लग्नाचे निमंत्रणही आता 'एसएमएस'व 'रेकॉर्डिंग कॉल' वरून
निमंत्रणाची पारंपारिक पद्धत पडतेय मागे
चाकण: महेंद्र दुधवडे
लग्नाचे निमंत्रण घेउन लोक बारश्याला नाही गेले म्हणजे मिळवलं ... असं लोक पूर्वी उपहासाने म्हणत असत. कारण पूर्वी दळणवळणाची साधने मर्यादित होती त्यामुळे गावोगावी पाहुणे, आप्तेष्टांना लग्नपत्रिका पाठविणे सर्वात जोखमीचे काम मानले जात असे .लग्नसोहळा हा जीवनातील आनंदाचा आणि अविस्मरणाचा सोहळा असला तरी तो धावपळीचा सोहळा असतो.आता आधुनिक काळात मात्र परिस्थिती बदलली आहे. लग्नाचे निमंत्रणही आता मोबाईल 'एसएमएस'व 'रेकॉर्डिंग कॉल' वरून जात असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार आणि धावपळीचे युग यामुळे घरी जाऊन लग्नाचे निमंत्रण देण्याची पारंपारिक पद्धत काहीशी मागे पडू लागली आहे.
चाकण सह लगतच्या ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी चांगली आर्थिक परिस्थिती असणारी,राजकारणातील पदाधिकारी,दिग्गज मंडळी अशी हायटेक निमंत्रणे पाठवीत असत .आता मात्र या सुविधा महागाईच्या जमान्यातही काहीशा स्वस्त झाल्याने सर्रास पणे भ्रमणध्वनीतील संदेश यंत्रणेचा व व्हाईस रेकॉर्डिंग कॉलही वापर होत आहे. कुठे जोड म्हणून तर कुठे पर्याय म्हणून भ्रमणध्वनीद्वारे लग्नपत्रिका एसएमएस करण्यात येत आहे. स्वस्त आणि विश्वासार्ह माध्यम म्हणून भ्रमणध्वनीतील संदेश यंत्रणा व व्हाईस रेकॉर्डिंग कॉलही पुढे येत आहे. आधुनिक युगात माणूस एकमेकांपासून रोजगारानिमित्त दूर अंतरावर गेला. पण, त्यांच्यातील स्नेहबंध जपण्याचे काम भ्रमणध्वनीने केले आहे. घरचे लग्न सर्वांसाठीच जिव्हाळ्याची बाब असते. दूर अंतरावरील नातेवाईक, मित्रमंडळीने विवाहसोहळ्यात उपस्थित राहावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, लग्नपत्रिका पाठवावी, तर टपालखात्याच्या कृपेने वेळेवर पोचेलच याची खात्री नसते. त्यामुळे ग्रामीण भागातही आता भ्रमणध्वनीतील संदेश यंत्रणेतच लग्नपत्रिका तयार करून आप्तांना पाठविली जात आहे. लग्नपत्रिकेपेक्षा वेगवान आणि स्वस्तात हे काम होत असल्यामुळे याचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे.
काही वर्षांपूर्वी वैशिष्ट्यपूर्ण लग्नपत्रिका छापण्याची "क्रेझ' होती. राजेशाही पद्धतीच्या पत्रिका ते नव्या तंत्राच्या आधारे केलेल्या आकर्षक पत्रिका असे त्याचे स्वरुप होते. पत्रिकेत भरगच्च मजकूर असायचा. संयोजकांच्या नावांची भलीमोठी यादी व ठरलेली वाक्यरचना अशा साचेबद्ध पद्धतीने पत्रिका छापली जात होती. या पत्रिका प्रत्यक्ष घरी जाऊन नातलगांना हातात देत लग्नास येण्याचे आग्रहपूर्वक निमंत्रण दिले जायचे. पुढे या पत्रिका पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे पाठविल्या जाऊ लागल्या. ही प्रक्रिया सुद्धा वेळखाऊ वाटू लागली म्हणून की काय आता निमंत्रणासाठी "एसएमएस'चा वापर केला जाऊ लागला आहे. भलीमोठी निमंत्रण पत्रिका आता "एसएमएस'मध्ये बसवून पाठविण्याची नवी पद्धत चाकण सह लगतच्या पंचक्रोशीत सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
याविषयी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या काही संबंधितांच्या नातेवाईक मंडळीनी सांगितले की, लग्नपत्रिका टपालखात्याने पाठवावी, तर तिला पोचायला किती दिवस लागतील, याचा नेम नाही. आपल्याला लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत यादीमधून सुटलेल्या लोकांची नावे आठवतात तर काही जवळची मंडळी निमंत्रण देण्याची राहून जातात. त्यामुळे त्यांना लग्नाला निमंत्रित करण्यासाठी टपालखात्याचा वापर करणे शक्य होत नाही. भ्रमणध्वनी करावा तर लग्नाच्या घाईगडबडीत तेही फारसे शक्य होत नाही. अशा स्थितीत भ्रमणध्वनीतील संदेश यंत्रणेवर किंवा एकाचवेळी रेकॉर्डिंग केलेल्या व्हाईस कॉल वरून अनेक लोकांना लग्नाचे निमंत्रण पाठविता येते. हे सोपे व वेळेची बचत करणारे आहे. तसेच विश्वासार्हही आहे. भ्रमणध्वनी आता तळागाळापर्यंत पोचला आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत सहज निरोप पोचविण्याचे काम वेगवान पद्धतीने पूर्ण होते. मात्र लग्न सोहळ्यामुळे एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याऱ्या लग्नसोहळ्याच्या कारभाऱ्याच्या या नामी शोर्टकट मुळे मोबाईल च्या मेसेज इनबॉक्स मध्ये धडकणाऱ्या संदेशाने व एकाचवेळी अनेकांना प्राप्त होणाऱ्या रेकॉर्डिंग व्हाईस कॉल मुळे मोबाईलधारक हैराण झाले आहेत.
------- mahendra dudhawade ,chakan 9850260837
-------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा