चाकण ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कारवाईच्या रडारवर ?
चाकण ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कारवाईच्या रडारवर ?
सर्व सदस्यांवर कारवाईसाठी विभागीय आयुक्तांना पत्र
चाकण:
बांधकाम नोंदी व नमुना नंबर आठ चे उतारे या संदर्भात पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने पोलिसांत गुन्हा दाखल होऊन तीन महिने चाकणच्या तत्कालीन सरपंचाना गजाआड राहावे लागल्या नंतर आता पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याच प्रकरणात सरपंचांच्या सहीनिशी उतारे देण्यात यावेत असे ग्रामपंचायत सदस्यांचे सर्वानुमते ठराव मंजूर केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने सर्व सदस्यांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये कारवाई करणेत यावी असे पत्र विभागीय आयुक्तांना मागील आठवड्यात (२३ जानेवारी २०१४ रोजी) दिले आहे. याच प्रकरणात पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे चार महिन्यांपूर्वी सर्व सदस्यांनी खुलासा करण्याचे नोटिशीद्वारे आदेशही दिले होते.
सदर नोटिशीला संबंधित सर्व सदस्यांनी १९ ऑक्टोबर २०१३ रोजी लेखी खुलासा खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. प्रत्यक्षात मात्र चाकणच्या मासिक सभा वृतांताची तपासणी झाल्या नंतर १८ ऑक्टोबर २०११ चा ठराव क्रमांक १४३ व २४ जानेवारी २०१३ चा ठराव क्रमांक ३३४ अन्वये ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या बांधकाम नोंदी संदर्भात करासाठी नोंदी करून सरपंच यांच्या स्वाक्षरीने नमुना नंबर ८ चे उतारे देण्या बाबतचा ठराव सर्वानुमते करण्यात आलेला आहे. त्यामुळे तत्कालीन सरपंच काळूराम गोरे यांच्या प्रमाणेच विद्यमान सरपंच दतात्रेय बिरदवडे, उपसरपंच प्रीतम परदेशी, साजिद सिकीलकर,रेश्मा लेंडघर,पांडुरंग गोरे,पूनम शेवकरी,संतोष साळुंके, बानो काझी,दतात्रेय जाधव, अशोक बिरदवडे,कृष्णा सोनवणे, अनुराधा जाधव,ज्योती फुलवरे ,चित्रा कदम या सर्व कार्यकारी मंडळावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये कारवाई करणेत यावी असे पत्र पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.
गावठाण हद्दी बाहेर कुठल्याही बांधकामास परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस नाहीत , त्याच प्रमाणे आयुक्तांच्या २२ डिसेंबर २०१० च्या आदेशानुसार ग्रामपंचायतीनी कुठलेही बांधकाम नकाशे मंजूर करू नयेत,ग्रामपंचायत नकाशा प्रमाणे सदनिकेची नोंद प्रॉपर्टी कार्डला घेवू नये, त्याच प्रमाणे जिल्हाधिकार्यांच्या १० फेब्रुवारी २०१० च्या पत्रा नुसार सहायक संचालक नगररचना यांच्या सल्ल्या नुसार बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्यात यावेत हे स्पष्ट असताना त्यांच्या अधिकारावर अधिक्षेप करीत मासिक सभेत विनापरवाना कारस पात्र असा शेरा नमुना नंबर आठच्या दप्तरी लिहून सरपंचांच्या सहीने नमुना नंबर आठ चे उतारे देण्याचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व बाबींमुळे संबंधित ग्रामपंचायत सदस्य महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३८ अन्वये सदस्य पदाचे कर्तव्य पार पडण्यास दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाई करण्यात यावी असे त्यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात स्पष्ट पणे नमूद करण्यात आलेले आहे.
याच प्रकरणात चाकणचे तत्कालीन सरपंच काळूराम गोरे यांच्यावर पदाचा गैरवापर करून 'आठ अ' चे बोगस उतारे देवून बेकायदा कामकाज केल्याप्रकरणी येथील चाकण पोलीस ठाण्यात (१९ जुलै रोजी) खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीकांत ढमढेरे यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल आला होता. दि. २० ऑगस्ट रोजी चाकण पोलिसांनी त्यांना अटक केली होती त्यानंतर तब्बल तीन महिने सरपंच गोरे यांना गजाआड राहावे लागले होते . या प्रकरणाच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनेकांच्या भोवती फास आवळले होते. सरपंचांनंतर चाकण ग्रामपंचायतीचा सध्या निलंबित असलेला तत्कालीन अधीक्षक ,उतारा मिळविणारा इसम पांडुरंग सपाट यांच्यासह आयफील सिटी व सदगुरू बिल्डर्स या बड्या गृहप्रकल्पांचे तीन मालक, एक कामगार ,जमीन व्यवहारातील एक एजंट यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यातील काहीना अटक करून जमीन मिळाला ,तर काही मंडळी अद्यापपर्यंत अटकपूर्व जमीन मिळवीत आपली अटक टाळण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यातील काहींचा अटकपूर्व जमीन न्यायालयाने नुकताच फेटाळल्याची व त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचीही चर्चा आहे.
होऊ घातलेली कारवाई अन्यायकारक : सरपंच बिरदवडे
चाकणचे सरपंच दतात्रेय बिरदवडे यांच्या सह काही सदस्यांच्या मते ठरावाच्या अनुशंघाने कुणालाही उतारे देण्यातच आलेले नसल्याने सदस्यांवर कारवाई करता येणार नाही. बांधकाम नोंदी करून नागरिकांची सोय करावी व ग्रामपंचायत उत्पन्न वाढवावे असा ठराव खुद्द ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला होता. त्याच संदर्भाने असा ठराव मासिक सभेतही मांडण्यात आला होता. मात्र संबंधित ठरावावर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने त्या ठरावाला काहीही महत्व नाही. आमच्यावर होऊ घातलेली कारवाई चुकीची असल्याचे स्पष्ट मत सरपंच बिरदवडे यांनी मांडले.
Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा