पोलिस ठाण्यांत सडताहेत हजारो बेवारस वाहने ...
वाहनांच्या लिलावाला लालफितीचा अडसर
'पोकळ' झालेली वाहने होताहेत मातीमोल

चाकण:
पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली, तसेच बेवारस अवस्थेत सापडलेली हजारो वाहने विविध पोलिस ठाण्यांमध्ये अक्षरशः सडत आहेत. इंजिन, चासी नंबरमध्ये
खाडाखोड केल्याने गुन्ह्यांत जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांची माहिती वेळेत मिळत नाही. अनेकदा वाहन परत मिळवण्यासाठी करावा लागणाऱ्या कायदेशीर खटाटोपामुळे
मालक वाहन नेण्यासाठी येतच नाहीत. बेवारस वाहनांसंदर्भात सर्व जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांना माहिती दिली जाते. मात्र, पोलिस इतर व्यापामुळे या गुन्ह्यांकडे गांभीर्याने
पाहत नसल्याने  पोलिस ठाण्यांमधील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

पोलीस दप्तरी असलेल्या नोंदीनुसार मागील वर्षात चाकण हद्दीतून वाहन चोऱ्यांमध्ये 12 मोटारसायकल ,11 जीप ,3 ट्रक चोरीस गेल्या आहेत .अर्थात चाकण पेक्षा
काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही आकडेवारी या पेक्षा अधिक धक्कादायक असू शकते.मात्र संबंधित प्रशासन या साठी नियोजन बद्ध प्रतिबंधात्मक उपाय योजना करते का ?
हा संशोधनाचा भाग आहे.
  रस्त्याच्या बाजूला उभी केलेली, विविध पार्किंगमधून, सरकारी कार्यालयाच्या आवारातून आणि घरासमोरूनही वाहने चोरीस जाण्याच्या घटना घडतात. चोरी झाल्याचे
लक्षात आल्यावर संबंधित वाहनचालक वाहन चोरी गेल्याची खात्री झाल्यावर संबंधित व्यक्ती पोलिस ठाण्याची वाट धरतो . तेथे गेल्यावर सुरवातीला पोलिस तक्रारदारालाच
फैलावर घेतात . "वाहन व्यवस्थित लावायला काय होते ? नीट लॉक केले नसेल. पाहा नीट, तेथेच असेल. कोणी तरी चुकून घेऊन गेले असेल.' असे आडवे सल्ले
दिले जातात. वाहनचालकाने फारच आग्रह केला तर मग केवळ अर्ज लिहून घेतला जातो. सापडले तर लवकर परत मिळेल, गुन्हा दाखल केला आणि वाहन सापडले तर
 ते न्यायालयामार्फत परत मिळवावे लागेल आणि त्यासाठी खूप वेळ लागेल, असे सांगितले जाते. त्यामुळे वाहनचालकही अर्जावर समाधान मानतो. अनेकदा  चकरा
मारल्या तरी तपास चालू  आहे. एवढेच उत्तर त्याला मिळते. विमा आणि इतर कारणासाठी गुन्हा दाखल करणे आवश्‍यक असल्यास वाहनचालक अन्य मार्गांनी दबाव आणून
गुन्हा दाखल करायला भाग पाडतात. मात्र, गुन्हा दाखल झाला तरी वाहन परत मिळेलच, असे नाही.
 
  बनावट चावीने दुचाकी आणि चारचाकी वाहनेही सुरू करून चोरून नेली जातात. त्यांच्या नंबर प्लेट आणि बाह्यरूपात असा काही बदल केला जातो की, मूळ मालकासही ते
सहजासहजी ओळखता येत नाही. ही वाहने ग्रामीण भागात आणि शहरातही स्वस्तात विकली जातात. नव्या वाहनांचे सुटे भाग काढून विकले जातात. मुळात वाहनचोरांना
शोधण्यासाठी पोलिस वेगळे प्रयत्न करतात, असे दिसून येत नाही. वाहतूक पोलिसांकडून अगर इतर कोणत्या तपासणीत एखादा आरोपी पकडला गेला, तर त्याच्याकडून
काही वाहने मिळतात एवढाच काय तो तपास असतो अशी स्थिती ग्रामीण भागातल्या जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात पहावास मिळते .

 चोरीस गेलेले वाहन चुकून पोलिसांना सापडल्यावर ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया किचकट आहे. एखाद्या व्यक्तीचे चोरी झालेले वाहन न्यायालयातून परत मिळविण्यासाठी पोलिसांमार्फत
अर्ज सादर करावा लागतो. त्यावर पोलिसांचे मत न्यायालय विचारात घेते. त्यानंतर ते वाहन मूळ मालकाला परत मिळते. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले वाहनही काही
वेळा निकालानंतर परत मिळते, तर काही वेळा तत्पूर्वी न्यायालयात अर्ज सादर करावा लागतो. त्यात पोलिसांनी "ना हरकत प्रमाणपत्र' दिल्यावर ते परत मिळते.
बेवारस म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेले वाहन सोडविण्यासाठी मूळ मालकाला संबंधित सर्व कागदपत्रे सादर केल्यावर काही अटींवर पुन्हा मिळू शकते,असे चाकण चे पोलीस
निरीक्षक सुशील कदम यांनी संगीतले . बऱ्याचदा  प्रक्रियेत वेळ खर्च होतो. मात्र बेवारस वाहन सापडल्यावर त्याच्या मालकाचा शोध घेतला जातोच, असे नाही,
तर काही वेळा मूळ मालकाचा पोलिस शोध घेतात. परंतु तो वाहन सोडविण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारांतील वाहने वर्षानुवर्षे पोलिस ठाण्यात पडून राहतात.
त्यानंतर त्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. ती मिळाल्यावर त्या वाहनांचा लिलाव होतो. मात्र ही परवानगी देण्यापूर्वी
न्यायालयाकडून त्या वाहनाच्या तपासाबाबत पूर्ण माहिती घेतली जाते. अनेकदा वाहनाबाबत न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत अशी चोरीचे किंवा अपघातातील वाहन आहे त्या
स्थितीत राहते. परिणामी, त्याचे सुटे भाग खिळखिळे होतात ,गायब होतात .'पोकळ' झालेली ही वाहने मातीमोल होतात.
..........अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)