चाकण मध्ये घराचे स्वप्न महागतेय
चाकण मध्ये घराचे स्वप्न महागतेय
------------------------
गेल्या पाच सहा वर्षांमध्ये चाकण सारख्या शहरां मधील आणि लगतच्या भागातील घरांच्या किमती लाखांच्या पटीत वाढल्या आहेत.
या पठाणी टक्केवारीने वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात येणे कठीण होत असून लक्षणीय बाब
म्हणजे मुंबई पुण्यातील घरांच्या किमती ज्या वेगाने वाढल्या आहेत ,तोच वेग चाकण परिसरातील सदनिकांच्या किमतींनी गाठला आहे.
2000 ते 3500 रुपये प्रतिचौरस फूट इतके सदनिकांचे दर याभागात आहेत .त्यात भविष्यात आता आणखी वाढ होणार आहे.
सामान्यांना परवडतील अशी घरे याभागात भविष्यात मिळणे दुरापास्त होणार असल्याची चिन्हे आत्ता पासूनच दिसू लागली आहेत.
वेगवान औद्योगीकारणाने सुसाट वाढलेल्या चाकण परिसरातील सदनिका आणि जागांचे वाढलेले भाव व ही भरमसाट वाढ पाहता निवाऱ्याची
मूलभूत गरज कशी भागवावी, असा प्रश्न सर्वसामान्यांनाभेडसावत असल्याचे जळजळीत वास्तव समोर येत आहे.
चाकण भागात ग्रामपंचायत स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने सोयी-सुविधांच्या अभाव असला तरी शहरीकरणाचा वेग वाढतो आहे.
कारखानदारीच्या वाढी मुळे वाहन उद्योगाचे "ग्रोथ इंजिन' म्हणविल्या जाणाऱ्या चाकण भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे.
सध्या दोन लाखांच्या आसपास पोहचलेली ही लोकसंख्या पुढील काळात अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. याभागात मध्ये तोकडी पडत
असलेली जमीन,त्यामुळे किमान मुलभूत व नागरी सेवांवर पडणारा ताण आणि वाढत्या समस्याही प्रकर्षाने पुढे येत आहेत.
चाकण मधील लोकसंख्ये पाठोपाठ आलेल्या निरनिराळ्या बँकामधील गृहकर्ज वितरण क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली असली,
तरीही येथे बेघरांची संख्या तेवढ्याच वेगाने वाढते आहे. शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात घरांची वाढलेली
मागणी आणि पुरवठ्यात तूट हे त्यामागील प्रमुख कारण आहेच. घरांसाठी कर्जाची मर्यादित उपलब्धताही मोठी समस्या असल्याने सक्षम
धोरणाची गरज प्रकर्षाने जाणवत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
*घर देता का घर?
सदनिकांचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यातच बांधकाम व्यावसायिक संगनमताने सदनिकांचे दर वाढवीत असल्याने,
या परिस्थितीत सामान्यांना महागडे घर विकत घेणे मुश्कील झाले असून, या दरांवर काहीतरी नियंत्रण हवेच, अशी मागणी जवळजवळ सर्वच
क्षेत्रातून होत आहे . मध्यमवर्गीयांची कोंडी "'घर देता का घर? असे उद्गार आता सर्वसामान्य ,नोकरदार, मध्यमवर्गीय मंडळींना
काढण्याची वेळ आली आहे.2000 ते 3500 रुपये प्रतिचौरस फूट इतके सदनिकांचे दर याभागात आहेत तर गावठाणातील गुंठाभर जागेसाठी
पाच ते सात लाखांची मागणी होवू लागली आहे.यात बऱ्याचदा एजंट मंडळी मोठा फरक ठेवून कृत्रिम रीतीने किमती वाढवीत असल्याचाही
आरोप होत आहे.
*महागड्या भागांच्या यादीत चाकण:
नवीन रेडी रेकनरनुसार मोकळ्या जमिनीचे व निवासी सदनिकांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. नव्या बाजारमूल्यानुसार जागेचे
भाव वधारल्यामुळे स्टॅम्प ड्यूटी अधिक भरावी लागत असल्याने घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. महागड्या
भागाच्या यादीत चाकण परिसराने स्थान मिळविले आहे. लगतच्या पिंपरी चिंचवडप्रमाणेच चाकण मध्ये ही सदनिकांच्या दरात 15 ते 25
टक्के वाढ झाली आहे. अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५
----------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा