविणाऱ्या शासनाने त्यातील काही हिस्सा येथे सोयी सुविधांसाठी खर्च करणे गरजेचे आहे.जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश गोरे
यांच्या माध्यमातून राज्य शासन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर येथील हे विपर्यस्त चित्र ठेवण्यात येणार असून येथील पाण्याच्या प्रश्न शक्य
तितक्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

*दुष्काळात तेरावा :

सध्याच्या कालबाह्य ठरलेल्या पाणी पुरवठा योजनेला वीज वितरण च्या असहकाराचे ग्रहण लागले असून सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत पाणी
पुरवठ्याच्या पथ्यावर पडत आहे.चाकणच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेला अखंडित वीज पुरवठा करण्या साठी एक्स्प्रेस फिडर व अन्य पर्यायांसाठी सुद्धा पंचवीस
ते तीस लाख खर्च आहे.त्यामुळे आहे त्याच योजनेला अखंडित वीज पुरवठा करावा अशी चाकण ग्रामपंचायतीची मागणी आहे.चाकण च्या सध्याच्या विस्कळीत
पाणी पुरवठ्यासाठी वीज वितरणचा भोंगळ कारभार कारणीभूत असून पाणी पुरवठ्याच्या योजनेचा तांत्रिक बिघाडा नंतर खंडीत
होणारा वीज पुरवठा दुरुस्ती साठी तासंतास वेळ लागत आहे .त्या नंतर अधून मधून विजेने झटके दिल्यास पुन्हा वकी केटी बंधाऱ्यावरून पाणी पुरवठ्याच्या टाकीत पाणी
येण्यास सुमारे तास भर लागत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होतो असा चाकण ग्रामपंचायतीचा आरोप आहे.ढिम्म वीज वितरणच्या ढिल्या कारभारा मुळे
ही समस्या गेल्या काही वर्षांपासून अविरत पणे सुरु आहे त्यामुळे वीज वितरण च्या विरोधात आमरण उपोषण येत्या 9 मार्च पासून सुरु करणार असल्याचे
सरपंच गोरे आणि उपसरपंच सिकीलकर यांनी सांगितले.

*खोडा घालतंय कोण?

भामा आसखेड धरणावरून करण्यात आलेली चाकण औद्योगिक क्षेत्र व लागत ची 19 गावे पाणी पुरवठा योजना चाकण डब्ल्यू एम डी सी पर्यंत आली असून
तेथे जलवाहिनीला जोडून पाणी घेण्यात येणार असल्याचे ही चाकण ग्रामपंचायती कडून सांगितले जात आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि चाकण
इंडस्ट्रीज असोशिएशन यांना अनेकदा पत्र व्यवहार करूनही त्यांच्या कडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले .त्यामुळे याकामी
नेमका अडसर काय आहे याचा शोध घेऊन हे पाणी चाकण करांसाठी कुठल्याही स्थितीत उपलब्ध करून देणारच असल्याचेही ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांनी
दैनिक पुढारीला सांगितले.या योजनेचे पाणी चाकण ला मिळाल्यास झीत्राईमळा ,दावडमळा,राणूबाईमळा ,आदी वरील भागातील पाणी पुरवठा सुरळीत होऊन
जुन्या जलवाहीनिवरील अतिरिक्त ताण कमी होऊन सर्वत्र नियमित व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होऊ शकेल अशी अपेक्षाही ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त
केली आहे.मात्र याबाबची अंमलबजावणी नेमकी केंव्हा होईल याकडे चाकण कर डोळे लाऊन बसले आहेत.
--------------------------------------------------------अविनाश दुधवडे ,९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)