चाकण- नाणेकरवाडीत शिवसेनेचे किरण मांजरे विजयी
चाकण- नाणेकरवाडीत शिवसेनेचे किरण मांजरे विजयी
राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला सुरुंग ; अखेरच्या फेरी पर्यंत रंगली लढत
-----------
चाकण- नाणेकरवाडी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत अखेरच्या फेरी पर्यंत रंगलेल्या लढतीत शिवसेनेचे किरण मांजरे अवघ्या ७४१ मतांनी निवडून आले. राष्ट्रवादीचे प्रकाश खराबी यांना ७३०५, कॉंग्रेसचे अमोल पवार यांना ६३२० मते मिळाली. अत्यंत टोकाच्या राजकीय वातारवणात झालेल्या या काट्याच्या लढतीत कोण विजयी होईल याचा अंदाज अखेरच्या फेरी पर्यंत बांधणे अवघड झाले होते. मात्र आमदार सुरेश गोरे यांचा हा बालेकिल्ला मांजरे यांच्या विजयामुळे अभेद्य असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून चाकण- नाणेकर मतदार संघाचे आपणच बाजीगर असल्याचे आमदार गोरे यांनी पुन्हा एकदा सर्वच विरोधकांना दाखवून दिले आहे.
आमदार सुरेश गोरे यांनी राजीनामा दिल्या नंतर रिक्त झालेल्या चाकण - नाणेकरवाडीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आमदार सुरेश गोरे व राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असे या निवडणुकीला स्वरूप देण्यात आले होते. कॉंग्रेसकडून येथे जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
राजगुरुनगर येथील क्रीडा संकुलात सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु झाली. सकाळ पासूनच कोण विजय होणार ? कोण पडणार ? याने रंगलेल्या चर्चेची जागा आज (दि.३०) सुरुवातीच्या तणाव आणि मतमोजणीच्या अखेरच्या फेरीत जल्लोषाने घेतली. साडे अकरा वाजले नंतर उमेदवारांची आघाडी -पिछाडी बाहेर समजू लागली आणि चाकण परिसरातील गावागावांत गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीबरोबरच कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला एकच उधाण आले. अखेरच्या फेरी पर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे किरण मांजरे यांना एकूण ८०४६ , राष्ट्रवादीचे खराबी यांना ७३०५,कॉंग्रेसचे अमोल पवार यांना ६३२० , अपक्ष पांडुरंग गोरे यांना ६७७ अपक्ष गौतम वडवे यांना ५७० तर अपक्ष जयश्री सोनवणे यांना अवघी ४९ मते मिळाली. आणि चाकणकरांच्या ७४१ या निर्णायक मतांच्या आघाडीवर सेनेच्या किरण मांजरे यांची विजयी नौका पार झाली. चाकणच्या मार्केट यार्डा पासून विजयी उमेदवार मांजरे आमदार गोरे यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी उशिरापर्यंत मतदार संघातील गावे-वाड्या-वस्त्या वाद्यवृंदाच्या दणदणाटात जाग्या राहिल्या. प्रथमच शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य येथून विजयी झाल्याने मिरवणुकांनी अनेक गावांनी अभूतपूर्व जल्लोष अनुभवला. चाकण मध्ये महात्मा फुले चौकात आयोजित करण्यात आलेल्या विजयी सभेत बोलताना आमदार गोरे म्हणाले कि, खेड तालुक्यातील दहशत संपून यापुढे भगवे वादळ येणार असल्याचा विश्वास देणारा हा निकाल आहे, किरण मांजरे म्हणाले कि, सर्वसामान्य माझा विजय हा चाकण नाणेकरवाडी गटातील सामान्य कार्यकर्त्यांचा विजय असून आमदार गोरे यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा विकास करण्याचा माझा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया मांजरे यांनी यावेळी दिली. यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे, बाळासाहेब गोरे, राम गोरे, साजिद सिकीलकर, लक्ष्मण जाधव, अप्पासाहेब कड, काळूराम कड, रामदास जाधव,विजयसिंह शिंदे , नितीन गोरे, सुरेश कांडगे, नंदकुमार गोरे, काळूराम गोरे, अभिमन्यू शेलार , प्रकाश भुजबळ ,अशोक जाधव, प्रमोद बनकर, राजेंद्र गोरे,यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
पहिल्या माजी आमदार पुत्राला संधी :
खेड तालुक्याचे नेतृत्व केलेल्या अनेक माजी आमदारांच्या पुत्रांनी जिल्हा परिषदेवर जाण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र कुणालाही यश आले नव्हते. तालुक्याच्या त्या-त्या नेतृत्वांनी माजी आमदार पुत्रांची गळचेपी केल्याचे अनेक प्रकार सर्वश्रुत आहेत. माजी आमदार कै.वसंतराव मांजरे यांचे पुत्र असलेले किरण मांजरे यांनाही अशा प्रयत्नात यापूर्वी अपयश आले होते. मात्र निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी आमदार सुरेश गोरे यांच्या विचारांवर विश्वास व्यक्त करण्याची भूमिका घेत सेनेचे शिवबंधन हातात बांधले. मांजरे यांचा वैयक्तिक संपर्क आणि आमदार गोरे यांचे भक्कम पाठबळ याच शिदोरीवर त्यांची विजयी नौका विरोधकांच्या प्रचंड टोकदार विरोधानंतरही पार झाली .
------------------------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा