१५ फुट खोल ओढ्यात कोसळली वॅगनआर कार ;तीन ठार ;दोघे जखमी
प्रीतम बोऱ्हाडे |
पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात
तीन ठार ;दोघे जखमी
१५ फुट खोल ओढ्यात कोसळली वॅगनआर कार
वळणाचा अंदाज न आल्याने अपघात
चाकण:
पुणे नाशिक महामार्गावर शुक्रवारी (दि.२१) रात्री सव्वा अकरा वाजता रोहकलफाट्याजवळ वाकी(ता.खेड,जि.पुणे) गावाच्या हद्दीतील ओढ्याच्या पुलावरून संरक्षक कठड्याला धडकून वॅगनआर कार ही थेट पंधरा फुट खोल खाली ओढ्यातील मोठमोठ्या दगडांवर कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन युवक जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. या रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने गाडी रस्त्यावरून खाली उतरली व संरक्षक कठड्यावर आदळून ओढ्यात कोसळली. चुराडा झालेली हि कार क्रेनच्या सहाय्याने ओढ्यातून बाहेर काढण्यात आली . अपघातातील सर्व जन नाईटक्रिकेट खेळण्यासाठी मोशी हून राजगुरुनगर कडे जात असताना हा हृदयद्रावक प्रकार घडला. अपघातात ठार झालेल्यांमध्ये पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांच्या मुलाचाही समावेश आहे.
प्रीतम शरद बोऱ्हाडे (वय २४) प्रतिक विवेक सातमाडकर (वय २३ दोघेही रा. मोशी,ता.हवेली,जि.पुणे) व सागर ताराचंद परदेशी ( वय २६ रा.संभाजीनगर ,देहूरोड) अशी या अपघातात ठार झालेल्या तीन युवकांची नावे असून स्वप्नील सुभाष बोराटे (वय २३) व सोमनाथ विठ्ठल बोऱ्हाडे (वय ३३ ,दोघेही रा.मोशी ता.हवेली ,जि.पुणे) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या बाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवारी रात्री अकरा वाजनेचे सुमारास पुणे बाजू कडून नाशिक बाजू कडे जाणारी वॅगनआर कार (क्र.एम एच १४ इ सी २४०२) रोह्कल फाट्याजवळ वळणाचा अंदाज न आल्याने कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. प्रचंड वेगामुळे ही कार ओढ्यावरील संरक्षक कठड्यावर जोरदार आदळली व कठडा तोडून ओढ्यात कोसळली व उलटी झाली . ओढ्यात असलेल्या मोठमोठ्या दगडांवर कार उलटी पडल्याने यात कारचा चालक प्रीतम बोऱ्हाडे याच्यासह प्रतिक सातमाडकर व सागर परदेशी हे जागीच ठार झाले तर स्वप्नील बोराटे व सोमनाथ बोऱ्हाडे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनीघटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने या कार मधील मृत व जखमी युवकांना बाहेर काढले त्यातील वरील दोन जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने ओढ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील यांच्यासह चाकण चे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत. दरम्यान ओढ्यात कार जिथे कोसळली तेथील मोठ्या मोठ्या दगडांवर आणि कारच्या संपूर्ण समोरील भागावर आणि आत मध्ये अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता हे चित्र सकाळपासून अपघात पाहणासाठी येणाऱ्या सर्वांचेच मन हेलावून टाकणारे होते.
एका बाजूकडील दोघे वाचले :
रात्रीच्या अंधारात धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला प्रचंड वेगामुळे ही कार ओढ्यावरील संरक्षक कठड्याला चालकाकडील बाजूने धडकली आणि थेट पंधरा फुट खोल ओढ्यात कोसळली. यात या कारच्या चालकाकडील बाजूचा संपूर्ण पणे चुराडा झाला व चालक प्रीतम आणि त्याच्या पाठीमागील सीट वर बसलेले प्रतिक आणि सागर हे जागीच ठार झाले तर चालक शेजारी आणि त्याच्या पाठीमागील सीट वर बसलेले स्वप्नील आणि सोमनाथ हे दोघे गंभीर जखमी झाले मात्र प्राणघातक अपघातातून बचावले.
ओढावरील पुलच झालाय 'मृत्यूशय्या' :
पुणे नाशिक महामार्गावरील हा पूल नसून, "मृत्यूशय्या'च असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनधारक व्यक्त करीत आहेत. याच पुलाच्या पूर्वेकडील बाजू लगत असलेल्या विहिरीत चार वर्षांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात एक कार थेट विहिरीत पडली होती. विहिरीत पडलेल्या त्या कार मधून दोन महिलांसह तिघांना बाहेर काढण्यात यश आले होते मात्र सीटबेल्ट लावून वाहन चालविणाऱ्या युवकाला जलसमाधी मिळाली होती. या पुलावरील कठडे अपघातांच्या दृष्टीने कुचकामी ठरत असून रात्रीच्या वेळी धोकादायक वळणांचा अंदाजच येत असल्याची स्थिती आहे. लगतच्या ओढ्यांमध्ये,रस्त्यालगत असलेल्या विहिरींमध्ये वाहने जावूच नयेत यासाठी कुठलीही खबरदारी घेण्यात आलेली नसल्याने बिओटी तत्वावर काम करण्यात आलेल्या पुणे नाशिक महामार्गाच्या सुरक्षिततेकडे आयआरबी कंपनीने निव्वळ टोळधाड न करता लक्ष देण्याचीही मागणी होत आहे.
------------------
अविनाश दुधवडे,चाकण 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा