...तर तुमचा निर्णय चुकीचा ठरणार नाही ; आर.आर.पाटील
...तर तुमचा निर्णय चुकीचा ठरणार नाही ; आर.आर.पाटील
अशोक खांडेभराड यांना चुचकारले
चाकण: वार्ताहर
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी उपजिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड यांनी आज (दि.२) कडाची वाडी (ता. खेड) येथे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वर जोरदार टीका केली; तर दस्तुरखुद्द खुद्द गृहमंत्री पाटील यांनी तालुक्यातील तुमच्या सहकार्यांसमवेत कार्यक्रम लावा मी स्वतः उपस्थित राहतो , आणि तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असे कधीही वाटू देणार नाही असे खुले आवाहन केले. त्यामुळे आता खांडेभराड राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून त्यांच्या अधिकृत राष्ट्रवादी प्रवेशानंतर खेड तालुक्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कडाची वाडी (ता. खेड) येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आले होते. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील पंचायत समितीच्या सभापती कल्पना गवारी, उपसभापती सुरेश शिंदे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव डॉ. शैलेश मोहिते, शिरूर बाजार समितीचे मंगलदास बांदल , खेड बाजार समितीचे सभापती विलास कातोरे,जिल्हा राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष किरण मांजरे, खजिनदार प्रताप खांडेभराड,कडाची वाडीच्या सरपंच शोभा कड, उपसरपंच गणेश पर्हाड आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी , जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे अधिकारी , पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. गेल्या दिवसांपासून या भागात अशोक खांडेभराड यांच्या हकालपट्टी नंतर शिवसेनेत नाराजी उफाळून आली होती . खांडेभराड २५ वर्षापासून शिवसेनेत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती. निष्ठावान शिवसैनिकांवर हा अन्याय असून, त्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जबाबदार आहेत, असा आरोप स्वत: खांडेभराड व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. त्यामुळेच खांडेभराड यांनी आपल्याच गावात राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते विकास कामांची उद्घाटने करवून घेत अनेक संकेत दिले आहेत.
या वेळी सर्व प्रथम बोलताना कडाची वाडीचे उपसरपंच गणेश पर्हाड यांनी अशोक खांडेभराड यांच्यावरील अन्यायाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. तद्नंतर भाषणासाठी उभे राहिलेल्या अशोक खांडेभराड यांनी खासदार आढळराव यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले कि, मी येथील उद्घाटनांसाठी शिवसेनेच्या नेत्यांची तारीख घेतली होती, मत्र दरम्यानच्या काळात शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त केली आणि मी अडचणीत आलो, खासदार शिवाजीराव आढळराव यांनी वरिष्ठ नेत्यांच्या कानी लागून मला पक्षातून काढून टाकण्यास सांगितले. खासदार आढळराव हे दिखावा करणारे खासदार आहेत. त्यांनी कधीही कुठलाही शब्द पाळला नाही, याभागाच्या विकासाची ब्लू प्रिंट कुठे आहे हे त्यांनाच ठावूक नाही,दिवंगत माजी आमदार नारायण पवार यांचे स्मारक करण्याची त्यांची घोषणा हवेतच विरली. विविध कार्यक्रमांना जाताना गुलाल , फेटे , हार स्वतःच्याच गाडीत घेवून जावून स्वतःचा सत्कार करून घेणारे खा.आढळराव हे केवळ दिखावा करू शकतात, लोकांची कामे आणि विकास करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देण्यात येईल. गृहमंत्री आर.आर.पाटील या बाबत म्हणाले कि,शिवसेनेत पाय धरण्यापलीकडे काहीही करता येत नाही, मंत्री आणि खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा दाखला त्यांनी यावेळी दिला व शिरूर लोकसभा मतदार संघातझालेल्या चुका सुधारण्यासाठी आणि त्यांचे डाव त्यांच्यावर उलटून लावण्यासाठी अशोकराव खांडेभराड तुम्ही मदत करा असे आवाहन केले. त्याच प्रमाणे खेड तालुक्यातील तुमच्या सहकार्यांसमवेत कार्यक्रम लावा मी स्वतः उपस्थित राहतो , आणि तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असे कधीही वाटू देणार नाही असे सांगत त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन केले. कडाच्या वाडीतील या कार्यक्रमामुळे खेड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
------------
अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा