विवाह नोंदणी शिवाय अनेक जोडप्यांचे संसार


विवाह नोंदणी शिवाय अनेक जोडप्यांचे संसार  
चाकण मध्ये दोन वर्षात अवघ्या 37 विवाह नोंदी 
विवाह होऊनही नोंदणी न केलेली अनेक जोडपी

चाकण: अविनाश दुधवडे 
नातेवाईक, मित्रमंडळींच्या साक्षीने धूमधडाक्‍यात विवाह झाला, पती-पत्नी म्हणून संसारही सुरू झाला; परंतु कायद्याच्या चौकटीतून विचार केल्यास विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही. एखादा पुरुष जेव्हा दुसरे लग्न करतो, पहिल्या पत्नीला सोडून जेव्हा पोटगी व मुलांच्या निर्वाहाचा प्रश्न येतो तेव्हाच लग्नाच्या नोंदीची आठवण येते, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कायद्याच्या जागृतीअभावी वर्षानुवर्षे जोडपी नोंदणी शिवायच संसार करतात. चाकण सारख्या भागात मागील दोन वर्षात शेकडो विवाह झाले असले तरी केवळ 37 जोडप्यांनीच ग्रामपंचायती मध्ये अशा नोंदी करण्याचे धारिष्ट्य दाखविले असल्याची विपर्यस्त स्थिती आहे. 

 ज्या ठिकाणी विवाह होईल किंवा आपण जिथे राहतो त्याच गावात ही नोंदणी करावी असे कोणतेही बंधन नाही. राज्यातील कोणत्याही भागात विवाह झाला, तरी आवश्‍यक ती कागदपत्रे जमा केल्यास विवाह नोंदणी कोणत्याही कार्यालयात करता येते. ज्याप्रमाणे जन्म-मृत्यूची नोंद केली जाते, त्याचप्रमाणे शासकीय दफ्तरी विवाहाची नोंद केली जाते.विवाह नोंदणी हा कायदा सक्तीचा असला तरी हा कायदा तळागाळापर्यंत पोहोचलेला नसून अंमलबजावणीविषयी अंधारच आहे. गळयात हार, मंगळसूत्र, पायात जोडवी , भांगात कुंकू म्हणजे लग्न अशी टीव्ही व सिनेमाच्या प्रभावाने आजच्या तरुण-तरुणींच्या मनात कल्पना आहे. कायद्याच्या जनजागृतीअभावी जेव्हा लग्नात अडचण येते, फसवणूक होते, मुलगी अडचणीत येते त्यावेळी कायदेशीर कामासाठी नोंदणी प्रमाणपत्राची गरज भासते.त्या मुळे विवाह नोंदणी बाबत काही मंडळी जागरूक झाली आहेत.
पुरुष जेव्हा पहिल्या पत्नी पासून फारकत घेण्याचा प्रयत्न करतो, दुसरे लग्न करतो, आणि मग पोटगी व मुलांच्या निर्वाहाचा प्रश्न येतो तेव्हाच लग्नाच्या नोंदीची आठवण होऊन नोंदीसाठी प्रयत्न करणारी अनेक नातेवाईक मंडळी सर्रास दिसतात . तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.कायद्याच्या जागृतीअभावी वर्षानुवर्षे जोडपी नोंदणीशिवायच संसार करतात. या कायद्याविषयी शासन, सरकारी यंत्रणेची अनास्था व बेफिकीरपणा तर आहेच पण समाजदेखील नेहमीप्रमाणे उदासीन आहे. विवाहानंतर विशिष्ट मुदतीतच नोंदणी करणे अनिवार्य नसल्यामुळे लोक विवाहानंतर गरज पडेल तेव्हा येऊन नोंदणी करतात.
   
 या बाबत चाकण चे ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी सांगितले की,प्रत्येकाच्या चालीरितीनुसार अनेक विवाह होत असले, तरी या विवाहांची प्रत्यक्ष नोंद होणे आवश्यक आहे अद्याप नोंदी होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे; मात्र सध्या याबाबत जागरूकता वाढते आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियमा नुसार ही नोंदणी करण्यात येते.चाकण मध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता ,आणि प्रत्यक्ष वधू-वर आणि तीन साक्षीदार हजर असल्यास विवाह नोंद करण्यात येते.शहरी भागांत विवाह निबंधक ,तालुका स्तरावर सबरजिस्ट्रार,आणि ग्रामीण भागांत ग्रामपंचायतीत ही नोंदणी करता येते . विवाह नोंदणीचे महत्त्व माहीत नसणे, नोंदणी करण्याबद्दल अपुरी माहिती, काही गैरसमज अशी काही कारणे ही नोंदणी न करण्यामागे असतात. सद्य स्थितीत ही नोंदणी करणे आवश्‍यक आहे; पण अनिवार्य नाही अशी नागरिकांची धारणा आहे.त्यामुळे अनेक जन चालढकल करतात ,व गरज पडल्यानंतर नोंदीसाठी धावाधाव करतात.

विवाह नोंदीचा असाही धसका...:
  विवाह नोंदणीच्या भितीने चाकण मधील एका नवरोबाला ग्रासल्याने एक विक्षिप्त प्रकार उघडकीस आला आहे.विवाह नोंदणीच्या या कायद्याच्या कचाट्यात अडकण्याच्या भीतीने चाकण ग्रामपंचायती मध्ये चक्क एका नवरोबाने माझे फसवून लग्न लावले असून ,माझ्या विवाहाची नोंद करू नका असा अर्ज सोमवारी (दि.4 मार्च)दिला आहे. संबधित 21 वर्षीय युवकाने आपल्या अर्जा सोबत प्रतिज्ञा पत्र दिले असून आपल्याला पळवून नेवून ,ओलीस ठेवून,ब्लॅकमेल करून आळंदी येथे हा विवाह लावून देण्यात आला असल्याचे म्हटले आहे.  अर्ज करताना या युवकाने केलेले आरोप हा सध्या हा प्रकार या भागात चर्चेचा विषय झाला असून या निमित्ताने विवाह नोंदणीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत कायदेशीर बाबी तपासून ,दोन्ही कडील मंडळी समोरासमोर आल्यानंतर नोंदी बाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे चाकण ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------------------------------------------Avinash Dudhawade, chakan 9922457475
-----------
-----------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)