कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा कार्यालयात धुडगूस
सव्र्हरला कनेक्टेव्हिटी नसल्याने चाकणचे दुय्यम निबंधक कार्यालय ठप्प
कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा कार्यालयात धुडगूस
चाकण:
भारत संचार निगम लिमिटेड ' ची ( बीएसएनएल ) यंत्रणा बिघडल्यामुळे गुरुवार पासून चाकण परिसरातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत . दस्त नोंदणीसाठी चाकणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात शासनाने ऑनलाईन नोंदणीची प्रणाली सुरू केली असली तरी येथील सव्र्हरला कनेक्टेव्हिटीच मिळत नसल्याने संगणकीकृत दस्त नोंदणीची कामे ठप्प झाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून येथील सव्र्हरला कनेक्टेव्हिटी न मिळाल्याने व दिवसभर थांबून कामच न झाल्याने नागरिकांसह सर्वांच्याच संतापाचा पारा चढला आणि आज (दि.१७) दुपारी साडेतीन वाजनेचे सुमारास चवताळलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या कार्यालयात घुसून अक्षरशः गोंधळ घातला. दोन दिवसांपासून कामकाज होत नसल्याने काही कार्यकर्त्यांनी चक्क हे कार्यालयच बंद करण्याच्या प्रयत्न केला.
पुणे जिल्ह्यात जवळपास सर्वच दस्त नोंदणीची प्रक्रिया ऑन लाईन झाली असून त्यात बीएसएनएल मधील बिघाड व अन्य कारणांमुळे वारंवार'डिस्कनेक्ट' होणारा सव्र्हर प्रमुख अडचण ठरत असल्याची स्थिती वारंवार समोर आली आहे. कनेक्टिव्हीटी गायब होत असल्याने चाकणकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधी राजगुरुनगर येथे व काही दिवसानंतर लगेच चाकण मध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. तथापि तांत्रिक दोष निर्माण झाल्यास दिवसभरात दोन किंवा तीन या पलीकडे दस्त नोंदणी शक्य होत नाहीत . गुरुवार पासून येथील यंत्रणा ठप्प झालेली असून दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांना दिवसभर कार्यालयात थांबून रहावे लागत आहे. इतके करूनही दस्त नोंदणी होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला तर वारंवार सामन्यांची होणारी हि अडचण लक्षात घेत चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खेड तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय डोळस, उपाध्यक्ष अनिल (बंडू) सोनवणे , सुभाष गाढवे, संतोष गाडेकर,गणेश थिगळे ,जावेद शेख, यांच्यासह वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांनी घुसून अक्षरशः धुडगूस घातला. व येथील अधिकारी जे.जी.बारमेडा यांना सातत्याने नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या या असुविधेवर काय उपाययोजना केली या एकाच प्रश्नावर चांगलेच धारेवर धरले. या बाबत काही पर्यायी व्यवस्था करू असे सांगण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला मात्र कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही कार्यकर्त्यांनी हे कार्यालयच बंद करण्याच्या यावेळी प्रयत्न केला. अखेर या कार्यालयालगत खोदकाम करून बीएसएनएल लाईन तोडणार्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर हा राडा थांबला. या बाबत तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी सांगितले कि, सव्र्हर मध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने ही संगणकीकृत प्रक्रिया पुढे सरकू शकत नाही. सुट्टी काढून व दैनंदिन कामकाज सोडून दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांना बीएसएनएल मधील बिघाड व सव्र्हरच्या रडकथेमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी जे.जी.बारमेडा यांनी सांगितले कि, सव्र्हरला कनेक्टेव्हिटीच मिळत नसल्याने संगणकीकृत दस्त नोंदणीची कामे ठप्प असल्याचे वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आले आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित करण्यात आले आहे मात्र अद्याप ही यंत्रणा सुरळीत न झाल्याने कामकाज ठप्प असून नागरिकांची गैरसोय होत असली तरी आम्हीही हतबल आहोत.
ढिम्म बीएसएनएलचा ढिसाळ कारभार:
बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराने मोबाईल, लॅण्डलाईन, फॅक्स, ब्रॉडबँड,इंटरनेट सुविधा पूर्णपणे बंद पडण्याचे प्रकार वाढले असून यामुळे ग्राहकासह व्यापारी वर्ग, बँकींग क्षेत्र, रजिस्ट्रार ऑफिस , स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन फार्म भरणार्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील बहुतांश शासकीय कार्यालये , बँकांमध्येही ' बीएसएनएल ' चे कनेक्शन आहे . मात्र दोन दिवसांपासून हि यंत्रणा कोलमडल्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत . इंटरनेट सुविधा बंद पडत असल्यामुळे चाकण येथील बँकेचे व्यवहार ठप्प होण्याचे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. अंडरग्राऊंड ऑप्टिकल फायबर केबल ठिकठिकाणी नादुरूस्त होत असल्याने व त्यांच्या दुरुस्ती साठी वेळीच उपाययोजना होत नसल्याने ही गैरसोय होत आहे.
----------------- अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा