चाकण मध्ये तब्बल तीन हजार बोगस नळ कनेक्शन???


चाकण मध्ये तब्बल तीन हजार बोगस नळ कनेक्शन???
चाकण: अविनाश दुधवडे 
चाकण शहरात गेल्या काही वर्षांपासून पाणी पुरवठ्याचा विषय ऐरणीवर आला आहे. अनियमित ,कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याने आणि बऱ्याचदा दोन-दोन दिवस कोरड्या ठणठणीत राहणाऱ्या नळांच्या तोट्यांनी अनेकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. चाकण ग्रामपंचायतीच्या अनेक ग्रामसभा पाण्याच्या मुद्द्यावर वादळी ठरल्याचे सर्वश्रुत आहेच. यासाठी अन्य बाबी कारणीभूत असल्या तरी शहरातील मोठ्या आकारांची बोगस नळ कनेक्शनही जबाबदार आहेत. शहरातील विविध भागात तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक बोगस नळ कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब उघडकीस येत आहे.

   चाकण शहरातील एकता नगर,कांडगे वस्ती ,मार्केटयार्ड परिसर,शिक्षक कॉलीनी ,आगरवाडी,पठारवाडी,राक्षेवाडी ,आंबेडकरनगर, खंडोबामाळ, बलुत आळी, बाजारपेठ, देशमुखआळी,भुजबळ आळी ,माणिक चौक , राणूबाई मळा ,दावडमळा ,झित्राई मळा , आंबेठाण चौक परिसर आदी चाकण मधील सर्व सहा वार्डांच्या टापूत ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यात राणूबाईमळा व झित्राई मळा परिसरात चाकण औद्योगिक वसाहत व  महाराष्ट्न जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात आलेल्या एमआयडीसी व लगतची 19 गावे या योजनेतूनही पाणी पुरवठाही केला जातो. चाकण ग्रामपंचायती कडे सध्या असलेल्या मिळकतींच्या तुलनेत देण्यात आलेल्या नळजोडण्यांची संख्या लक्षणीय असलेली पहावयास मिळते. चाकण ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या चाकण च्या हद्दीत सुमारे 5 हजार नळकनेक्शनची नोंद आहे. महाराष्ट् जीवन प्राधिकारणाच्या नव्या योजनेतून जुन्याच नागरिकांना  नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या वाकी केटी बंधाऱ्यावरून आलेल्या पाणी योजनेवरील ताण कमी होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पाणी पुरवठ्यावरील ताण काही कमी झाला नाही. कारण सर्व सहा प्रभागांमध्ये मिळून एकूण 5 हजार  नळकनेक्शन्स परवानगीने घेण्यात आली आहेत तर तब्बल तीन हजार पेक्षा अधिक कनेक्शन कुठल्याही परवानगी शिवाय बेमालूम पणे घेण्यात आली आहेत. यातील अनेक कनेक्शन चाकण ग्रामपंचायतीची अर्धा इंचीची मर्यादा ओलांडून चक्क दोन इंची पर्यंत घेण्यात आली आहेत. त्याची कुठलीही देयके भरली जात नाहीत. त्यामुळे हे पाणी नेमके कुठे मुरते हा संशोधनाचा विषय झाला आहे. चाकण ग्रामपंचायतीच्या समोरही नळकनेक्शनची संख्या आणि मिळकती यांमध्ये बरीच तफावत असल्याची वस्तुस्थिती समोर आली असून या बाबत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशी कनेक्शन मिळविणारी बहुतांश मंडळी वजनदार असल्याने या बाबत कारवाई साठी पुढाकार  कुणी घ्यायचा आणि संबंधितांचा रोष कुणी पत्करायचा यामुळे प्रशासनाकडून डोळ्यावर कातडे ओढण्याची भूमिका घेतली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. ही बोगस कनेक्शन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असल्याचे समजते. चाकण मधील अनेक बड्या बिल्डर मंडळींच्या सोसायट्या ,मिळकतींचे पाण्याचे स्रोत नेमके कोणते आहेत ? याचा उलगडा खुद्द चाकण ग्रामपंचायतीलाही करता येत नाही. यामध्ये वैयक्तिक बोअरवेल आणि दुसऱ्याच्या नळांवरुन पाणी भरणाऱ्यांची संख्या एवढी असणे अशक्यप्राय असल्याने चाकण ग्रामपंचायतीने या बाबत नागरिकांच्या यामुळे होणाऱ्या गैरसोयीचा विचार करीत या बाबतचा शोध घेतल्यास पाणीवितरण व्यवस्थेतील बरेच प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. आधीच टोकाचे राजकारण आणि हलाखीची आर्थिक स्थिती यामुळे बेजार असलेल्या ग्रामपंचायतीच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांकडून  नवे झेंगट मागे नको म्हणून सुरु असलेली दडवादडवी सामन्यांवर अन्याय कारक तर बड्या धेंडांना पाठिशी घालणारी ठरणार आहे.
  दरम्यान,सर्वच सहाही प्रभागांत अनेक बोगस नळकनेक्शन्स नियम धाब्यावर बसवून अर्ध्या इंचापेक्षा मोठी कनेक्शन असल्याची चर्चा आहे. आधी परवानगी घ्यायची नाही. साधलं तर ठिक नाहीतर संबंधितांच्या मदतीनं अधिकाऱ्यांना हाताशी धरत 'कार्योत्तर' परवानगी घेत पानं रंगवायची असा उलटा कारभार करण्यासाठी काही मंडळी आग्रह धरीत आहेत. या मनमानीपणामुळेच बोगस नळकनेक्शनचा सुळसुळाट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

अधिकारी पदाधिकारी म्हणतात...
चाकण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी सांगितले की, बोगस नळ शोधमोहिम सुरु करण्यात आली असून अनेक अशा बेकायदा नळजोडण्या मिळून आल्या आहेत. त्याबाबत ग्रामपंचायतीच्या  कार्यकारी मंडळाच्या संमतीने योग्य निर्णय घेण्यात येईल.या बाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. चाकण ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंचांनी याबाबत अद्याप माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले.
---------------Avinash Dudhawade ,chakan 9922457475
---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)