पाण्यासारखा पैसा घालवून पाण्याचे नैसर्गिक प्रवाहच बंद
पाण्यासारखा पैसा घालवून पाण्याचे नैसर्गिक प्रवाहच बंद
पुणे नाशिक रस्त्यावरील वाकी जवळचा प्रकार
पुणे -नाशिक महामार्गावर वाकी( ता.खेड) जवळ ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद करून त्याजागी लहान पाईप टाकण्यात आले आहेत . (छायाचित्र :अविनाश दुधवडे,चाकण) |
चाकण:
वाकी(ता.खेड) येथे पुणे-नाशिक रस्त्याच्या खालून जाणारा मोठा ओढा आता पूर्णपणे बुजवण्याचा घाट घालण्यात आला आहे. पैसा पाण्यासारखा खर्च करून पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे. मोठ्या ओढ्यांना अटकाव करीत त्याजागी लहान पाईप टाकून पाणी वाहून जावे यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे. बड्या व्यावसायिक इमारतींचे इतके मोठे काम करताना संबंधिताना जलवहनशास्त्र (हायड्रॉलॉजी) लक्षात आले नाही का? आणि लक्षात आले असेल तर रस्त्याखालून जाणारे भले मोठे ओढे कुठे गेले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या बाबत लगतच्या भागातील शेतकर्यांनी सरकार -दरबारी दाद मागण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याची फारशी गांभीर्याने दाखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात शिंदेवाडी सारखी घटना या भागात घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित विकसक -बिल्डरांनी घायची कि प्रशासने घ्यायची हा प्रश्न सामान्य नागरिकांसाठी अनुत्तरीत आहे.
या भागाच्या पश्चिमेला शेती - टेकड्या असून त्यातून खाली येणारे नैसर्गिक ओढे अशी भूरचना आहे. हे ओढे रस्त्याच्या खालून पूर्व दिशेला वाहत येतात. पुणे नाशिक महामार्गावर वाकी (ता.खेड) जवळ काळोबा माथा ओलांडून राजगुरुनगर दिशेने जाताना काही ओढे निघतात. बारमाही विशेषतः पावसाळ्यात तेथून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहते. ते ओढय़ावाटे पुणे-नाशिक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाते. त्यावर लगतच्या भागात पूल आहे .सध्या येथून निघणाऱ्या ओढय़ांची स्थिती भयंकर आहे. तासभर पाऊस पडला तरी ओढे तुडुंब भारतात. हे पाणी रस्त्याखालून वाहून जाण्यासाठी मोठा ओढा व त्यावर मोठय़ा मोऱ्या (पूल) आहेत . त्यामुळे पाण्याला कधीच अडथळा आला नव्हता. आता बिल्डर विकसकांनी केलेल्या कामात ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाहच रोकण्यात आला असून त्याजागी लहान पाईप टाकून पाणी वाहून जावे यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे. मोऱ्या रस्त्याच्या पुढील (पुर्वेकडील) बाजूस अन्य मंडळीनी पूर्णपणे बुजवण्याचा घाट घातला आहे. रस्त्याच्या पश्चिमेला एके ठिकाणी पाणी जाण्यासाठी रस्त्याखालून तीन लहान पाईप टाकलेले आहेत. त्यात राडारोडा जाऊन बसला असून येथे पाणी तुंबले तर पाण्याला मार्गच नसल्याने ते वाट्टेल तिथे शिरण्याची धक्कादायक वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.
या भागात इतरही ओढे रस्ता बांधताना बंद वा बुजविण्यात आले आहेत . ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद करताना तिथले जलवहनशास्त्र विचारात न घेता नैसर्गिक ओढे कसे बुजवले, हा प्रश्न उपस्थित आहे. या बाबत सामान्य शेतकर्यांनी तक्रारी करूनही संबंधित बिल्डर -विकसक मंडळीना कारवाईच्या कात्रीत आणण्या एवजी मोकळे का सोडले गेले, असाही प्रश्न विचारला जात आहे.
...म्हणून प्रशासन हतबलत :
मोठे ओढे बुजवून असे पाईप आले आणि असलेले पूलही बुजत चालले आहेत. नैसर्गिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ओढ्यांचे पाणी जाण्याचे पूर्वीचे मार्ग बंद केले आहेत. अनेक वर्षांचे ओढे-नाले गडप करून बांधकामे झाल्याचेही उघड –उघड चित्र दिसत असतानाही या बाबत प्रशासन डोळ्यावर कातडे ओढण्याची भूमिका घेत आहे. या बाबतची अनियमितता दिसत असली तरी तक्रारी नसल्याने कारवाई कशी करणार असा यक्ष प्रश्न त्यांच्या समीरच उभा आहे. मात्र त्यातील खरी वस्तुस्थिती हि आहे कि,असले उद्योग करणारी मंडळी पैशांच्या जोरावर राजकारणात आणि गुन्हेगारीत मोठा दबदबा ठेवून आहेत, शिवाय संबंधित प्रशासनाशी त्यांचे अर्थपूर्ण संबंध आहेत त्यामुळे संबधित प्रशासनातील कुणीही त्यांच्या डोळ्यात डोळा घालण्याचे धारिष्ट्य दाखवीत नसल्याचा सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा आरोप आहे.
------------
अविनाश दुधवडे,चाकण, ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा