बैलगाडा शर्यतींचा अडथळा झाला दूर ...


बैलगाडा शर्यतींचा अडथळा झाला दूर ...
बैलगाडा शर्यत बंदीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती 
बैलगाडा चालक,मालक,शौकीनांमध्ये उत्साह 
यात्रांची उत्कंठा वाढणार 

चाकण:अविनाश दुधवडे  
 
  गावा कडच्या यात्रा जत्रांमध्ये सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या बैलगाडा शर्यतींवर लादण्यात आलेली बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही अटी व शर्तींवर 
अखेर मागे घेत बंदीला स्थगिती दिली असून यंदा पुन्हा एकदा गावाकडच्या यात्रांमध्ये भिर्र.. झाली उचल की टाक ..हा नेहमीचा घाटातील सूर कानी पडणार आहे. 
 
 बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती मिळाल्याचे वृत्त याभागात येवून धडकताच बैलगाडा चालक आणि मालकांनी आनंद व्यक्त केला आहे.आता यापुढे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार दि.15) दिलेल्या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत आयोजकांना दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालयाने डिसेंबर 2011 मध्ये बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह खेड येथील बैलगाडा मालक रामकृष्ण टाकळकर, आबा शेवाळे,यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने ऍड. संजय खर्डे, ऍड. मार्ला पल्ले व बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने उदय ललित यांनी बैलगाडा शर्यतीवरील स्थगिती उठविण्याबाबत युक्तिवाद केला होता,असे रामकृष्ण टाकळकर यांनी सांगितले.यात्रा जात्रांचा हंगाम असल्याने या बाबतचा निर्णय लवकर व्हावा यासाठी याचिकाकर्ते स्वतः खा.आढळराव यांच्यासह रामकृष्ण टाकळकर, आबा शेवाळे यांच्यासह पुणे ,सातारा,सांगली,कोल्हापूर, व मुंबई येथील छकडी मालक एकत्रित प्रयत्न करीत होते .  
    दरम्यान या बाबत प्रशासनाने कायद्याचा धाक दाखवून अनेकांवर गुन्हे दाखल करून दहशत केल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या सह चाकण मध्ये हल्लाबोल आंदोलन केले होते. राज्य शासनाचे बैलगाडा शर्यती बाबत दुटप्पी धोरण असून न्यायालयात अहवाल पाठविण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप यावेळी खासदार आढळराव यांनी केला होता. याबाबत मागील पंधरवड्यात  खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनीच राज्यातील बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे,आमदार दिलीप मोहिते,आमदार वल्लभ बेनके यांच्या मागणीमुळे शर्यंतीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असून  त्यासाठी पूरक अहवाल ,कायदेतज्ञांचे सहकार्य , कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याने या बाबत सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी तून बैलगाडा चालक मालक शौकीन व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास  खेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना दिला होता , तेंव्हा पासूनच बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होतील अशी अपेक्षा बैलगाडा चालक मालक शौकीन बाळगून होते.
 
 यात्रांची उत्कंठा वाढणार:  
कुल देवतेच्या यात्रां दरम्यान कित्येक वर्षांपासून शर्यती होत आहेत .गेल्या पाच सहा वर्षात अशी अनेकवेळा बंदी आली पण कधी विरोधी तर कधी सत्ताधारी राजकीय पक्षांनी बंदी विरोधात पुढकार घेतला असल्याचे दिसून आले आहे. या शर्यती म्हणजे ग्रामीण भागात मोठी उलाढाल असते. मोठ्या प्रमाणावर खरेदीविक्री होते तसेच अनेकांना या काळात रोजगारही मिळतो, गावातील व्यवसाय वाढतो व त्यामुळेच अद्यापही शर्यतींची लोकप्रियता अफाट आहे. गावोगावीच्या यात्रा जत्रांचा हंगाम तोंडावर असताना बंदी उठविण्यात आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
 -------------------------------------------Avinash Dudhawade, 9922457475
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)