कांद्याचा बाजारभाव शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा

चाकणला कांद्याच्या २० हजार पिशव्यांची आवक 
२०० ते ११०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा


चाकण: 
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजारात कांद्याची आवक आता चांगलीच वाढू लागली आहे. शनिवारी (दि.११)  येथील बाजारात तब्बल २० हजार पिशवी कांद्याची आवक झाली. यंदा उशिरा लागवड झालेला कांदा आता बाजरात येण्यास सुरुवात झाली असली बदलते हवामान एकूण उत्पादनाच्या पथ्यावर पडत असल्याच्या असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. चाकण मध्ये कांद्याला प्रती क्विंटलला प्रतवारी नुसार अवघा २०० ते ११०० रुपयांपर्यंत भाव मिळाला असून या पुढे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शनिवार या आठवडे बाजाराच्या दिवशी अचानक कांद्याची आवक वाढून खूप मोठ्या प्रमाणात भाव गडगडू नयेत यासाठी बाजार समिती प्रशासनाने दररोज कांद्याची खरेदी विक्री सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य ११५०  डॉलरवरून १५० डॉलरवर आणल्याने पुढील काळात बाजाराभाव तेजीत राहण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
 खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजारात आज (दि.११)  फुरसुंगी जातीच्या 'गरवा'कांद्याची तब्बल २० हजार पिशवी ( १० हजार क्विंटल ) आवक होऊन अवघा २०० ते ११०० रुपये असा प्रती क्विंटलला भाव मिळाला. सध्या आवक होत असलेला कांदा ओलसर असल्याने व त्यास खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांना भावा अभावी मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याच्या शेतकऱ्यांकडून तक्रारी होत आहेत.  आज येथील बाजारात आवक झालेला कांदा प्रामुख्याने खेड तालुक्यासह शिरूरमावळहवेली आदी भागातून आला असल्याचे बाजार समितीचे सभापती विलास कातोरेसचिव सतीश चांभारे यांनी सांगितले.  बाजारात लाल कांद्याची आवक गेल्या चार आठवड्या पासून वाढतच असल्याने  कांद्याचे भाव खूपच खाली उतरले आहेत. यामुळे ग्राहक सुखावले असलेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच यंदा उशिरा लागवड झालेला गरवा कांदा येत असल्याने व पुढील काळात आणखी रांगडा कांदा बाजारात येणार असल्याने कांद्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य ११५०  डॉलरवरून १५० डॉलरवर आणल्याने निर्यातदारांना भारतातून कांदा निर्यात करणे सोईचे झाले आहे ,त्यामुळे पुढील काळात बाजाराभाव तेजीत राहण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

बाजारभावाचे गणित जुळणार का?  
देशांतर्गत बाजार पेठेत प्रती किलोला पंचाहात्तरी ओलांडलेल्या कांद्याने केंद्र सरकारने मागील काही महिन्यांमध्ये थेट कांदा निर्यात बंद केली नव्हती मात्र एमईपी दरात केलेल्या भरमसाठ वाढीमुळे निर्यातदारांना भारतातून कांदा निर्यात करणे परवडत नव्हते. निर्यातक्षम कांद्याचे किमान निर्यातमूल्य ११५० डॉलर प्रत‌िटन ठेवल्याने भारतातून कांदानिर्यात जवळपास बंदच झाली होती. परिणामीभारतीय कांदा अन्य देशांच्या तुलनेत महाग पडत असल्याने परदेशातून भारतीय कांद्याची मागणी अत्यंत कमी झाली होती . व्यापारीवर्गाने खरेदी केलेला कांदा निर्यात होत नव्हता पर्यायाने कांद्याच्या भावात घसरण झाली होती. मात्र केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य ११५०  डॉलरवरून १५० डॉलरवर आणल्याने कांद्याची निर्यात सुरु झाल्याने कांद्याचे भाव गडगडणार नसल्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र बाजारात सध्या प्रतवारी नुसार मिळणारा २०० ते ११००  रुपयांचा भाव शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा आहे.
---------------------------------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५४ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)