बिरदवडी गावात सात तास बिबट्याचा थरार....
बिरदवडी गावात सात तास बिबट्याचा थरार....
चवताळलेला बिबट्या पळून जाण्यात यशस्वी
वन विभागाच्या मर्यादा स्पष्ट......
चाकण: अविनाश दुधवडे
बिरदवडी (ता.खेड) गावात बुधवारी सकाळी नऊ सुमारास आलेल्या बिबट्या ने दुपारपर्यंत या भागात थरार केला. सुरुवातीला गावातील एका घरावर सुमारे तासभर मुक्काम ठोकलेल्या या बिबट्याने नंतर बिरदवडीजवळील झाडा झुडपांच्या ओढ्यात सात तास तळ ठोकला आहे. चवताळलेला हा बिबट्या या ओढ्यात दबा धरून बसला असून लगतच्या गावांमध्ये घबराट पसरली आहे . मोठमोठ्याने डरकाळ्या फोडणाऱ्या या बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा आणून सापळा लावण्याचा प्रयत्न केला असला तरीही बिबट्या अद्याप पर्यंत जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेले नसून परिसरातील नागरिकांचे लोंढेच्या लोंढे याभागात बिबट्याला पाहण्यासाठी आले आहेत. झाडा झुडपातून डरकाळ्या फोडणाऱ्या बिबट्याची दहशत या स्थानिक गावकरी आणि आलेल्या प्रत्येक बघ्यांच्या चेह-यावर दिसत होती. हा पूर्ण वाढ झालेला बलदंड बिबट्या सुमारे सहा फुट लांब असावा व कडूस (ता.खेड) येथे दोन दिवसांपूर्वी हाच बिबट्या आढळला असावा असा वन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे
दरम्यान सात तास दबा धरून बसलेला बिबट्या दुपारी तीनच्या सुमारास येथून पळाला. चवताळलेला बिबट्या पळाल्यामुळे त्याच्या शोधासाठी वन विभागाचे अधिकारी हातात जाळी,बांबू, बंदुका व भूल देण्याचे इंजेक्शन घेऊन फिरत होते. पळालेल्या बिबट्याने या भागातील दाट झाडीतच आश्रय घेतला असून, तो वन विभागाला सापडता सापडेना झाला आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि, खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील जंगलापासून भरकटलेले बलदंड बिबट्या आज सकाळी-सकाळी बिरदवडी (ता.खेड) च्या रस्त्यावरून रुबाबात चालत ला तेव्हा परिसरातील कुत्री भुंकू लागली आणि सर्व बिरदवडी जागी झाली. त्याआधी बिबट्याने रोह्कल गावात दहशत केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावात घुसलेल्या बिबट्याने येथील रहिवासी अरुण काळडोके यांच्या घरावर जाण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ जमा होऊ लागल्याने बिबट्याने स्वत:ला सावरत थेट घरावर झेप घेत तब्बल तासभर घरावर मुक्काम ठोकला , त्यानंतर ग्रामस्थांनी त्याला हुसकाविण्याचा प्रयत्न केल्याने बिबट्याने लगतच्या ओढ्याकडे आपला मोर्चा वळविला तिथे त्याला दगड्यांच्या कपारी आणि झुडपांचा आयताच लपण्यासाठी आधार मिळाला . बिबट्या या दाट झाडीच्या ओढ्यात घुसला आणि सुरू झाले थरारनाट्य...
बिबट्या बिरदवडीयेथील ओढ्यात घुसल्याची वार्ता पाहता-पाहता लगतच्या सर्व गावांमध्ये चाकण शहरातही पसरली. आसपासच्या वस्त्या ,वाड्या आणि गावातील गर्दीचे लोंढेच्या लोंढे या भागाकडे आले व बिरदवडी परिसराला जत्रेचे स्वरूप आले. शाळेत जाणारे विद्यार्थी,नोकरी-धंद्यावर निघालेली माणसे अन् ज्याला-ज्याला हि घटना समजली त्या सर्वांनी या भागाकडे धाव घेतली . पोलिस प्रशासन आणि वनविभागाला ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागले. येथे आलेल्या प्रत्येकाच्याच चेह-यावर बिबट्याची दहशत दिसत होती. तर दुसरीकडे बिबट्या एकदातरी दिसावा यासाठी अनेक जन अशा भितीतही येथे तळ ठोकून होते.
पोलिसांच्या येणा-या गाड्या, वन कर्मचा-यांनी आणलेला पिंजरा, खासदार वैगरे बड्या राजकारण्यांनी घटना स्थळाला दिलेली भेट अशा घडामोडींनी नागरिकांची उत्सुकता वाढतच होती. मात्र वन विभागाच्या फटाक्यांच्या मोठ्या अवजांसह विविध महत्प्रयत्नांनीसुद्धा हा बिबट्याकाही बाहेर खुल्या जागेत येत नव्हता. बिबट्या आढळून आल्यास त्याला जेरबंदकरण्यासाठी वनविभागाचे सुमारे २५ अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी सायंकाळ पर्यंत ठाण मांडून होते.
ग्रामस्थांची तीव्र नाराजी :
सकाळी नऊ वाजले पासून बिबट्याला दहशतीखाली असलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाला अपयश आले. दाट झुडपांमध्ये फटके फोडण्यात आले, मात्र चवताळलेला बिबट्या केवळ झुडपांमध्ये इकडून तिकडे डरकाळ्या फोडत पळताना पाहण्या पलीकडे वन विभाग काहीही करू शकला नाही. गावातून दहा वाजनेचे सुमारास या ओढ्यात शिरलेला बिबट्या तीन वाजेपर्यंत वन विभागाच्या हाती लागला नव्हता. बघ्यांची तुफान गर्दी ओढ्याच्या दुतर्फा वाढतच गेल्याने बिबट्या बाहेर पडू शकत नव्हता. अखेरीस तंटामुक्तीचे अध्यक्ष संदीप जाधव, व गावातील ग्रामस्थ बाळासाहेब मुळे,सचिन जाधव,साहेबराव चौधरी,साहेबराव काळडोके, पंढरीनाथ लांडे आदींनी वन विभागाच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त करीत हा बिबट्या या दाट झाडीमधून पुढे हुसकावून लावण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले ; तर रोह्कल गावातील ग्रामस्थांनी बिबट्या येण्याच्या याच संभाव्य मार्गावर पहारा ठेवला असून बिबट्या गावात शिरू न देण्याचा निर्धार केल्याचे समजते.
चाकण परिसरात वावर -
चाकण जवळ बिरदवडी परिसरात बिबट्या अवतरल्याने परिसरातील नागरिक पुन्हा एकदा हादरून गेले. याआधी दोन महिन्यापूर्वी शेलपिंपळगाव भागात बिबट्याने एका वासराचा अशाच पद्धतीने फडशा पडला होता. वासराचा फडशा पडणारा काही वर्षांपूर्वी रासे फाटा येथेही बलदंड बिबट्या मृतावस्थेत मिळून आला होता. वासराचा बळी घेणारा तो प्राणी बिबट्याच होता असे चाकण भागाचे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस.चिखले यांनी सांगितले. दरम्यान बिरदवडीमध्ये शिरलेला बिबट्या हा खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून भक्ष्याच्या मागे धावताना या भागात आला असावा व खेड तालुक्यातील कडूस येथे आढळून आलेला हाच बिबट्या असावा अशी शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व याठिकाणी पाचारण करण्यात आलेल्या रेस्क्यू टीम मधील अनिल खैरे यांनी वर्तविली आहे. दरम्यान हा बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यास वनविभागाला सूचित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा