त्याच्याकडे आहे जिद्द आणि अंधश्रध्दा निर्मूलनाचे सामर्थ्य
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी शाळकरी विद्यार्थाचे जादूचे प्रयोग
त्याच्याकडे आहे जिद्द आणि अंधश्रध्दा निर्मूलनाचे सामर्थ्य
चाकण: - अविनाश दुधवडे
समाजात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या गोष्टीचा गैरफायदा घेवून अनेक भोंदू बाबा तंत्र मंत्राचा आधार घेवून विविध चमत्कार दाखवून नागरिकांची दिशाभूल करून पैसे उकळत असतात .या प्रकारामुळे समाजात अंधश्रद्धेचे लोन मोठ्या प्रमाणत पसरत असून विविध समस्या निर्माण होताना दिसून येत आहेत.या समस्येवर मात करण्यासाठी अवघा सोळा वर्षांचा शाळकरी विद्यार्थी असलेला नवोदित जादुगार अरूप कुमार जादूच्या प्रयोगातून नागरिकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करून त्यांना वास्तवतेची जाणीव करून देत आहे.सोळा वर्षांच्या या नवोदित जादुगाराने चाकण सह जिल्ह्याच्या विविध भागात आजवर सुमारे दोनशे पेक्षा अधिक प्रयोग करीत नागरिकांना जागृत करण्याचा एकाकी प्रयत्न चालविला आहे.
अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर बसल्याने समाजात आज जादूटोणा,भूतबाधा,दैवी चमत्कार,भोंदुगिरीचे प्रमाण वाढले आहे.चाकण मध्ये अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी असे अनेक भोंदूबाबा सापळा लावून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.तरीही नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचे अनेक किळस वाणे प्रकार अद्यापही बेमालूम पणे चालल्याचे सर्वश्रुत आहेच.अनेक बाबा मंडळी हातचलाखीचे प्रयोग दाखवून नागरिकांचे आर्थिक शोषण करतात. या प्रकारांचे बळी पडणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागात आजही मोठी आहे.हे लोन शहरी भागातही असले तरी त्याबाबत फारसे कुणी पुढे येवून बोलत नाही.परिणामी या मुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या उग्र रूप धारण करीत आहेत.नागरिकांना या समस्येतून मुक्त करण्यासाठी शासनासह अनिस सारख्या अनेक संस्था प्रयत्न करीत आहेत.आपणही या कार्यात खारीचा वाटा उचलू शकतो याच सामाजिक जाणीवेतून जादुगार अरूप कुमार याने वयाच्या पाचव्या पासून आपले वडील अमितकुमार रॉय कडून ही विद्या शिकून आपल्या शालेय शिक्षणा बरोबरच आपल्या या सामाजिक कार्याचा वयाच्या पाचव्या वर्षांपासून श्री गणेशा केला आहे.इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेत असताना शालेय स्तरावर या लहानग्या जादुगाराने अनेक प्रयोग केले आहेत.लहानग्या जादूगाराच्या या कार्यामुळे लहानग्यांपासून जेष्ठ मंडळींपर्यंत मनोरंजनाच्या बरोबरच चांगल्या पद्धतीने जनजागृती होत आहे.चाकण मधील इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेत इयत्ता दहावी मध्ये शालेय शिक्षण घेत विविध कार्यक्रमांमध्ये सवड काढून जादुगार अरूप कुमार रॉय याने समाज जागृतीचा हा छंद जोपासला आहे.पुण्यातील बंगाली समाज बांधवांच्या अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये ,पुण्यातील कॉंग्रेस भवन,चिंचवड मधील रामकृष्ण मोरे सभागृह,डॉ.आंबेडकर भवन,उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक जिल्हापरिषद शाळा,इंग्रजी माध्यमाच्या शाळा ,अंधश्रद्धेच्या विरोधात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था,संघटना यांच्या माध्यमातून अरूप कुमार याने अनेक प्रयोग केले असून समाज जागृतीचा त्याचा हा प्रयत्न शालेय शिक्षणा बरोबरच पोटतिडकीने सुरु आहे.आपले थरारक प्रयोग दाखविताना जादू म्हणजे निव्वळ हातचलाखी असते त्यात कुठलेही तंत्र मंत्र नसते असा संदेश प्रत्येक ठिकाणी देत असतो.जादुगार अरूप कुमार याचे वडील अमित रॉय चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीत कामगार म्हणून कार्यरत आहेत.हे कुटुंब चाकण मधील एका चाळीत भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे.घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही या नवोदित जादुगाराने चाकण सह जिल्ह्याच्या विविध भागात सामाजिक जाणीवेतून नागरिकांना जागृत करण्याचा चालविलेला प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
-------
Avinash Dudhawade 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा