अंधश्रद्धेतून चाकणला मायलेकरांचा नरबळी


आईच्या खुनापूर्वीच झाला होता बेपत्ता मुलाचाही खून
अंधश्रद्धेतून चाकणला मायलेकरांचा नरबळी
एक संगीत शिक्षक ताब्यात

चाकण: अविनाश दुधवडे

 साबळेवाडी  (ता. खेड ) येथे 21 एप्रिल 2013 रोजी  क्रूररित्या गळा चिरून विहिरीत फेकलेल्या दुर्गाबाई राजू जगताप (वय 50रा.बलुतआळी ,चाकण,ता.खेड)यांचा बेपत्ता मुलगा धनंजय (वय 25)याचीही हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून अंधश्रद्धेतून या दोघांचे बळी दिल्याची धक्कादायक शक्यता समोर आली आहे.या प्रकरणी चाकण पोलिसांनी चाकण दत्तमंदिर भागात वास्तव्यास असलेल्या एका संगीत शिक्षणाचे क्लास घेणाऱ्याला  ताब्यात घेतले आहे.

 बेपत्ता झालेला मुलगा धनंजय यानेच आपल्या आईचा खून केल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांनी व्यक्त केला होता.मात्र आईच्या खुनापुर्वी दोन दिवस आधीच  मुलगा धनंजय याचा लोणावळा येथे गळा आवळून व ओळख पटू नये म्हणून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याने या दुहेरी खून प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.या प्रकरणी चाकण पोलिसांनी सुनील बबन पाचंगे (सध्या रा.चाकण भुजबळ आळी  ,ता.खेड ,जि.पुणे ) या संगीत शिक्षकाला दुहेरी खून प्रकरणी ताब्यात घेतले असून त्याच्या मोबाईलचे लोकेशन खून झालेल्या ठिकाणी मिळाले आहे.पोलीस चौकशी साठी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या हिसक्या नंतर त्याने या बाबतची सत्यता सांगितली असून धनंजय याचा मृतदेह सुद्धा मिळाला आहे.रात्री उशिरा या नराधमावर गुन्हा दाखल होणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील व चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी सांगितले.
 
 या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, साबळेवाडी  (ता. खेड ) येथे 21 एप्रिल 2013 रोजी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या कठड्यावर धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करून मृतदेह पाण्यात फेकून दिल्याची घटना  मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आल्या नंतर उघडकीस आली होती . क्रूर पद्धतीने गळ्याचा कंठ याच विहिरीच्या काठावर कापून मृतदेह विहिरीत फेकण्याच्या प्रकाराने साबळेवाडी भागात खळबळ उडाली होती. हा मृतदेह जवळपासच्या भागातील महिलेचा असल्याची शक्यता गृहीत धरून  त्यादृष्टीने तपास करण्यात येत होता.मात्र या महिलेची ओळख काही केल्या पटवीताच येत नसल्याने हात टेकलेल्या पोलीस प्रशासनाने भित्तीपत्रकांचा आधार घेतला होता.त्यामुळे सचित्र भित्तीपत्रक आणि वृत्तपत्रातील सचित्र माहितीच्या आधारे एका युवकाने ही महिला आपल्या मित्राची आई असल्याचे पोलिसांना सांगितले .त्यानुसार माहिती घेतली असता या महिलेची ओळख पटली.जिल्हाभर या महिलेची ओळख पटविण्यासाठी जंगजंग पाछाडणाऱ्या चाकण पोलिसांच्या ठाण्यापासून अवघ्या शंभर दीडशे मीटरवर ही महिला राहण्यास असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले . त्याच वेळी आणखी एका धक्कादायक बाब पोलिसांच्या लक्षात आली की, या महिलेचा पंचवीस वर्षीय मुलगा धनंजय राजू जगताप हा सुद्धा बेपत्ता झाला आहे .त्यामुळे हा खून नेमका कुणी व कशासाठी केला याची गुंतागुंत आणखी वाढली होती .पोलीस बेपत्ता धनंजय याचा शोध घेत होते.कारण त्याचा शोध लागल्यानंतरच त्याच्या आईच्या  खुनाला वाचा फुटणार असल्याचा पोलिसांचा विश्वास होता .पोलिसांनी धनंजय याच्या सर्व मित्रांची कसून चौकशी केली .मात्र त्याचा काही केल्या शोध लागत नव्हता.धनंजय याच्या मित्रांची चौकशी करताना त्याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या या संगीत शिक्षकावर  पोलिसांचा संशय बळावला होता. त्याच्याकडेच या बाबतची चौकशी केली.त्याच्या मोबाईल टोवरचे लोकेशन तपासले असता खून झालेल्या ठिकाणी (साबळेवाडी) त्याच्या मोबाईलचे लोकेशन आढळून आले.त्या नंतर पोलिसांनी त्याला इंगा दाखविताच त्याने धनंजय याच्याही खुनाचीही माहिती पोलिसांना दिली असल्याचे समजते. पोलिसांनी त्या नुसार लोणावळा येथे चौकशी केली असता धनंजय याचा डोक्यात दगड घातलेला बेवारस अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले.चाकण पोलिसांनी या बाबतची खात्री केली असता तो मृतदेह धनंजय याचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संबंधित मित्राने हा दुहेरी खुनाचा प्रकार आणखी कुणाच्या मदतीने केला असण्याचा पोलिसांचा कयास असून त्या  दृष्टीने तपास सुरु आहे, असे चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम व सहाय्यक निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले.

म्हणून त्यांचा बळी?:
खून झालेल्या दुर्गाबाई जगताप व धनंजय जगताप चाकणमध्ये वीस वर्षांपूर्वी झोपडी टाकून वास्तव्य करीत होते ,परिसरातील लोकांच्या घरी मिळेल ते काम करून मोल मजुरी करून दुर्गाबाई उदरनिर्वाह करीत होत्या .मुलगा धनंजय अतिशय हुशार असल्याने येथील काही सामाजिक संघटनांनी पहिली पासूनच त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून मोलमजुरी करणाऱ्या आईच्या मदतीने त्याला पदव्युत्तर पदवीधर केला .दरम्यान चाकण ग्रामपंचायतीने या या गरीब गरजू माय लेकरांना बलुत आली मध्ये घरकुल बांधून दिले .तेथेच ही माय लेकर वास्तव्यास होती.मुलगा धनंजय पिंपरीतील मोठ्या कंपनीत नोकरीस लागला होता.त्यानंतर अचानक या अतिशय गरीब कुटुंबातील महिलाचा खून राहत्या घरापासून तब्बल पंधरा किलोमीटर अंतरावर अत्यंत क्रूर रित्या होतो .मुलगाही बेपत्ता होतो.त्यामुळे या खुनामागचे नेमके गौडबंगाल काय?अशी चर्चा या भागात होत होती.या दोघा माय लेकरांना अन्य कुणीही जवळचे नातेवाईक नसल्याने या दोघांचेही देवाला बळी देल्यास कुणाला काहीच कळणार नाही.याच उद्देशाने नरबळी देण्याच्या हेतूने त्यांना संपविण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

माय लेकरांची अशीही भेट:
 दुर्गाबाई यांचा 20 एप्रिलला चाकण च्या पूर्वेला पंधरा किलोमीटर अंतरावर साबळेवाडी येथे तर त्यांचा मुलगा धनंजयचा दोन दिवस आधीच 18 एप्रिलला चाकण च्या पश्चिमेला सुमारे पन्नास किमी अंतरावर लोणावळ्यात खून करण्यात आला होता.साबळेवाडी  (ता. खेड ) येथे खून झालेल्या दुर्गाबाई यांची ओळख काही केल्या पटवीता न आल्याने पोलीस प्रशासनाने भित्तीपत्रकांचा आधार घेतला होता.पुणे जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये मृतावस्थेतील दुर्गाबाई यांची भित्ती पत्रके लावण्यात आली. लोणावळा येथे गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून करण्यात आलेल्या दुर्गाबाई यांचा मुलगा धनंजय याचाही काहीच शोध न लागल्याने त्याचेही भित्तीपत्रक लोणावळा पोलिसांनी पोलीस ठाण्यात लावले होते.चाकण पोलिसांनी लोणावळ्यातील मुलगा धनंजय याच्या त्याच भित्तीपत्रकाच्या शेजारी त्याच्या आईचे भित्तीपत्रक लावले होते.


नरबळी प्रकरणी पाचंगेला बारा दिवसांची पोलीस कोठडी  

  एका तांत्रिकाच्या सल्ल्याने अचानक धनलाभ होण्यासाठी नरबळी देण्याच्या अंधश्रद्धेतून मित्राचा व त्याच्या आईचा नियोजनबद्ध खून करणाऱ्या क्रूरकर्मा सुनील बबन पाचंगे (रा.चाकण भुजबळआळी चाकण ,ता.खेड ,जि.पुणे ) यास न्यायालयाने बारा दिवस (24 मे पर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.चाकण पोलिसांनी आज (दि.13) त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. नराधम पाचंगे याने मागील महिन्यात गुरुवार दि. 18 एप्रिल 2013 रोजी दुर्गाष्टमीला रात्री बारा वाजता मित्र धनंजय जगताप (वय 25) याचा लोणावळ्यात ; तर त्यानंतर दोन दिवसांनी चैत्री नवरात्री समाप्तीला शनिवार दि. 20 एप्रिलला रात्री बारा वाजता मित्राची आई दुर्गाबाई (वय 50) यांचा साबळेवाडी (ता. खेड ) येथे निर्घुण खून केला होता.गरीब कुटुंबातील माय-लेकरांचे दोन नरबळी अंधश्रद्धेतून देण्यात आल्याची धक्कादायक  घटना उघडकीस आल्याने चाकण परिसर हबकून गेला आहे.चाकण पोलीस या प्रकरणी आणखी काही महत्वाच्या धाग्या दोऱ्यांचा शोध घेत आहेत.पाचंगे याच्या भुजबळआळी येथील 'कांची एनक्लेव्ह' येथील सदनिकेत काही संशयास्पद वस्तू मिळताहेत का? याचा चाकण पोलिसांकडून शोध सुरु असून त्याच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींचीही चौकशी करण्यात आली आहे.

-----------------------Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)