चाकण स्विफ्ट कार चालकाचा थरार .....
चाकण स्विफ्ट कार चालकाचा थरार .....
दोघांना चिरडले, चार जखमी
अद्याप कुणावरही गुन्हा दाखल नाही
चाकण:
राजगुरुनगर (ता.खेड) येथील यमदूत बनून आलेल्या मद्यधुंद स्विफ्ट कार चालकाने पुणे नाशिक महामार्गावर मोशी (ता.हवेली ) ते चाकणच्या हद्दीत तळेगाव चौका पासून वाकी पर्यंत पादचारी दुचाकीस्वार व अन्य अनेक वाहनांना धडका देत पाच अपघात केल्याचा थरार गुरुवारी (दि.२३) रात्री घडला. यातील थरारात ठार झालेल्या दोन पैकी एकाच मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून आज (दि.२४) सायंकाळी सहा वाजेपर्यंत या बाबत गुन्हा नोंदविण्याचेच काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. येथे इतके अपघात करणारा हा चालक मोशी मध्येही एक अपघात करून पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. मारुती स्विफ्ट घेवून हा थरार करणारा राहुल परशुराम डुंबरे (वय २४, रा. तीन्हेवाडी रोड,राजगुरुनगर, ता. खेड) हा मद्यधुंद कार चालक खेड तालुक्यातील एका बड्या मोबाईल कंपनीचा वितरक असल्याचे समजते.
विश्वनाथ गब्बा मुल्या (वय ४२ , रा. सुंबरेनगर, वाकी,ता.खेड) असे वाकी जवळ अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव असून हॉटेल भरत येथे अब्दुलरहेमान अहमद मुजावर ( वय ४७,रा.थिगळस्थळ, राजगुरुनगर ) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर चाकण येथील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व प्रथम चाकणच्या तळेगाव चौका जवळ उड्डाणपुलावर या भरधाव वाहनाची धडक बसून जागीच ठार झालेल्या इसमाचे , व अन्य जखमींची नावे निषपन्न करण्यात दुसऱ्या दिवशीही पोलिसांना अपयश आले. रात्री नऊ ते सव्वा नऊ च्या दरम्यान चाकण मधून जाणाऱ्या या महामार्गावर घडलेल्या अपघात सत्रामुळे पुन्हा एकदा स्वारगेटजवळील अपघातातील संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची भावना या मार्गावरील अनेक वाहन चालक , पादचारी व नागरिकांनी व्यक्त केली.
या बाबत पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार संबंधित मद्यधुंद स्विफ्ट कार (क्र. एम एच १४ डीटी ८००७) चालक राहुल डुंबरे याने मोशी येथे अपघात करून पुढे बेभान बेगने येत असताना चाकणच्या हद्दीत तळेगाव चौका पासून वाकी पर्यंत पादचारी दुचाकीस्वार अन्य अनेक वाहनांना धडाधड धडका देत तब्बल सात जन जखमी केले , त्यातील दोन जन ठार झाले. सर्व प्रथम तळेगाव चौकातील पादचारी या कारने चिरडला. त्याच्या शरीराचे छिन्नविछिन्न अवयव रस्त्यावर पडले होते. त्याची अद्यापही ओळख पोलिसांना पटविता आली नाही. पुढे अनेक वाहनांना हुलकावण्या व धक्के देत हा कार चालक हॉटेल भरत येथे दोन दुचाक्यांना धडकला . त्यातील अब्दुलरहेमान अहमद मुजावर यांचे नाव निष्पन्न झाले तर दुसऱ्या दुचाकी चालकाचे नाव पोलिसांना समजू शकले नाही. पुढे एक किमी अंतरावर वाकी (ता.खेड) येथे एका पादचार्याला त्याने उडविले त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विश्वनाथ गब्बा मुल्या असे वाकीत ठार झालेल्या पाद्चार्याचे नाव आहे. या पादचार्याला धडक दिल्यानंतर त्याची स्विफ्ट कार एका खड्ड्यात अडकली कार पुढे जात नाही असे लक्षात येताच वाहनातील दोन मुलींनी पुण्याच्या दिशेने पळ काढला तर चालक डुंबरे याने जवळच्या हॉटेल सागर मध्ये लपून बसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाकी मधील ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले. राहुल डुंबरे पोलिसांच्या ताब्यात असून चाकणचे पोलीस निरीक्षक सुशील कदम पुढील तपास करीत आहेत. या घटनेनंतर पुणे नाशिक महा मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान ही संपूर्ण घटना चक्क दडपली जावू शकते का ? किंवा या प्रकाराला पोलीस दप्तरी सौम्य स्वरूप मिळावे यासाठी काही मंडळींनी गुरुवारी रात्री पासून खूप प्रयत्न चालविल्याची चर्चा परिसरात आहे .
---------------------
अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा