चाकण मध्ये आढळला चक्क सयामी जुळा सर्प
चाकण मध्ये आढळला चक्क सयामी जुळा सर्प
ट्रिंकेट जातीचा सर्प ; माने पासून पुढे दोन तोंडे
चाकण:
जन्मजात कमरेखालून अवयव जोडलेली सयामी जुळी बालके हा प्रकार आपल्यासाठी नविन नाही. मात्र चाकण परिसरात आज (दि. १९) चक्क सयामी सर्प आढळून आला आहे. या सर्पांचे अवयव एकमेकांत गुंतलेले असण्याचा प्रकार फार दुर्मीळ असून शेपटी पासून माने पर्यंतचा भाग एकमेकांना चिटकलेला असून पुढे दोन वेगवेगळी तोंडे एकाच दिशेला आहेत. असा विचित्र प्रकारचा सर्प पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडू लागली आहे. फ्रेंड्स ऑफ नेचरच्या सर्प मित्रांनी या विचित्र सयामी जुळ्या सर्पास वाचविण्याचा संकल्प केला आहे.
या बाबतचे वृत्त असे कि, आज सकाळी फ्रेंड्स ऑफ नेचरच्या कार्यकर्त्यांना कुरुळी(ता.खेड,जि.पुणे) येथील शेतात असा सर्प असल्याची माहिती मिळाल्या नंतर सर्पमित्र प्रा. बाप्पुसाहेब सोनवणे , श्रीकांत साळुंके, आसिफ सैयद आदींनी घटनास्थळी जावून पहिले असता असा दोन तोंडाचा सर्प त्यांना मिळून आला. संबंधित सर्प त्यांनी ताब्यात घेतला असून त्याला वाचविण्याचा संकल्प केला आहे. या बाबत प्रा.बाप्पुसाहेब सोनवणे यांनी सांगितले कि, संबंधित सर्प हा गुणसूत्र बदलल्याने असा जन्मास आला असण्याची शक्यता आहे. ट्रिंकेट (तस्कर) जातीच्या या सर्पाची लांबी सुमारे दोन फुट असून हा सर्प पूर्ण पणे बिनविषारी आहे. या सर्पास खाद्य म्हणून लहान पाली देण्यात येत आहेत. विचित्र प्रकारच्या या सयामी जुळ्या सर्पांना वेगळे करणे अशक्य असून त्यांना याच पद्धतीने तज्ञांच्या सल्ल्याने जागविण्यात येणार असल्याचे प्रा.सोनवणे यांनी सांगितले. कुठलाही सर्प दोन तोंडाचा नसतो. सर्पांच्या जातीतील मांडूळ हा सर्प दुतोंडी असल्याचा भ्रम निर्माण करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात त्याला दोन तोंडे नाहीत. शेत जमीन भुसभुशीत करणाऱ्या मांडूळ या सापाचे तोंड आणि शेपटाचा भाग सारखाच दिसतो. हा ' दुतोंडी ' साप जवळ बाळगल्यास धनलाभ होती अंधश्रध्दा गेल्या काही दिवसांपासून वेगाने पसरते आहे. काही तांत्रिक जादूटोण्यासाठी या सापाचा वापर करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तस्करी करणारी मंडळी ' डबल इंजिन ' या नावाने संबोधणाऱ्या मांडूळाच्या शेपटीला अगरबत्तीच्या आधारे भोक पाडून त्यात मेणाच्या आधारे दोन डोळे तयार करून हा साप दुतोंडी असल्याचा भ्रम निर्माण करतात. प्रत्यक्षात सर्पाला दोन तोंडे नसतात. मात्र चाकण मध्ये आढळलेला हा दोन तोंडाचा ट्रिंकेट जातीचा साप अतिशय दुर्मिळ असून त्याला प्रत्यक्षात दोन तोंडे आहेत. अंधश्रद्धेतून चुकीच्या मंडळींच्या ताब्यात जावून या सर्पाचा बळी जावू नये म्हणून तातडीने हा सर्प वन विभागाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आला असून त्याला वाचविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचरचे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत असेही प्रा.सोनावणे यांनी सांगितले.
---------------
फोटो मेल करीत आहे.
फोटो ओळ: चाकण (ता.खेड) जवळ आढळलेला दोन तोंडाचा सयामी जुळा सर्प (छाया:अविनाश दुधवडे,चाकण) ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा