निवडणुकीत सोशल मिडीयाचा होणार वारेमाप वापर ...
लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा होणार वारेमाप वापर ...
चाकण: अविनाश दुधवडे
यंदाच्या लोकसभा निवडणुक रणधुमाळीत पारंपारिक प्रचार यंत्रणेबरोबरच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या यंत्रणांनी हायटेक यंत्रणेचा वापर करीत इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा आधार घेतला आहे . उमेदवारी निश्चित झाल्यानंतर व निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्या नंतर या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अप्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात केली आहे . प्रत्यक्षात उमेदवारी दाखल झाल्या नंतर या प्रचाराला अधिकृतपणा येणार आहे . मात्र मतदार संघाचा मोठा पसारा व तुलनेने कालावधी अत्यंत अपुरा असल्याने अमेदवारांनी प्रत्यक्ष भेटी बरोबरच तांत्रिक साधनांची मदत आत्ता पासूनच घेतली असून, फेसबुक,ट्विटर, व्हॉट्स ऍप, मोबाईल मॅसेजिंग तसेच ब्लॉगिंग या माध्यमातून सोशल मीडियाचा वारेमाप वापर सुरु झाला आहे.
२००९ च्या निवडणुकीच्या वेळेसही इंटरनेट होते. मात्र, सोशल मीडिया तितकासा प्रभावी नव्हता. यंदाच्या निवडणुकीत मोबाईलच्या माध्यमातून हातोहाती पोहचलेल्या सोशल मिडियाला प्रचंड महत्व आले आहे. या पूर्वीच्या निवडणुकीपर्यंत मुद्रित आणि दृक्श्राव्य वृत्तवाहिन्या याच माध्यमांची निवडणुकींच्या डावपेचांच्या आखणीत चलती असायची. मात्र,२०१४ ची निवडणूक अनेक अर्थांनी ‘वेगळी’ ठरणार ती या निवडणुकीच्या काळात होणाऱ्या ‘सोशल मीडिया’ चा वारेमाप वापराने. २००९ मध्ये मतदारांना बल्क एस . एम . एस,रेकोर्डेड व्हाईस कॉल पाठविण्यावर भर दिला जात असे . आता मात्र फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ऍप, मोबाईल मॅसेजिंग तसेच ब्लॉगिंग यामुळे सोशल मीडिया हा अधिक चर्चित आणि प्रभावी मीडिया ठरला आहे. निवडणुका म्हणजे मोठा इव्हेंट असल्याने उमेदवारांच्या प्रचारासाठी व संपर्कासाठी विविध इव्हेंट आयोजित करण्यापासून सर्व प्रकारच्या तांत्रिक सुविधा या कंपन्या पुरवीत आहेत . ग्रामीण भागातही मध्ये अशा अनेक कंपन्या कार्यरत झाल्या असून सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत . मतदार याद्यांचे वर्गीकरण करणे , मतदारांना हवे असलेले मतदार क्रमांक , मतदान केंद्र याचा तपशील घरघरात पोहचविणे . बल्क एस . एम . एस ., व्हाईस एस . एम . एस . पाठविणे , कॉल सेंटर कार्यान्वित करुन वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रभागातील व्यक्तींशी संपर्क साधणे , उमेदवारांनी रोज किती ठिकाणी भेटी द्यायच्या ते ठरविणे , गर्दीच्या जागा शोधून उमेदवारांना मतदारांपर्यत पोहचविणे . छोट्या डॉक्युमेंटरी तयार करुन सोशल मिडीयावर प्रसारित करणे , अशा प्रकाची कामे केली जात आहेत. त्यामुळेच उमेदवार चक्क छोट्या व्हिडीओ क्लिप्सच्या माध्यमातून ढोल-नगारे वाजविताना ते चक्क घाटात उड्या मारताना दिसून येत आहेत. आजच्या स्थितीत बहुतांश लोकांपर्यंत मोबाईल आणि इंटरनेट पोहोचलेले आहे. याचा सर्वात जास्त वापर हा युवावर्ग करताहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून युवावर्ग आपल्या मागे ताकतीने उभा रहावा यासाठी विविध उमेदवार आणि त्यांच्या पक्षांचे प्रयत्न आहेत. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदान निर्णायक ठरणार असल्याने, सर्वच राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार व कार्यकर्ते, यांच्या कडून सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.
Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा