खराबवाडी ग्रामपंचायत बरखास्तीला स्थगिती
ग्रामविकास मंत्र्यांचा निर्णय ; कार्यकारी मंडळाला दिलासा
चाकण:वार्ताहर -
शासकीय गायरान जागेतील अतिक्रमणे काढणे व नवीन अतिक्रमणे रोखण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून कर्तव्य पार पाडण्यास असर्मथ असल्याचा ठपका ठेवीत खराबवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व 11 सदस्यांना पदावरून काढून टाकण्याच्या विभागीय आयुक्तांच्या आदेशाला राज्य शासनाच्या पंचायत राज विभागाने स्थगिती दिली आहे. अपात्र आदेशाला स्थगिती मिळाल्याने खराबवाडी परिसरातून जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या या विभागाच्या अधिकारी अर्चना वालझाडे यांनी या बाबतची पत्रे (क्रमांक -व्हीपीएम-2013/ प्र.क्र.96/ संग्राम कक्ष) विभागीय आयुक्त व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविली आहेत. या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि, ग्रामपंचायत अधिनियम 1957 चे कलम 39 (1) अन्वये या अतिक्रमणा बाबत सरपंच ,उपसरपंच यांना पदावरून काढून टाकण्याबाबत याच ग्रामपंचायतीच्या महिला सदस्येच्या पतीने विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. त्यानुसार गायरान जागेतील अतिक्रमणे काढणे व नवीन अतिक्रमणे रोखण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून कर्तव्य पार पाडण्यास असर्मथ ठरल्याच्या कारणावरून विभागीय आयुक्तांनी खराबवाडी ग्रामपंचायतीचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्याचा आदेश 9 जुलै 2013 रोजी दिला होता. या आदेशाच्या विरुद्ध सरपंच योजना सोमवंशी यांच्यासह उपसरपंच ज्ञानेश्वर सातव, ग्रा. पं. सदस्य नवनाथ म्हस्के,ज्ञानेश्वर शिळवणे, बाळासाहेब लोंढे, मारुती कड, राहुल शेलार, ललिता कड,अनुराधा कड व नंदा कड आदींनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (3) अन्वये राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागात अपील दाखल करून ग्रामविकास मंत्र्यांकडे न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली या प्रकरणाची सुनावणी 25 जुलै रोजी घेण्यात आली. या प्रकरणी निर्णय पारित होण्यास कालावधी लागणार असल्याने निर्णय पारित होई पर्यंत विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याचे राज्य शासनाने विभागीय आयुक्त , पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान आपल्या पत्नीची गावच्या सरपंचपदी वर्णी न लागल्याने राजकीय सूडबुद्धीने पस्तीस वर्षापासून गायराना मध्ये असलेल्या 184 अतिक्रमणांचा विषय लावून धरण्यात आला, व त्याबाबत प्रशासनाची दिशाभूल करून सध्याच्या कार्यकारी मंडळास जबाबदार धरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे खराबवाडीच्या पदाधिकार्यांनी सांगितले. सरपंच योजना सोमवंशी यांनी या बाबत म्हणल्या कि, खराबवाडी येथील जमीन गट नं. 2/1 गायरानसर्व्हे नं. 618/अ/1 मधील 4 एकर जमीन खराबवाडी गावठाण करीत आदेश क्र.जेडब्ल्यूएस/ एलआय/1350 / 71 दिनांक 21/9/1971 अन्वये हुकूम मिळाला होता.परंतु, त्यांची फेरफाराची अंमलबजावणी झाली नव्हती . केवळ म्हणून सद्य:स्थितीत हे क्षेत्र गायरान आहे. या गायरानमध्ये 184 अतिक्रमणे झाल्याची नोंदग्रामपंचायत मिळकत नं. 8 वरील नोंदींवरून दिसून येत असले तरी ही सर्व बांधकामे 30 ते 40 वर्षांपासूनची असल्याचे ग्रामपंचायत रेकॉर्डवरून दिसून येते असे विभागीय आयुतांच्या आदेशात म्हटले गेले होते. प्रत्यक्षात या बाबत केवळ फेरफाराची अंमलबजावणी राहिलेली आहे. दरम्यान या निर्णयामुळे सरपंच,उपसरपंच कार्यकारी मंडळासह संपूर्ण खराबवाडीला दिलासा मिळाला आहे.
-----------------------------
-----------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा