पिंपरी-चिंचवड मध्ये समाविष्ट होण्यास चाकणकरांचा विरोध
चाकणला हवी स्वतंत्र नगरपरिषद
नवीनच घोळामुळे संभ्रम
चाकण:अविनाश दुधवडे
चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्या संदर्भात मंगळवारी (दि.7) मुंबईत झालेल्या बैठकी मुळे चाकणला नगरपरिषद होणार की,पिंपरी चिंचवड मध्ये या भागाचा समावेश होणार या बाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, येथील ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी चाकण चे अस्तित्व संपवून पिंपरी-चिंचवड मध्ये या भागाचा समावेश करण्यास कडाडून विरोध केला आहे.
प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे.मंगळवारी (दि.7) मुंबईत राज्याचे नगरविकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंग जिल्हाधिकारी विकास देशमुख, महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव,महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव,नगर परिषद प्रशासनाचे संचालक,व अन्य अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.एकीकडे चाकणला नगरपरिषद लागू करण्यासाठी सर्व पूर्तता केल्या नंतर नव्यानेच आलेल्या या पुढे आलेल्या या प्रस्तावाला या भागातून विरोध होऊ लागला आहे.
2013 या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चाकणला नगरपरिषद येण्याची अपेक्षा नागरिकांना होती.नगर परिषदेसाठी सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. चाकण नगर परिषदेसाठी उद्घोषणा राज्य शासनाने सहा महिन्यांपूर्वी जाहीर करीत या बाबतचा अध्यादेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. याबाबतच्या हरकती आणि अन्य तांत्रिक बाबी विचारात घेवून चाकण साठी ग्रामपंचायती एवजी नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था लवकरच अस्तीत्वात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत होते .मात्र नगरपरिषदेसारखे हे प्रशासन कुठल्याही क्षणी अस्तित्वात येण्याची शक्यता असताना चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू झाल्याने नागरिकांसह चाकण ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.चाकणच्या बाजूला पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द मोशीपर्यंत आहे. मोशी ते चाकणदरम्यान अनेक लहान-मोठी गावे आहेत, त्यामुळे चाकणचा समावेश करताना ही गावेही महापालिकेत समाविष्ट करावी लागणार आहेत. त्यामुळे महापालिका हद्द ते चाकणदरम्यान असणाऱ्या सर्व गावांची लोकसंख्या, तेथील रोजगार आणि इतर गोष्टींचा अभ्यास करण्याची सूचना श्री. सिंग यांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर अभ्यास अहवाल सादर केल्यानंतर चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चाकणचे सरपंच काळूराम गोरे यांनी चाकण चा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्यास विरोध केला असून असे लेखी पत्र मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्याचे सांगितले आहे.चाकणला नगर परिषद अस्तित्वात यावी यासाठी ग्रामपंचायतीने सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असताना नव्यानेच समोर आलेल्या या प्रस्तावा बाबत सरपंच गोरे यांबी आश्चर्य व्यक्त केले आहे.चाकण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चाकण व लगतच्या वाड्यांचा परिसर मिळून नगर परिषद अस्तित्वात आली पाहिजे अशी भूमिका माजी उपसरपंच अशोक बिरदवडे यांनी मांडली.चाकण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच साजिद सिकीलकर,ग्रामपंचायतीचे सदस्य दत्तात्रेय बिरदवडे,सुधीर वाघ,दतात्रेय जाधव, पांडुरंग गोरे ,अमोल घोगरे ,संतोष साळुंके ,प्रीतम परदेशी,कृष्णा सोनवणे,सुनील शेवकरी,धनंजय कदम,बानो काझी ,रुपेश जाधव,दत्तात्रय फुलवरे, युवक कॉंग्रेसचे निलेश कड पाटील आदींनीही नव्याने होऊ घातलेल्या या घोळा बाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
-------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा