नवीन वीज मीटर ठरताहेत ग्राहकांसाठी डोकेदुखी

नवीन वीज मीटर ठरताहेत ग्राहकांसाठी डोकेदुखी
पाच ते सात हजारांची अनेकांना देयके


 चाकण परिसरासह खेड तालुक्यात आणि राज्यभरात  वीज वितरण कंपनीकडून जुने विद्युत मीटर बदलवून नवीन मीटर बसविण्यात आले आहेत ; परंतु नवीन मीटरचा वेग अधिक असल्याने ग्राहकांना आगाऊ रकमेचे देयके (बिल) मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिन्याला दोनशे ते चारशे रुपये वीज देयक येणाऱ्या ग्राहकांना चक्क पाच ते सात हजार रुपयांची देयक येवू लागली असून ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.
   वीज वितरण कंपनीने जुने मीटर बदलण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी हाती घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत महावितरणने दहा वर्षे व त्याहून अधिक काळापासून सेवेत असलेले सर्व जुने इलेक्ट्रो मेकॅनिकल मीटर काढून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक स्टॅटिक मीटर(आय.आर) बसविण्याचे नियोजन केले व त्याबाबतची कार्यवाही केली. दोन तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले मीटरही यात बदलण्यात आले. त्यामुळे मीटरमधून होणा-या वीज विक्रीचे प्रमाण निश्चितच वाढेल , असा वीज वितरणचा विश्वास होता. झालेही तसेच मात्र हे मीटर फारच सेन्सिटिव्ह असल्याने घरातील जुनी वायरिंग, जुने फ्रीज,व घरगुती मोटार यात किंचितसा बिघाड असल्यास सुद्धा मीटर धावत राहतो आणि भरमसाठ वीज बिले येत असल्याचे खुद्द वीज वितरणचे अधिकारीही खाजगीत मान्य करतात. बऱ्याचदा उपकरणे बंद असतानाही मीटरचे युनिट पुढे पडत राहतात अशाही नागरिकांच्या तक्रारी असून त्यासाठी शॉर्ट असणाऱ्या वायरिंग मधून भिंतीत पुरवठा होण्याचे कारण खुद्द अधिकारी वर्गही मान्य करीत आहे.
महावितरणने विजेचा काटेकोर हिशेब ठेवण्यासाठी योजिलेला हा उपाय सामन्यांच्या खिशाला नाहक कात्री लावणारा आहे.  त्यामुळे मीटर बदलविताच ग्राहकांना हजारो रुपयांचे विद्युत देयक येत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. चाकण भागात ज्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत असे नवीन डिजिटल मीटर वीज वितरणला बसवू दिले त्यांना हा भुर्दंड सोसावा लगत असून ज्यांनी दांडगाईने नवीन मीटर बसविण्यास विरोध करून आपले जुनेच मीटर कायम ठेवले त्यांची मात्र या कटकटीतून सुटका झाली असल्याचे अनेक वीज ग्राहक सांगत आहेत.   ग्राहकांकडील हे नवीन मीटरच फॉल्टी असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.  त्यामुळे अतिरिक्त देयकांचा भरणा ग्राहकांना करावा लागत आहे. विद्युत ग्राहकांना एप्रिल- मे महिन्यात हजारो रुपयांचे देयक देण्यात आले आहे. सद्यस्थितीत विजेचा वापर वाढत आहे. नवीन मीटरमुळे दुप्पट देयक आकारली जात आहे. वीज कंपनीने यात तातडीने सुधारणा करावी अन्यथा जुनेच मीटर पुन्हा बसवावेत अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. महावितरण कंपनीतर्फे बसवण्यात आलेले मीटर दोषपूर्ण आहेत या नागरिकांच्या आक्षेपाला दररोज कंपनीकडे याबाबत येणाऱ्या तक्रारींचे वाढलेल्या प्रमाणामुळे पुस्ती मिळत आहे. बऱ्याचदा रीडिंग न घेताच सरासरी बिले देण्यात येतात व एकदम दोन तीन महिन्यांचे एकत्रित रीडिंग घेवून अधिक आकाराची देयके देण्यात येतात. अशा एकत्रित देयकांमुळे एरवी साधारणपणे तीन रुपयांना पडणारा एक युनिट सहा रुपयांना पडतो व दुपटी तिपटीची भरमसाठ देयके येतात. चाकण भागात भरमसाठ वीज देयकांच्या तक्रारी घेवून येणाऱ्या ग्राहकांची प्रतीदिन सरासरी संख्या शंभरहून अधिक असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकारी म्हणतात...
वीजवितरणचे सहायक अभियंता एन.डी .मिसाळ यांनी या बाबत सांगितले कि, नवीन मीटर खूप  बीज देयक येण्यास कारणीभूत आहेत हा नागरिकांचा गैर समज आहे. मात्र अर्थ लिकेज मुळे अधिक देयक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर  खेडचे उपविभागीय कार्यकारी अभियंता एम.बी.ठाकरे यांनी या बाबत सांगितले कि, जुने मीटर हळूहळू चालत होते, मोठा लोड ते दाखवू शकत नव्हते नवीन स्टॅटिक मीटर(आय.आर) अधिक लोड दाखवीत असल्याने हा फरक जाणवत आहे. नवीन मीटर मुळे दुपटीने वाढलेली बिले त्याचा परिणाम असू शकेल मात्र चौपट पाचपट वाढलेली बिले कशामुळे वाढली याचा शोध घेण्यात येईल. अगदीच हजारातून एखादा मीटर सदोष असू शकतो मात्र सगळे मीटर सदोष असू शकत नाहीत. संपूर्ण राज्यात आता हेच मीटर वापरले जात आहेत.
------------------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 



  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)