कारभारी बदलासाठी चाकणला सदस्यांचे लॉबिंग
मोर्चे बांधणीचा काहींचा प्रयत्न
चाकण: अविनाश दुधवडे
फेब्रुवारी पर्यंत चाकण शहराला नगरपालिका प्रशासन लागू होईल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत होती, त्यामुळे आधीच ठरल्या प्रमाणे ग्रामपंचायतीतील पदाधिकारी बदलाच्या हालचाली थंडावल्या होत्या. परंतु, नगरपालिकेचे घोडे मंत्रालय स्तरावर अडकल्या मुळे पदाधिकारी बदलासाठी आग्रही असणारे काही सदस्य पुन्हा सरसावले आहेत. फेब्रुवारी 2013 ला अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीचे कारभारी बदलासाठी जास्तीत जास्त सदस्यांची मने वळवून लॉबिंग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नगरपालिका आणखी नक्की किती लांबणार याकडे काही मंडळीचे लक्ष लागले असून नगरपालिका लांबण्याची शक्यता गृहीत धरून काही सदस्यांनी पदाधिकारी बदलण्यासाठी चोरी-चोरी ,चुपके-चुपके मोर्चबांधणी सुरू केली आहे.विद्यमान पदाधिकारी बदलावेत, यासाठी काही सदस्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार पुढाकार घेतला होता. चाकण च्या पदाधिकाऱ्यांना आता अडीच वर्ष पूर्ण झाले आहे.त्यामुळे त्यांचे राजीनामे घेतले जावेत, अशा मागणीचा सूर काही सदस्यांनी लावल्याची चर्चा आहे. यापूर्वीही तशी मागणी काही सदस्यांकडून होत होती. परंतु, नगरपालिकेच्या जोरदार हवेमुळे या मागणीकडे अन्य सदस्यांसह सर्वानीच दुर्लक्ष केले होते.त्यांनतर बदलाच्या हालचाली थंडावल्या होत्या. खुद्द खेड चे आमदार दिलीप मोहिते, या विभागाचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी चाकणला कधीही नगरपालिका अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट पणे सांगितले असले तरीही नगरपालिका येथे नक्की कधी लागू होणार हे अद्यापही स्पष्ट होऊ शकत नसल्याने सदस्यांनी पुन्हा हालचाली गतिमान केल्या आहेत. आता या सदस्यांच्या मागणीला नेत्यांचा कितपत प्रतिसाद मिळेल यावरच पदाधिकारी बदलाचा निर्णय अवलंबून आहे.
शासनाने चाकण मध्ये नगरपालिका लागू करण्याची उद्घोषणा केली असून प्रस्ताव आता विधी व न्याय विभागातून अंतिम आदेशासाठी मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे लोकप्रतिनिधी संबंधित विभागाचे मंत्री ,प्रशासन यांच्याकडून अधिकृत पणे सांगण्यात येत आहे.त्यामुळे चाकण ची ग्रामपंचायत पुढील काही महिन्यांमध्ये संपुष्टात येणार आहे. यामुळे येथील सरपंचासह पदाधिकारी, सदस्यांची पदे देखील रद्द होणार आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून स्वत:चे कायदे-कानून असणाऱ्या या ग्रामपंचायतींच्या अधिकारां वर प्रशासक नियुक्ती नंतर गदा येणार असली तरी तत्पूर्वी जाता-जाता या पदांवर आपली अखेरची वर्णी लावून घेण्यासाठी काही मंडळी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील असल्याची चर्चा ग्रामपंचायतीच्या वर्तुळात होत आहे.
कार्यकाल औटघटकेचा ठरला तर...
लाख दोन लाख रुपये देतो ,सोबत परराज्यात फिरून येऊ. तुमचे मौल्यवान मत फक्त मला द्या... अशा ऑफर गाव पातळीवरील सरपंच-उपसरपंच पद मिळविण्यासाठी देण्यात येतात असा इतिहास चाकण च्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांनी पहिला-अनुभवला आहे .आताही अशा अनेक ऑफर देणाऱ्यांची कमी येथे नाही .मात्र या पुढचा किती काळ पदाधिकारी म्हणून मिळणार याची शाश्वती कोणालाही नाही .मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेशानंतर येथे अचानक नगरपालिका लागू होवून प्रशासक राजवट आल्यास केलेला खर्च वाया जावून सरपंच- उपसरपंच म्हणून मिळालेला कार्यकाल औट घटकेचा ठरू शकतो . अवघ्या दोन-चार महिन्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते.म्हणून पदाधिकारी बदलाची मागणी होत असली तरी या बाबत फारशी रिस्क घेण्याचे धारिष्ट्य कोणीही पुढे येवून दाखवीत नसल्याचे चित्र येथे सध्या तरी पहावयास मिळत आहे.
------------------------------------- Avinash Dudhawade, chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा