११ वर्षीय अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार
कुरुळीत ११ वर्षीय अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार
शाळेत जाताना घडला प्रकार ; एका नराधमावर गुन्हा
चाकण:
शाळेत जाणाऱ्या ११ वर्षांच्या अल्पवयीन दलित मुलीला आडबाजूला नेवून अंदाजे १८ ते २० वर्षीय नराधम तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२२) सकाळी कुरुळी (ता. खेड, जि.पुणे) येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय तपासणी नंतर याच पिडीत चिमुरडीच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री उशिरा एका अज्ञात तरुणावर बलात्काराचा गुन्हा नोंदविला असून संबंधित नराधमाचा शोध सुरु आहे.
या बाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबंधित नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय कुटुंब कुरुळी येथे वास्तव्यास आहे. संबंधित पिडीत चिमुरडी येथीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे हि मुलगी सकाळी आपल्या मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना घरापासून काही अंतरावर गेल्या नंतर रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या व सैतान अंगात संचारलेल्या या नराधम युवकाने संबंधित मुलीला कुरुळी गावाचे हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या ओढ्यापर्यंत निर्जन स्थळी ओढत नेले . हा सगळा प्रकार पाहून तिच्या सोबत असलेली दुसरी पाच वर्षांची लहान मुलगी पळून गेली. त्यानंतर त्या पिडीत मुलीला नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी अतिप्रसंग केला, व घायाळ अवस्थेत या मुलीला घटनास्थळी सोडून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय तपासणी नंतर पिडीत चिमुरडीच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री उशिरा एका अज्ञात तरुणावर बलात्काराचा गुन्हा नोंदविला असून संबंधित नराधमाचा शोध सुरु आहे. या धक्कादायक घटनेमुळे पालकवर्गातून चिंता व्यक्त होत असून संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अधिक तपास चाकणचे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गजभीव व चाकण पोलीस करीत आहेत. या घृणास्पद प्रकारचा सर्वच स्तरातून निषेध होत असून आरोपीस तातडीने अटक करण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे.
भय इथले संपत नाही....
दरम्यान दिल्लीतील बहुचर्चित सामूहिक बलात्काराच्या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. एखाद्या प्रकारची चर्चा होते पण लहान मुली व महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना अजूनही कमी झालेल्या नाहीत, असेच चाकण भागात चित्र पहावयास मिळत आहे. चाकण परिसरात मेदनकरवाडी येथेही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. त्यानंतर बालाजीनगर, एकतानगर या भागात अशाच अत्याचाराच्या घटनांवरून दोन महिलांची आपली जीवनयात्रा संपली होती.कडाची वाडी येथेही एका महिलेवर बलात्काराचा प्रकार नुकताच घडला होता.आसखेड ( ता.खेड,) येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने पाशवी बलात्कार केल्याचा विचित्र प्रकार उघडकीस आला होता.दुसऱ्या घटनेत बीड जिल्ह्यातील आईने पोटच्या बारा वर्षांच्या मुलीला साबळेवाडी (ता.खेड) येथील कला केंद्रात विकल्यानंतर तिच्यावर आठ दिवसांत कलाकेंद्रात व चौफुला येथील लॉज वर तिघांकडून सामुहिकपाशवी बलात्कार झाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला होता. दोनच दिवसांपूर्वी खराबवाडी येथेही अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता ११ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याचा हा किळसवाणा प्रकार समोर आल्याने पालकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.
----------------------अविनाश दुधवडे ,चाकण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा