खेड तालुक्यातील बदलाची दिशा दाखविणारा निकाल
खेड तालुक्यातील बदलाची दिशा दाखविणारा निकाल
विजयी मिरवणुकीच्या सांगता सभेत आ. गोरेंचे प्रतिपादन
चाकण:
खेड तालुक्यात आगामी काळात होऊ घातलेल्या बदलाची दिशा दाखविणारा निकाल चाकण- नाणेकरवाडी जिल्हापरिषद गटाच्या पोट निवडणुकीत समोर आला असून तालुक्यातल्या सगळ्या संस्था आता तालुक्यातील जनतेचे आणि सामन्यातील सामान्य माणसांचे प्रश्न सुटावेत म्हणून दादागिरी करणाऱ्या मंडळींकडून काढून शिवसेनेच्या छत्राखाली घेण्याचा प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी चाकण (ता.खेड) येथे केले.
चाकण- नाणेकरवाडी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत सेनेचे उमेदवार किरण मांजरे विजयी झाल्या नंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीच्या सांगता सभेत शुक्रवारी (दि.३०) रात्री चाकणच्या महात्मा फुले चौकात आमदार गोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, जबरदस्तीने आमच्याच मित्रांना आमच्या विरोधात उभे करून आपले इस्पित साध्य करण्याचे विरोधकांचे मनसुबे या भागातील मतदारांनी पुन्हा एकदा धुळीस मिळविले आहेत. राजगुरुनगर,चाकण,आळंदी या तालुक्यातील महत्वाच्या शहरांमध्ये भांडणे -मारामाऱ्या , दडपशाही, प्रशासन हाताशी धरून खोटे नाटे गुन्हे दाखल करवून त्यांनी स्वतःचे अवमूल्यन स्वतःच केले असून त्यांना आता कुठेही अगदी त्यांच्या पक्षातही किंमत राहिली नसल्याने ते ही उद्या शिवसेना प्रवेशाचा प्रयत्न करू शकतात असा उपरोधक टोला माजी आमदार दिलीप मोहिते यांना नाव न घेता लगावला. विजयी उमेदवार किरण मांजरे हे पहिलेच असे माजी आमदार पुत्र आहेत ज्यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या रूपाने शिवसेनेलाही प्रथमच तालुक्यातून जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीत असताना केवळ अन्याय आणि शिवसेनेत आल्या नंतर अल्पावधीत पदावर काम करण्याची संधी याचा प्रत्यय माझ्या नंतर किरण मांजरे यांनाही आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. व यापुढे तालुक्यात गटातटाच्या राजकारणापेक्षा एकाच विचारांच्या आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साथीने विकासाच्या विचाराला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे आणि सर्व कार्यकर्त्यांना न्याय देणार असल्याचे संकेत आमदार गोरे यांनी आपल्या परखड भाषणातून दिले. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे यावेळी म्हणाले कि, माझा विजय हा या भागातील सामान्य मतदारांचा विजय असून आमदार गोरे आणि तमाम शिवसैनिकांचे खडतर परिश्रम यांच्या जीवावर आणि मतदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीत असताना वेळोवेळी माझ्यावर अन्याय झाला म्हणूनच सेनेत येण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय कसा योग्य होता हे जनतेने दिलेल्या प्रेमामुळे स्पष्ट झाले आहे. यापुढे तालुक्यातील विविध संस्थांवर सेनेचा भगवा फडकविण्याचा प्रयत्न करणार आहे. आमदार गोरे , तमाम मतदार आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना मांजरे यांना अक्षरशः गहिवरून आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे, विजयसिंह शिंदे, बाळासाहेब वाघ, लक्ष्मण जाधव ,प्रकाश वाडेकर, रामदास जाधव, काळूराम कड, आदींनीही विचार व्यक्त केले. यावेळी राजगुरुनगर बँकेचे संचालक अशोक भुजबळ, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब गोरे, शांताराम (बाप्पू) मेदनकर, प्रीतम शिंदे, सुभाष मांडेकर,नितीन गोरे, राहुल गोरे, सुरेश कांडगे, नंदा कड ,नंदकुमार गोरे, अभिमन्यू शेलार , योगेश आगरकर, शेखर पिंगळे, प्रमोद बनकर, नितीन मांजरे, सचिन मांजरे, आदींसह विविध गावाचे सरपंच उपसरपंच आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
१२ वर्षांचा वनवास संपला म्हणून ...
मी पहिली जिल्हा परिषद निवडणूक जिंकलो त्यावेळी किरण मांजरे विजयी सभेचे अध्यक्ष होते. दरम्यानच्या काळात अनेक स्थित्यंतरे घडली. मात्र आता बरोबर बारा वर्षांनी किरण मांजरे पोटनिवडणूकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर पोहचले आहेत. राष्ट्रवादीतून सेनेत आल्याने त्यांचा बारा वर्षांचा वनवास संपून न्याय मिळाला असून हे केवळ शिवसेनेमुळे घडले आहे, कारण येथे कार्यकर्त्यांना न्याय मिळतो असे आमदार गोरे यांनी सांगताच उपस्थित जनसमुदायाने जोरदार घोषणाबाजी आणि टाळ्यांचा कडकडाट करीत उत्स्फूर्त दाद दिली.
-----------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा