न.प. हद्दीच्या मुद्द्यावर बोलावलेली
विशेष ग्रामसभा  गोंधळातच गुंडाळली

--------------------------------

संयुक्त चाकण ग्रामपंचायतीची 1984 साली असणारी हद्द कायम ठेवूनच चाकण साठी नगर परिषदेची हद्द ठरवावी अशी सर्वच ग्रामस्थांची मागणी होऊनही कुठल्याही ठोस निर्णयाप्रत
न पोहोचता आणि विशेष ग्रामसभा बोलावण्याचा ठराव करण्याचा ग्रामपंचायतीला हक्कच उरला आहे की नाही या वरून काही जणांनी गोंधळ घातल्या नंतर चाकण ची नगर
परिषदेच्या हद्दीच्या आणि हरकतींच्या मुद्द्यावर आज (दि.13) बोलावण्यात आलेली विशेष ग्रामसभा अक्षरश गुंडाळण्याची नामुष्की ओढवली.. 

चाकणचे सरपंच काळूराम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या या सभेसाठी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी ,उपसरपंच साजिद सिकीलकर,सदस्य प्रीतम परदेशी ,
कृष्णा सोनवणे, अमोल घोगरे, दत्तात्रेय जाधव, बानो काझी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप परदेशी ,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील पानसरे,
रिपाईचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अतिश मांजरे , उमेश आगरकर ,राम गोरे, धनंजय कदम,विलास बारवकर , राजेंद्र आगरकर,पांडुरंग गोरे ,सुलाभ पठारे
,संतोष साळुंके ,सुनील शेवकरी, रुपेश जाधव, दत्तात्रय फुलवरे ,जाहीर शेख आदींसह सर्पक्षीय कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
चाकणची सध्याची जी हद्द आहे ती कायम ठेवून नगरपरिषदेची  हद्द निश्‍चित करण्यात आल्यास मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेल्या कंपन्यांचे महसुली उत्पन्न शहराला
मिळणार नाही ,नागरी सुविधांबाबत फारसा फरक पडणार नाही ,चाकण नगरपरिषदे पेक्षा लगतच्या कारखानदारी असणाऱ्या छोट्या वाड्यांच्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न
अधिकच राहणार आणि निरनिराळ्या करांमध्ये भरमसाठ वाढ होऊन चाकण हद्दीतील नागरिकांवरच अन्याय होईल अशी भूमिका या विशेष ग्रामसभेत माजी उपसरपंच अशोक बिरदवडे ,
माजी सरपंच नंदकुमार गोरे, ग्रामपंचायतीचे सदस्य  दतात्रेय जाधव, रुपेश जाधव, यांच्यासह अनिल सोनवणे, चंद्रकांत गोरे, नवनाथ पठारे, अनिल देशमुख , सुनील शेवकरी,
राहुल वाडेकर आदींनी जोरदार पणे मांडली . सुनील पानसरे, उमेश आगरकर,आशोक जाधव यांनी जुन्या ठरावांच्या प्रती मध्ये संयुक्त ग्रामपंचायतीचा समावेश करण्याचा स्पष्ट उल्लेख
असताना प्रस्ताव चुकीचा पाठ्विल्याबाबत प्रशासनाला धारेवर धरले.  मात्र या दरम्यान अन्य काही मंडळीनी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सरपंच काळूराम गोरे यांनी नगर परिषदेबाबतच्या सूचना ,हरकती
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येकाने स्वतः द्याव्यात असे सांगत ग्रामसभा संपल्याचे जाहीर केले.

गड्या आपुला गाव बरा ...:
चाकण हद्दीतील राक्षेवाडी ,आगरवाडी,पाठरवाडी या तिन्ही वाड्यांनी नगर परिषदेच्या मुद्द्यावर यु टर्न घेतला असून नगरपरिषद कशीही असली तरी गड्या आपुला गाव बरा अशी भूमिका
घेत ग्रामपंचायतीचे स्वतंत्र अस्तित्व देण्याची मागणी केली आहे.
या तिन्ही वाड्यात पंधराशे एकर पेक्षा अधिक शेती क्षेत्र आहे. चाकण नगर परिषदेमध्ये समाविष्ट होण्यास या भागातील सुमारे  पाचशे शेतकऱ्यांनी विरोध केला असून त्या आशयाचे
पत्र चाकण च्या आजच्या ग्रामसभेत देण्यात आले. हे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार असून , या तिन्ही वाड्या
चाकण पासून पाच किमी अंतरावर आहेत .व लोकसंख्या 3 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी स्थानिक कार्यकर्ते
व ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जाधव ,रुपेश जाधव ,नवनाथ पठारे आदींसह पाचशे शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात
देणार असून प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसू असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

दरम्यान येत्या 17 सप्टेंबर पर्यंत या बाबतच्या हरकती आल्यास त्या विचारात घेवून चाकण साठी नगर परिषद प्रशासन लागू होणार आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी
अनिल पवार यांनीही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या ठरावाच्या प्रती दाखल करता येतील असे सांगितले आहे. मात्र याबाबत सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी
ग्रामसभेत झालेल्या आक्षेपां बाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने माहिती कळविणार का ? या बाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. ..
अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)