सव्वा लाखाच्या बिबट्याच्या कातडीसह दोघे ताब्यात
सव्वा लाखाच्या बिबट्याच्या कातडीसह दोघे ताब्यात
उत्तर पुणे जिल्ह्यात एलसीबीची कारवाई
विक्रीसाठी चालविलेली सव्वा लाख रुपये किंमतीची बिबट्याची कातडी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अत्यंत शिताफीने उत्तर पुणे जिल्ह्यात हस्तगत केली असून बिबट्याची कातडी विक्रीस नेणाऱ्या औरंगाबादच्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून बिबट्याच्या कातडी सह एक दुचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे.
चंदन ताराचंद मेहेर (वय ३४) व रमेश आसाराम सपकाळ (वय ३० ,दोघेही रा. म्हैसमाळ , ता.खुलताबाद ,जि औरंगाबाद) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या बाबतचे वृत्त असे कि, वरील दोघे नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोटारसायकल वरून प्लास्टिकच्या गोणीत बिबट्याचे कातडे घेवून जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने पकडले. त्यांच्याकडून तब्बल सव्वा लाखांची बिबट्याची कातडी ताब्यात घेण्यात आली आहेत. पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांच्या आदेशावारीन अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक राम जाधव, यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक एम.बी.मोरे, व्ही.बी. साळुंके, एस.व्ही मोरे, एस.जे.शिलेदार, मयूर वाडकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. शरद बांबळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून मेहेर व सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये गेल्या काही वर्षात बिबट्यांचा मोठा वावर प्रकर्षाने समोर आला आहे. त्यामुळे काही तस्कर मंडळीनी या भागाकडे आपला मोर्चा वळविला असून बिबट्याच्या कातडीला बाजारात लाखो रुपयांची किंमत मिळत असल्याने काही मंडळीनी बिबट्यांना ठार करून त्यांच्या कातडीची तस्करी करण्याचे प्रकार सुरु केल्याचे निदर्शनास येत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील वनविभागाने अशा घटनांवर लक्ष देण्याची मागणी प्राणी प्रेमी करीत आहेत.
-------------अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा