राजकीय घडामोडींवर चर्चा रंगू लागल्या...
देवदत्त निकम |
चाकण: अविनाश दुधवडे
शिरूर लोकसभा मतदार संघात्तील राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होताच निवडणुकीबाबतच्या चर्चानी आता चांगलाच जोर पकडला असून एकाच तालुक्यातील दोन उमेदवार असल्याने राजकीय घडामोडींच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. पक्षीय पातळीवर बैठका, मेळावे, सभा घेऊन संपर्क वाढविला जात असतानाच ग्रामीण आणि शहरी भागातही निवडणुकीच्या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.
पक्षांतर्गत सत्तासंघर्ष , एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे राजकारण आणि बड्या नेत्यांमधील शहकाटशह यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली कोंडी व राज्यातील सत्तेची फळे चाखण्यातच रस असलेल्या आमदारांमुळे ' राष्ट्रवादी ' ला शिरूरमध्ये उमेदवार शोधण्याची करावी लागलेली कसरत शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिल्या नंतर संपुष्टात आली असली तरी निकम यांच्या उमेदवारीने खर्या अर्थाने लढाईला सुरुवात झाली आहे. मतदार संघातील सहा पैकी पाच आमदारांची ताकद आणि विकास कामे करूनही मतदार मात्र शिवसेनेला कौल लावीत असल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची हॅटट्रिक रोखून सलग तीनदा कुठलाही उमेदवार निवडून लोकसभेत न पाठविण्याची येथील परंपरा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी व्युव्हरचना आखण्यात येत आहे. गावपातळीवरही शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाह्या सावरू लागले असून विविध सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयात चर्चांचे फड आतापासूनच रंगू लागले असून पक्षाचे पदाधिकारी आपल्या पक्षाचे राजकीय डावपेच कसे यशस्वी होतील याचा उहापोह करू लागले आहेत.
ग्रामीण भागात शेतीची कामे आटोपून सायंकाळच्या वेळी ग्रामदेवतेच्या पारावर किंवा एखाद्याच्या ओटय़ावर बसून आगामी निवडणुकांचे आडाखे बांधले जात असून आपापल्या परीने अंदाज लावले जात आहेतच, पण विविध शासकीय कार्यालये पदाधिकाऱ्यांची कार्यालये येथेही निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी विविध इले. माध्यमांवर राजकीय तज्ज्ञांच्या जशा चर्चा रंगतात अगदी तशाच या चर्चा रंगत असल्याचे चित्र चक्क नुसत्या उमेदवार्या जाहीर झाल्या नंतरच पाहावयास मिळत आहे. ज्यांना राजकारणाशी देणे-घेणे नाही असेही या चर्चेत अगदी तज्ज्ञाच्या आविर्भावात सहभागी होताना दिसतात. एका कार्यालयात सुरु झालेल्या अशाच चर्चेत मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा दिग्गज उमेदवार असतानाही एक लाख ७८ हजारांची धूळ चारत खा. आढळराव यांनी दुसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश मिळवल्याचा दाखला देत चर्चा सुरु झाली . त्यात खुद्द राष्ट्रवादीचे काही कार्यकर्तेही विद्यमान खासदारांचा बैलगाडा मालक व शौकीनांशी कसा संपर्क आहे, २००४ साली निवडणूक लढविली असता खा.आढळराव यांना खेडचे तत्कालीन आ. स्व.नारायण पवार यांची मदत झाल्याने २० हजारांचे मताधिक्य घेत त्यांनी पहिली निवडणूक जिंकली व सगळ्याच पक्षातील मंडळी कसा त्यांचाच प्रचार करतात याचा आढावा घेवू लागले. त्यावर संतापलेल्या एका राष्ट्रवादी पदाधिकार्यांनेत्यांच्या शिवसेनेसह आमच्या राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष असलेल्या कॉंग्रेस मध्ये विधानसभेला मदतीचा हात दाखवून विद्यमान खासदारांना हे यश मिळत असल्याचे सांगत आता अजितदादांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक सगळ्यांना दम भरल्याचा आणि आपल्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी कडक शब्दात सुनावल्याचा गौप्यस्फोट केला. विविध शासकीय कार्यालयातील चहाच्या टपऱ्या, हॉटेल अशा सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींसोबतही राजकारणावर अशा अनेकचर्चा एकू येत आहेत. यात महिलाही आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यातून ग्रामीण महिलांमध्ये राजकीय जागृती झाल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. सध्याच्या थंडीतही अशी उबदार चर्चा विविध ठिकाणी रंगत असून चर्चांची ही उब लोकसभा निवडणुकांच्या निकालापर्यंत सर्वत्र अनुभवास येणार आहे.
--------------Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा