बेपत्ता असलेल्या इसमाचा खून करून मृतदेह जाळला
बेपत्ता असलेल्या इसमाचा खून करून मृतदेह जाळला
चाकण मधील धक्कादायक घटना
तिघे ताब्यात ; जमीन व्यवहाराची किनार
चाकण :
चाकण मधून वीस दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या इसमाचे जमिनीच्या व्यवहारातून अपहरण करून तिघांनी संगनमताने त्याचा खून करून मृतदेह पेट्रोल ओतून पिरंगुट (ता. मुळशी) येथे जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे चाकण परिसरात खळबळ उडाली आहे.
किरण गोरक्षनाथ धाडगे ( वय ३७, रा. भुजबळआळी चाकण ता. खेड,जि. पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दतात्रेय उर्फ बाळू लक्ष्मण खेडकर ( वय २५, रा.चाकण भुजबळआळी, ता. खेड ) याच्यासह गणेश दतात्रेय सलगर (वय २७ ) व परेश शेखर नायडू (वय २३ दोघेही रा. किवळे, ता.हवेली , जि. पुणे ) यांच्यावर आज (दि.२) खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या बाबतचे वृत्त असे कि, किरण धाडगे हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होता. तो बाळू खेडकर यांची चाकण मधील एक ४६ गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी इच्छुक होता. सदरची जमीन किरण आपल्या अन्य नातेवाईकांना फसवून खरेदी करेल असा संशय खेडकर याला होता. त्याच रागातून त्याने ९ जानेवारी २०१४ रोजी गणेश सलगर व परेश नायडू यांच्या साथीने जमीन पाहण्याच्या बहाण्याने किरण यास आपल्या वाहनातून (स्विफ्ट कार) पिरंगुट (ता. मुळशी) ताम्हणी घाट येथे नेले. तेथे किरण याचे हातपाय व तोंड वरील तिघांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने घट्ट बांधले ,कापडाच्या साह्याने नाक तोंड बांधल्याने किरण याचा मृत्यू झाला. किरण याच्या शरीराची हालचाल बंद झाल्याचे पाहून त्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी लगत असलेल्या एका पंपावरून दोन बाटल्यांमध्ये पेट्रोल आणून भर दुपारी तीन वाजता ताम्हणी घाटालगतच्या निर्जन भागात मृतदेह जाळून टाकला व तिघांनी येथून पोबारा केला. त्यानंतर किरण यांच्या पत्नी विद्या यांनी सर्वत्र शोध घेवूनही काहीही तपास लागत नसल्याने चाकण पोलिसांत १२ जानेवारी २०१४ रोजी किरण बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. पिरंगुट भागात मिळालेल्या किरण याच्या मृतदेहाची नातेवाईकमंडळीनी खातरजमा केली होती मात्र मृतदेह ओळखता आला नव्हता. पौड पोलिसांनी हा मृतदेह अनोळखी असल्याचे सांगितले होते. अखेर मोबाईल टोवर लोकेशनच्या आधारावर चाकण पोलिस दलातील पोलीस हवालदार अनंता शिंदे यांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे . किरण याच्या जळालेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल मात्र अद्याप प्राप्त झाला नसल्याचे समजते. दतात्रेय उर्फ बाळू लक्ष्मण खेडकर याने अपहरण खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या या धक्कादायक प्रकाराचे कथन खुद्द पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर केल्याचे पोलिसांनी सांगितले. या बाबत विद्या किरण धाडगे ( वय २५, रा. भुजबळआळी चाकण ता. खेड ,जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अनंता शिंदे व त्यांचे सहकारी करीत आहेत. जमिनीच्या वादातून अपहरण आणि हत्या झाल्याच्या या धक्कादायक प्रकाराने या भागात खळबळ उडाली आहे.
-----------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा