अन् वीस वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी ....
अन् वीस वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी ....
चाकणच्या विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
चाकण:
शाळा, कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ््या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र वीस वर्षांचा मोठा कालखंड लोटल्या नंतर प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते हे चाकणच्या शिवाजी विद्यालयातून १९९५ साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले . आणि तब्बल वीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.
ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली ती माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने ... चाकणच्या शिवाजी विद्यालयामधून १९९४ -९५ या शैक्षणिक वर्षात बारावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी एक दोन नव्हे तर चक्क वीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले.
माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा रविवारी येथे अभुतपूर्व उत्साहात पार पडला. १९९५ पासूनचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आजी-माजी शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत विद्यालायावरील आपले प्रेम व्यक्त केले. यानिमित्ताने जुन्या मित्रांची भेटही घडून आली. गुरूदक्षिणा म्हणून संस्थेस पुढील काळात लागणारी सगळी मदत करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आप-आपल्या मनोगतात बोलताना दिले.
या विद्यालयातून हे विद्यार्थी १९९५ साली केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तुत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आहेत,यातील बहुतांश माजी विद्यार्थी शिक्षक आहेत, काही बडे राजकारणी , पत्रकार आहेत तर अनेक माजी विद्यार्थिनी यशस्वी उद्योजिका , समाजसेविका त्याच प्रमाणे आदर्श गृहिणी आहेत. ज्यांच्या ऋणानुबंध आजही या शाळेशी जोडलेला आहे . स्मृतीची चाळत पाने... बाष्पंध होतसे लोचने... स्मृतींनी कायमची मनात घरे करून गेलेल्या या माजी विद्यार्थीसाठी प्रशालेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे कॅट्लाॅ ग पाहून डायरी चे निर्माण कार्य हाती घेतले होते . या मेळाव्यातून, माजी विद्यार्थी आज कुठे-काय करताहेत याची माहिती शाळेच्या नव्या प्रशासनाला मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रशालेचे प्राचार्य मार्तंड खोडदे यांनीही या सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपल्या शाळा -कॉलेजचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी कॉलेजचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य पी.डी.मावकर , प्रा. सुखदेव काळे , टी.एन थोरात,प्रा.दिलीप गोरे, सविता गोरे, रामदास उनधरे , यशवंत वाघ व माजी विद्यार्थी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे, बहूळचे माजी उपसरपंच विनोद वाडेकर, प्रा.राजेंद्र खाडे, प्रा, सुनील मंडलिक, प्रा. संतोष हांडे, राहुल गोतारणे,राहुल वाडेकर,श्रीकांत गवळी, जीवन मिंडे,राम नाणेकर, अर्जुन लोणारी,रमेश लोणारी, अरुण जाधव, वैजयंता शेवकरी (शिंदे) , हिरकणी पगाडे (वाडेकर) , माधुरी दुधाळे (गोरे) निर्मला येळवंडे, निर्मला कोळेकर, अर्चना कड, प्रगती झगडे, समीर सिकीलकर , संपत कुटे, स्वामी बचुटे,कुमार पवार, मनीषा बुर्डे (गोरे) , जयदीप नाणेकर, गणेश मुंगसे, प्रकाश साबळे आदींसह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक वैजयंता शेवकरी (शिंदे) यांनी केले व सूत्रसंचालन माजी विद्यार्थी राजेंद्र खाडे सुनील मंडलिक ,अविनाश दुधवडे यांनी केले. अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.
अन विद्यार्थी गहिवरले :
१९९४-९५ या शैक्षणिक वर्षाचे १२ वीचे वर्ग शिक्षक निवृत्त प्रा. सुखदेव काळे यांनी आपल्या मनोगतात अनेक जुन्या आठवणीना उजाळा दिला . सुरुवातीलाच त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना माझ्या पाखरांनो आशी हाक मारल्याने सगळ्याच विद्यार्थ्यांना गहिवरून आले.
------------------------
.......अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
माजी विद्यार्थी मेळावा मनोगत
उत्तर द्याहटवा