चाकण ग्रामपंचायतीची नोंदवही क्रमांक 17 गेली कुठे?
नोंदवहीला पाय कसे फुटले ...
प्रश्न नाजूक अन उत्तर कठीण
चाकण: अविनाश दुधवडे
चाकण ग्रामपंचायतीच्या सरपंचांची रवानगी बारा दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर आता येरवड्याच्या कारागृहात झाली आहे. बोगस आठ अ च्या याच उताऱ्या प्रकरणी आणखी सहा जणांवर फास आवळण्यात आल्याने प्रमुख आरोपी मानण्यात आलेल्या सरपंचांच्या सुटकेच्या वाटा खडतर झाल्या आहेत. मात्र कच्च्या नोंदी घालण्यासाठी वापरण्यात आलेले व अखेर पर्यंत जीव तोडून सरपंच सांगत असलेले त्याच प्रमाणे काही कर्मचाऱ्यांच्या जबाबातही आलेले 17 नंबरचे रजिस्टर कुठे गेले हे कुणालाच माहिती नाही. या रजिस्टरला पाय कसे फुटले हा प्रश्न सर्वांनाच अंतर्मुख करणारा असल्याचे नागरिक बोलत आहेत .
या नोंदी घालण्याचे डाव ज्यांनी रचले, त्याच मंडळींना नोंदवही बाहेर काढण्याचे ग्रामपंचायतीतील गुप्त दरवाजेही ठाऊक असणार. अचानक पणे कारस्थानाने वही गायब होणे, पाने फाडली जाणे आणि रेकॉर्ड चोरी होणे, हे प्रकार सहजासहजी होऊ शकतील यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवत नाही... अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. ती नोंदवही उंदरांनी कुरतडली की भ्रष्टाचाराच्या वाळवीने खाल्ली, याचा शोध काही केल्या लागत नसल्याने या प्रकरणाची खरीखुरी पाळेमुळे खोदण्याची गरज निर्माण झाल्याचे बोलेले जात आहे .
अशी नोंदवही क्रमांक 17 अस्तित्वात नसल्याचे काही मंडळी छाती ठोक पणे सांगत आहेत. अशी नोंद वही अस्तित्वात नव्हती तर येथील काही मंडळींना देण्यात आलेल्या उतार्यांच्या वेळी ग्रामपंचायती कडून घेण्यात आलेले व वाटवीण्यात आलेले धनादेश कशाच्या आधारावर स्वीकारण्यात आले हा प्रश्नच निरुतरीत राहतो. ही नोंदवही अस्तितवात होती आणि गहाळ झाली असे खाजगीत सांगणारे अनेक जन आहेत. त्या वहिला कायदेशीर मान्यता नसल्याचे प्रशासनातील काही मंडळी बोलत आहेत. मात्र सर्वांच्या समन्वयातून ती नोंदवही तयार करण्यात आली होती असे सरपंचांच्या वकिलांनी म्हणणे मांडले आहे . त्यामुळे ही वही गहाळ केलीच असेल, तर तसे करण्यामागचे कारण काय? त्यांचा 'शिकविता धनी' कोण? या वहीत व रेकॉर्ड वरील फाडल्या गेलेल्या पानांवर असे कोणते गुपीत दडलेले होते? त्यामुळे कोणाचे पितळ उघडे पडणार होते? याची चौकशी करावीशी ना पोलिसांना वाटली ना आपल्या 'कार्यक्षम' प्रशासनाला . सारेच चिडीचूप... एखाद्या रहस्यमय कादंबरीतील गूढ अधिकच गडद व्हावे, तसे हे सारे चालले असल्याचे नागरिक दबक्या आवाजात बोलत आहेत. ते रजिस्टर सापडले असते तर कायद्याच्या कचाट्यात आणखी कोण आले असते ? की, तसे घडू नये, कायद्यातील कलमांना वेगळी वाट मिळावी यासाठीच हे वहीचे 'अपहरण' करण्यात आले? हे प्रश्नच अनेक उत्तरांचे धनी ठरत आहेत. प्रश्न नाजूक आहे आणि त्याचे उत्तरही कठीण आहे. त्यामुळे त्याचे उत्तर शोधण्याचे धेर्य कुणीही दाखवीत नाही. मात्र राजकारण्यांच्या या धोबीपछाडात बोगस उतार्यांच्या घोटाळ्याने अवघ्या जिल्ह्यात चाकण ग्रामपंचायत बदनाम झाली एवढे मात्र नक्की.
-----------------Avinash Dudhawade chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा