चाकणला नगरपरिषद स्थापण्यापूर्वी शासनाकडून सर्व बाबींची पडताळणी

चाकणला नगरपरिषद स्थापण्यापूर्वी शासनाकडून सर्व बाबींची पडताळणी 
मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची घेतली कार्यकर्त्यांनी भेट 

चाकण: अविनाश दुधवडे 

चाकण नगर परिषदेसाठी उद्घोषणा राज्य शासनाने जाहीर करीत या बाबतचा अध्यादेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याने याबाबतच्या हरकती आणि अन्य तांत्रिक बाबी विचारात घेवून चाकण साठी ग्रामपंचायती एवजी नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तीत्वात आणण्याचेच राज्य शासनाचे प्रयोजन आहे. मात्र तत्पूर्वी  चाकणपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द जवळच असल्याने ही गावे महापालिकेत का समाविष्ट करू नयेत, असा केवळ विचारणा सरकारने केली आहे. व या बाबतचा सविस्तर अभ्यास अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना केली होती. प्रत्यक्षात चाकण परिसराचे विलीनीकरण करण्याचा कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला असून सर्व बाबी तपासण्यात येत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव  जयंत कुमार बांठिया  यांनीही स्पष्ट केले आहे . 
 या बाबत युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते निलेश कड पाटील , अनुराग जैद यांच्या नेतृत्वाखालील कायर्कर्त्यांच्या शिष्ट मंडळाने राज्याचे मुख्य सचिव  जयंत कुमार बांठिया  यांची मंगळवारी भेट घेवून चाकण परिसरातील गावांचा पिंपरीचिंचवड महापालिकेत समावेशाच्या निर्माण करण्यात आलेल्या संभ्रमा बाबत निवेदन दिले. या बाबत मुख्य सचिव बांठिया यांनी सांगितले की,  चाकणमध्ये नगरपालिका करण्याबाबतचा प्रस्तावच राज्य शासनाच्या विचाराधीन असून केवळ चाकणपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द जवळच असल्याने ही गावे महापालिकेत का समाविष्ट करू नयेत, या बाबतचा अभ्यास अहवाल सरकारने  पिंपरी-चिंचवड महापालिके कडे मागितला होता . समावेशाचा कुठलाही निर्णय किंवा प्रयोजन नसल्याचे त्यांनी शिष्ट मंडळासमोरच स्पष्ट केले. व जिल्हाधिकारी देशमुख यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

 तीन महिन्यापूर्वी (7 मे 2013 रोजी) राज्याचे मुख्य सचिव  जयंत कुमार बांठिया  यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्याचे नगरविकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंग जिल्हाधिकारी विकास देशमुख, महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव,नगर परिषद प्रशासनाचे संचालक,व अन्य अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक झाली होती. बैठकीतील निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेस चाकण सह लगतची म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरुळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, चाकण, कडाचीवाडी, चिंबळी, केळगाव, आळंदी, खालुंब्रे व देहू, विठ्ठलनगर, या सोळा गावांचा; तसेच गहुंजे, हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे व जांभे या सहा गावांचा समावेशबाबत विचारणा करण्यात आली होती व या बाबतचा परिपूर्ण प्रस्ताव 7 ऑगस्ट 2013 पूर्वी पाठविण्याच्या स्पष्ट सूचनाही दिल्या होत्या . त्यामुळेच मागील शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत चाकण सह वीस  गावांच्या समावेशा संदर्भात तत्वत मान्यता देण्यात आल्याचे व महापालिकेच्या आगामी सभे पुढे ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र स्थानिकांच्या वाढत्या विरोधाने व राज्य शासनाचे तसे कुठलेही प्रयोजन नसल्याने या विलीनीकरणाच्या प्रस्तावा बाबत खुद्द जिल्हाधिकारी विकास देशमुख अनुकूल नसल्याचे समजते. जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय (नस्ती क्रमांक: 8011) येत्या दोन दिवसात राज्य शासनाकडे जाण्याची शक्यता आहे. 
  पिंपरी चिंचवड महानगरपालिका या गावांच्या समावेशासाठी उत्सुक असली तरी या भागातून त्यास तीव्र विरोध आहे. त्यातच शासन स्तरावर  चाकण नगरपरिषदेच्या मर्यादित हद्दीलाच चाकण करांचा विरोध आहे. कारण चाकणची सध्याची जी हद्द आहे ती कायम ठेवून नगरपालिकेची हद्द निश्‍चित करण्यात आली असल्याने औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारी व अन्य मोठे महसुली क्षेत्र यातून बाजूला राहणार असल्याने भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या चाकण नगरपरिषदे पेक्षा लगतच्या कारखानदारी असणाऱ्या छोट्या वाड्यांच्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अधिक राहणार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे  . चाकण न.प.साठी उद्घोषणा जाहीर करताना शासनाने चाकण गावाचे गट क्रमांक 1 ते 2555 मध्ये असलेले संपूर्ण क्षेत्र पूर्व - नदी व कडाची वाडी गावची शिव,पश्चिम -खराबवाडी गावची शिव उत्तर -वाकी खुर्द गावची शिव  ,दक्षिण -मेदनकरवाडी व नाणेकरवाडी गावची शिव ,अशी सध्याची जी हद्द आहे ती कायम ठेवून नगरपालिकेची हद्द निश्‍चित केली आहे. या हद्दीत कारखानदारी येत नाही त्यामुळे सध्या असलेले सुमारे दीड कोटी रुपयांचेच उत्पन्न कायम राहणार आहे. त्यातच पूर्वीच्या संयुक्त चाकण ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या लगतच्या वाड्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व हवे आहे.  त्यामुळे शासनाकडून केवळ चाकण हद्दी पुरती नगरपरिषद आगामी काळात घोषित केली जाण्याची शक्यताच अधिक आहे.

परिसरातील गावांचा वाढता विरोध: 
 चाकण सह वीस गावांच्या पिंपरी महापालिकेतील समावेशा संदर्भात तत्वत मान्यता देण्यात आल्याचे व महापालिकेच्या आगामी सभे पुढे ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त येताच या भागातून तीव्र विरोधाची भूमिका पुढे येऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी चिंबळी येथे चौदा गावांच्या प्रतिनिधींनी बैठक घेवून अशा समावेशास विरोध करण्याची रणनीती आखली आहे. म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरुळी, नाणेकरवाडी, खराबवाडी,  कडाचीवाडी, चिंबळी, केळगाव,  खालुंब्रे आदी गावातील कारभारी व ग्रामस्थांनी अस्तिव गमावून होणाऱ्या अशा कुठल्याही समावेशास संघर्षाने विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही गावांनी गावात विशेष ग्रामसभा बोलावून विरोधाचे ठराव करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.  
---------------
Avinash Dudhawade ,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)