पुणे -नाशिक हे महत्वाचे जिल्हे जोडले जाणार रेल्वेने


पुणे -नाशिक हे महत्वाचे जिल्हे जोडले जाणार रेल्वेने 
मात्र रेल्वे नक्की रुळावर येणार तरी कधी ?
उत्तर पुणे जिल्ह्याचा रेल्वेचा दीड तपांचा दुष्काळ संपणार 

चाकण: अविनाश दुधवडे 

 औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून चाकण सह खेड तालुका विकसित होत आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून ओळखल्या गेलेल्या या तालुक्याच्या भूमीतून वेळोवेळी मागणी होऊनही अद्याप रेल्वे धावली नव्हती . ते अपुरे स्वप्न आता पुन्हा या नव्या रेल्वेमार्गाची घोषणा अखेर रेल्वे मंत्र्यांनी केल्यानंतर पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हे स्वप्न सत्यात उतरणार असल्याचे निश्‍चित असले, तरी त्यासाठी कालावधी किती लागतो, हा प्रश्न सर्वांनाच अधिक सतावणारा आहे. 

 चाकण परिसर हा औद्योगिकदृष्ट्या प्रगतिपथावरील भाग म्हणून ओळखला जात असताना, खेड तालुक्यातील सेझच्या उभारणीमुळे या विकासाला मोठाच वेग येत आहे. राज्य व केंद्र शासनाकडून  याभागात आणखी विविध विकास प्रकल्प आणण्याचे प्रयोजन वेळोवेळी समोर येत असले तरी त्यासाठी आता जागेची वाणवा भासू लागली आहे. चाकण करांसह खेड तालुक्याचे व उत्तर पुणे जिल्ह्याचे रेल्वेचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होणार याची चर्चा बहुप्रतीक्षित पुणे- नाशिक नव्या रेल्वेमार्गाची घोषणा अखेर रेल्वे मंत्र्यांनी केल्यानंतर पुन्हा सुरू झाली आहे. यापूर्वीच रेल्वे सेवा सुरू झाली असती तर तालुक्याच्या आज झालेल्या विकासाला अधिक वेग आला असता. औद्योगिकीकरण, शेती, व्यापार यासाठी नाशिक-पुणे रेल्वे झाल्यास या सुवर्ण त्रिकोणातील उत्तर पुणे जिल्ह्यातील उदयोन्मुख प्रमुख शहरे जोडली जातीलच; शिवाय चाकण पर्यंतच्या सुवर्ण चौकोनाचे चौथे टोक असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या  परिसरालाही त्याचा फायदा होईल. 
  उत्तर पुणे जिल्ह्यात शेतीमाल - भाजीपाल्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. तसेच शेजारच्या संगमनेर व अकोला तालुक्यातील भाजीपालाही सिन्नरमार्गे सुरत, मुंबई येथे पाठविला जातो. मात्र वेळेत हा भाजीपाला न पोहोचल्यास शेतकरी व व्यापार्‍यांचा तोटा होतो. कांदा, द्राक्ष, डाळींब व कापूस हा माल निफाड, लासलगाव व नाशिकरोड येथून रेल्वेने पाठवावा लागतो. रेल्वे अभावी निफाड, लासलगाव व नाशिकरोड सह उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, उद्योजकांची होणारी परवड वेळोवेळी समोर आली आहे. सध्या रेल्वेने पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी कर्जत, पनवेल, कल्याणमार्गे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो अशी प्रवाशांची तक्रार होती .त्यामुळे सध्याच्या पुण्याहून नाशिकला जाणार्या रेल्वे मार्गाला  प्रतिसाद मिळत नव्हता . नवा लोहमार्ग पुण्याहून चाकण ,राजगुरूनगर, मंचर, आळेफाटा, नारायणगाव, संगमनेर असा असणार आहे. त्यामुळे रेल्वेमार्गे पुणे- नाशिक हे अंतर 265 किलोमीटरचे होणार आहे. त्यामुळे कर्जत, पनवेल, कल्याणमार्गे होणारा प्रवासाचा वेळही वाचणार आहे त्याच प्रमाणे उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील प्रवाशांना त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना या नव्या मार्गाचा मोठय़ा प्रमाणावर फायदा होऊ शकणार आहे. पुणे व नाशिक ही राज्यातील महत्वाची शहरे व जिल्हे असून हे जिल्हे अत्यंत झपाटय़ाने विकसित होत आहेत. या शहरांची तसेच या रेल्वे मार्गावर येणाऱ्या परिसरात सर्वच क्षेत्रात प्रगती होण्याच्या दृष्टीने ही शहरे मुंबई बरोबरच एकमेकांशी रेल्वेने जोडली जाणे आवश्यक असल्याचा सूर गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडूनही आळवला जात होता. आता मात्र रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी रेल्वेच्या पुरवणी अंदाजपत्रकात बुधवारी (दि. 6) पुणे- नाशिक या रेल्वे मार्गाची घोषणा केली व त्यामुळे या रेल्वे मार्गातील अडथळे दूर झाल्याचे मानण्यात येत आहे. पुणे -नाशिक या रेल्वे या प्रकल्पाच्या एकूण आर्थिक खर्चाच्या 50 टक्के सहभाग केंद्र शासनाचा असेल आणि उर्वरित 50 टक्के आर्थिक सहभाग राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते , मात्र आता राज्यातील भीषण दुष्काळी स्थितीत राज्य शासनाला हे तातडीने शक्य होणार का ? हा देखील संशोधनाचा भाग आहे .


पुणे नाशिक रेल्वेच्या मागणीचा खडतर प्रवास  

 
 यापूर्वी मार्च 2008 मध्ये पुणे- नाशिक मार्गावर रेल्वे सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने मोठा गाजावाजा करून सांगण्यात आले होते.  मात्र हा मार्ग पुण्याहून लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याणमार्गे ही रेल्वे नाशिक असा करण्यात आल्याने व थेट पुणे ते चाकण -राजगुरुनगर -मंचर नारायणगाव ते पुढे नाशिक हा मार्ग तोट्याचा ठरेल असे सांगण्यात आल्याने या भागातील लाखो जनतेची घोर निराशा झाली होती.  त्यामुळे तत्कालीन रेल्वे मंत्री  लालूप्रसाद यादव यांनी पुण्याहून लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याणमार्गे  नाशिक ही रेल्वे सुरु करून सर्वांच्याच तोंडाला पाने पुसली अशी जनभावना झाली होती . 
त्या नंतर तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी 2009 मध्ये पुणे- नाशिक मार्गासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 53 नव्या रेल्वे मार्गांना  बजेटमध्ये मंजुरी देताना यात बहुप्रतिक्षित पुणे - नाशिक मार्गाला हिरवा कंदील दिला होता . 265 किलोमीटरच्या या मार्गासाठी 1 हजार 44 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते, मागील वर्षीच्या बजेट मधेही याबाबतचा उल्लेख करण्यात आला होता. प्रत्यक्षात उत्तर पुणे जिल्ह्यातून हा मार्ग नेण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाच्या पलीकडे या मार्गाने काम जाऊ शकले नाही आणि रेल्वे मार्ग होण्याच्या दृष्टीने काडीही हलविण्यात आली नव्हती. मात्र आता मात्र रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी रेल्वेच्या पुरवणी अंदाजपत्रकात बुधवारी (दि. 6) पुणे- नाशिक या रेल्वे मार्गाची घोषणा केली व त्यामुळे या रेल्वे मार्गातील अडथळे दूर झाल्याचे मानण्यात येत आहे .

...तर पुणे-नाशिक प्रवास दोन तासांमध्ये : 
पुणे-नाशिक रेल्वे प्रवास अवघ्या दोन तासात होऊ शकतो. तसेच सध्या ज्या 266 किलोमीटर लांबीच्या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे तो मार्ग 170 किलोमीटर लांबीचा होऊ शकतो, असे हि जाणकारांकडून बोलले जात आहे.  सध्या जो रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे तो नाशिकरोड, सिन्नर, नांदूरशिंगोटे, संगमनेर, पिंपळगाव, नांदूर, बोटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर ,चाकण ,देहूरोड, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी, खडकी, शिवाजीनगर, पुणे स्टेशन असा मार्ग आहे. हा मार्ग 265 कि.मी.चा आहे. मात्र रेल परिषदेच्या वतीने जो मार्ग सुचविण्यात आला आहे तो फक्त 165 कि.मी.चा आहे. त्यामुळे या मार्गाचा विचार करण्यात यावा, अशी मागणी रेल परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या पूर्ण मार्गाची लांबी 266 कि.मी. असून कार्यपूर्तीचा कालावधी तब्बल आठ वर्षे आहे. त्यापेक्षा रेल परिषदेने अभ्यास करून नाशिक-सिन्नर-देहूरोड -पुणे असा 170 कि.मी. लांबीचा मार्ग निर्देशित केला आहे. यामुळे नाशिक-पुणे प्रवास अवघ्या दोन तासात होऊ शकेल. शिवाय या मार्गावरील जास्तीत जास्त जमीन ही शासकीय मालकीची असल्याने भूसंपादनासाठी जास्त वेळ लागणार नाही,असे रेल परिषदेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.  या बाबत खासदार आढळराव यांनी सांगितले की , रेल्वेच्या तंत्रज्ञानी सर्वेक्षण करून या मार्गावर शिक्कामोर्तब केले असले तरी प्रत्यक्ष प्रकल्प उभारणी पूर्वी पुनसर्वेक्षण करण्याची मागणी आपण करणार आहोत. 

या घोषणेत नवीन काहीही नाही : खा. आढळराव 
पुणे-नाशिक रेल्वे ला मागील वर्षीच मान्यता देण्यात आलेली होती, केवळ रेल्वे अंदाजपत्रकात महाराष्ट्राला आणि पुण्याला ठेंगा दाखविण्यात आल्याची ओरड झाल्याने नागरिकांकडून  तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. देशाच्या इतर विभागाला नव्या गाडय़ा किंवा विकासासाठी निधी उपलब्ध होत असताना रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट आणि पुणे विभागाला डावलले जात असल्याचा नाराजीचा सूर उमटू लागल्याने रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी रेल्वेच्या पुरवणी अंदाजपत्रकात आपल्या भाषणात गेल्या वर्षीच मंजूर झालेल्या या मार्गाची घोषणा केल्याची टीका शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 1 हजार 866 कोटी रूपये असून त्याचा निम्मा वाटा महाराष्ट्र राज्य सरकार उचलणार असल्याचे या पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते . 265 किलोमीटर पेक्षा कमी लांबीचा हा मार्ग होऊ शकतो का ? यासाठी  पुनसर्वेक्षण करण्याची व लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण  करण्याची मागणीही खासदार आढळराव यांनी केली आहे. 

--------- Avinash L. Dudhawade ,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)