चाकण मधील एका लग्नाची गोष्ट
चाकण मधील एका लग्नाची गोष्ट
चाकण: अविनाश दुधवडे
लग्न म्हटले की हुंडा, मानपान, सत्कार, पाहुण्या- राऊळ्यांची वर्दळ हे नेहमी पाहायला मिळते. चाकण सारख्या भागात तर गुंठामंत्री मंडळी खूप मोठ्या प्रमाणावर अशा समारंभातून संपत्तीचे प्रदर्शन करत असल्याचे सर्वश्रुत आहे. पण याच चाकण मध्ये अचानक ठरलेल्या आणि चक्क दोन तासांत झालेल्या एका लग्नातील साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी पाहून सर्वच स्तरातील लोक भारावून गेले. निमित्त होते सागर जगनाडे आणि प्रतिभा यांच्या मंगळवारी (दि.7) रात्री साडेनऊ वाजता झालेल्या आकस्मिक विवाहाचे.
जगनाडे कुटुंबीय संत जगनाडे महाराज यांच्या कार्याने प्रभावित झालेले. या भागात समाजातील विविध स्तरातील मंडळीना मदतीचा हात देणाऱ्या सामाजवादी विचार सरणीच्या जगनाडे कुटुंबीयांनी घरच्या लग्नात देखील आपली सामाजिक बांधीलकी जपली. मंगळवारी (दि.7) सायंकाळी मुलाला पाहण्यासाठी म्हणून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केल्या नंतर लग्नासाठीची आर्थीक परिस्थिती नसल्याचा मुलीकडील मंडळींचा सूर पाहून जगनाडे कुटुंबीयांनी साधे पणाने लगेचच दारात लग्नाची आणि लग्नाचा वायफळ खर्च दुष्काळ ग्रस्तांना देण्याची तयारी दर्शविली आणि दोन्ही कडील पाहुण्यांनी यास एकमुखाने पाठींबा दिला. आणि अवघ्या तासाभरात हा अनोखा विवाह चाकण मधील जगनाडे कुटुंबियांच्या दारात पार पडला. समाज सेवा करण्यासाठी कायम आघाडीवर असणार्या जगनाडे कुटुंबीयांनी समाजा पुढे आपल्या लग्नाचा एक नविन आदर्शच निर्माण केला आहे. त्याला नववधू प्रतिभाने देखील योग्य साथ दिली.
लग्नात भपकेबाजपणा करून उधळपट्टी करण्याचे स्वप्न पाहणारे अनेक जण चाकण सारख्या विस्तारत्या भागात दिसतात. जगनाडे व बनसोडे कुटुंबीयांनी मात्र महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ पाहून आपल्या लग्नाचा खर्च टाळून पंधरा हजारांची मदत मुख्यमंत्र्यांच्या निधीत मदत म्हणून दिला आहे . एकीकडे खेड तालुक्यात यात्रा जत्रां मध्ये उधळपट्टीचा विषय ऐरणीवर आलेला असताना येथे जपण्यात आलेल्या सामाजिक बांधीलकी मुळे उपस्थित वर्हाडी मंडळी भारावून गेली. या अनोख्या लग्नातल्या वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश गोरे, राष्ट्रवादीचे किरण मांजरे, संदीप परदेशी , प्रवीण खळदकर, रामदास जाधव, जेष्ठ सामाजवादी कार्यकर्ते गोपाळ जगनाडे, मामासाहेब शिंदे, राजेंद्र जगनाडे ,स्वप्नील बारमुख आदीसह व्यापार, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सायंकाळी साडेनऊ वाजता आवर्जून हजेरी लावली . यावेळी पंधरा हजार रुपयांचा धनादेश दुष्काळग्रस्तांना मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून देण्यासाठी या कुटुंबीयांनी सुरेश गोरे यांच्याकडे सुपूर्द केला. .........
Avinash Dudhawade, chakan. 9922457475
-----------------
-----------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा