खेड तालुक्यात दलित -आदिवासींच्या जमिनींची लुट सुरूच ...

खेड तालुक्यात दलित -आदिवासींच्या जमिनींची लुट सुरूच ...
जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा
चाकण: वार्ताहर
   जमीन घोटाळ्यांमुळे खेड तालुक्यातील अनेक जन  त्रस्त असून दररोज या संदर्भात कोणत्या ना कोणत्या घटना समोर येत आहेत . गेल्या काही वर्षांत पुण्यालगतच मोठ्या औद्योगीकरणाचा परिसर म्हणून चाकण परिसराचा  अफाट वेगाने विस्तार सुरू आहे. याचा परिणाम केवळ जमीन बाजारावरच नव्हे तर एकंदर अर्थकारण व राजकारणावर पडला असून राजकीय नेते नोकरशाही-बिल्डर-गुन्हेगार-भूमाफिया यांची जबरदस्त चांडाळ चौकडी वारंवार विविध कुकर्मांनी चव्हाट्यावर येत आहे.  भूमाफियांच्या चांडाळ चौकडीच्या या हालचालीने समस्त समाजाला वेठीस धरून त्यातून प्रचंड माया मिळवून राजकारण व अर्थकारणाचा ताबा घेतला आहे.  त्यात सत्ताधारी पक्षांच्या मंडळींचा सहभाग मोठा असल्याची बाब वारंवार समोर येत असून पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे विद्यमान सरचिटणीस असलेल्या एका माजी जिल्हा परिषद सदस्यावर दलितांची जमीन बळकावल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
   या बाबत एका मागासवर्गीय युवकाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे किजिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या संबंधित माजी जिल्हा परिषद सदस्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी जीवे मारण्याची धमकी देत संबंधित दलित कुटुंबातील काही जणांना  व चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ आणून गंभीर मारहाण करीत वाकी खुर्द (ता. खेड ) येथील जमीन गट नं. १ क्षेत्र ४८ आर. ही इनाम वर्ग ६ ब ची जमीन जिल्हाधिकारी यांच्या कुठल्याही परवानगी शिवाय खरेदी केली. व उरलेले जमिनीचे क्षेत्रही  अन्य मंडळीनी द्यावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून शिवीगाळ दमदाटी चालविली आहे. या बाबत गेल्या काही दिवसांपासून या अन्यायाविरोधात संबंधित दलित कुटुंबीयांनी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील व चाकण पोलिसांकडे  पाठपुरावा केला होता. त्या नंतर अखेर दोन दिवसापूर्वी (दि.१० फेब्रुवारी ) नितीन मुकुंद गायकवाड (वय ३१ ,रा.वाकी,खुर्द,ता. खेड ) यांच्या फिर्यादीवरून पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे विद्यमान सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्यांसह चौघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान या भागातील आदिवासी- मागासवर्गीय मंडळींच्या तब्बल शेकडो एकर जमिनींबाबत असे अनेक प्रकार सर्रास पहावयास मिळत आहेत. गोर गरिबांच्या  या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे .  या भागातील शेकडो एकर आदिवासी समजाच्या जमिनी अक्षरशः फसवणूक करून गिळंकृत  करण्याचा डाव अनेकांनी गेल्या काही वर्षांपासून चालविला आहे. आपल्या गळाला लागलेल्या येथील या  बांधवाना लाख-दोन लाखांमध्ये गप्प करून शेकडो एकरां पैकी त्यांच्या नावावर असलेल्या एकर - दोन एकर जमिनींचे व्यवहार करून घेण्यात आले आहेत. आदिवासींच्या जमिनी बळकावल्या प्रकरणी अनेक बड्या मंडळीवर गुन्हेही दाखल झाले असून जमीन बळकावण्याचा सिलसिला मात्र कमी झालेला नाही. या संपूर्ण परिसरात दलित- आदिवासींच्या जमीन व्यवहाराची चौकशी करून त्यातील अनेक बेकायदा व्यवहारांवर  कारवाई करण्याची मागणी होत आहे.
  खऱ्याचे खोटे अन लाबाडाचे तोंड मोठे :
  शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे जमीन हे मोक्याचे साधन बनले. परिणामी सर्व आथिर्क व राजकीय निर्णय नफेखोरीभोवती केंदित झाले आणि ‘खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं’ या म्हणी प्रमाणे अनेकांनी जमिनीतून मिळणाऱ्या पैशांमुळे आपल्या वाटा वाकड्या केल्या. जमीन,प्लॉटफ्लॅटच्या आकाशाला टेकलेल्या किमती पाहता चाकण पंचक्रोशीत जमीन बळकावण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. शासनाच्या विविध विभागांच्या संगनमताने  फसवणूकअफरातफरजागा बळकावण्यासाठी गुंड आणि प्रशासनाची घेतली जाणारी मदत आणि थेट राज्यातील अनेक आमदार-खासदारां पासून मंत्र्यांच्या या भागात जमिनी घेण्याच्या अट्टहासाने जमिनी बळकावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.  गेल्या काही वर्षांत बहुसंख्य मंत्री व सत्ताधारी व विरोधी पक्षांचे  लोकप्रतिनिधी तसेच विकासक व बिल्डर्स यांचे पाठीराखे जमीन जुमल्याचे व्यवहार अथवा ते 'नियमित करण्यात गर्क असून ही सरकार दरबारची मुख्य राजकीय उलाढाल आहे  वर्षाला किमान काही कोटी रुपये या व्यवहाराच्या द्वारे मिळविणारी सर्वपक्षीय राजकारणी मंडळी येथे आहेत. जमीन व्यवहार हे मोठे घबाड हाती आल्याने राजकारणाचा संबंध सूर व नूर या भागात बदलला आहे. 
अविनाश दुधवडे (पत्रकार)  
-------------------------
By :Avinash Dudhawade,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)