पोलीस ठाण्यात आता ई-तक्रार सुरु
पोलीस ठाण्यात आता ई-तक्रार सुरु
सिटीजन पोर्टल ही हायटेक यंत्रणा विकसित
घरबसल्या नोंदवा तक्रार ; जाणून घ्या तक्रारींचा तपशील
पुणे ग्रामीण मध्ये प्रायोगिक तत्वावर सुविधा सुरु
चाकण:
पूर्वी प्रमाणे किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी किंवा तक्रारींचा तपशील जाणून घेण्यासाठी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवण्याची फारशी गरज आता राहणार नाही. सध्या इंटरनेटचा जमाना असून पोलीस यंत्रणासुध्दा हायटेक होवू लागली आहे. सिटीजन पोर्टल ई-तक्रार सुविधा (सीसीटीएनएस) अशी हायटेक यंत्रणा पोलीस दलात विकसीत करण्यात आली आहे. त्यामध्ये ऑनलाईन माहिती भरण्यात येत आहे. त्याचबरोबर पेपरलेस व अधिक पारदर्शक कारभार करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींना तक्रार देण्याकरिता पोलीस ठाण्यात जाण्यासाठी वेळ नाही किंवा त्यांना भिती वाटते याहून पलिकडे तक्रार देणे म्हणजे अतिशय वेळकाढू बाब असल्याने अनेक जण टाळतात. पोलीस ठाण्याची पायरी चढण्यासाठी भल्या भल्याची भंबेरी उडते. त्यांच्यासाठी तक्रार देने आता खूपच सोयीचे होणार आहे.
याला आता घाला, त्याला ठोका, याला बडवा असा पोलीस ठाण्यात गेल्या नंतरचा सामन्यांचा अनुभव, पोलीस दादांच्या बद्दल असलेली भीती यामुळे पोलिसींगला सर्वसामान्य लोक घाबरतात. त्यात उच्चशिक्षितही अपवाद नाही. या सर्व गोष्टीवर तोडगा म्हणून तक्रारदाराला या पोर्टल द्वारे तक्रार नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना गुन्ह्याबद्दल तक्रार नोंदविण्यासाठी आता पोलीस स्थानकात जाण्याची गरज नाही. घरातूनच अथवा इंटरनेट कॅफेच्या माध्यमातून नागरिक आपली तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकणार आहेत . महाराष्ट्रातील अनेक शहरात प्रायोगिक तत्त्वावर ई-तक्रार नोंदविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सिटीजन पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना हरवलेल्या मोबाईल फोन ची पोहोच, हरविलेल्या व्यक्तींचा तपशील, अनोळखी मृतदेहाचा तपशील, फरारी आरोपींचा तपशील, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्यांसाठी लागणारे अर्जाचे नमुने इत्यादी सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
त्याच प्रमाणे सिटीजन पोर्टल ई-तक्रार मॉड्यूल प्रायोगिक तत्वावर गुरुवार (दि.१६ जून २०१६ ) पासून पुणे ग्रामीण मध्ये सुरु करण्यात आली असून ३० जून २०१६ पर्यंत अमलात राहणार आहे.या दरम्यान प्राप्त झालेल्या सूचना - अभिप्राय यांचा मॉड्यूल मध्ये समावेश करून ही सुविधा संपूर्ण राज्यभर कार्यान्वित करण्यात येणार आहे. mhpolice.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जावून ई-तक्रार सुविधेचा वापर करणे शक्य झाले आहे.
मागील काही काळात पोलीस विभाग आता ऑनलाईन झाला आहे. सीसीटीएनएस प्रकल्प राबविणाऱ्या देशातील अग्रेसर राज्यांपैकी महाराष्ट्र हे राज्य आहे. १५ /०९/२०१५ पासून राज्यातील १०४६ पोलीस ठाणी व ६२७ पर्यवेक्षीय कार्यालये या प्रकल्पांतर्गत जोडली गेलेली आहेत.सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आज तागायत इंग्रजी व मराठी भाषांमध्ये सदर प्रकल्पाचे ऑनलाईन कामकाज चालू झाले असून पोलिस ठाण्यातील पोलिस डायरी हद्दपार झाली आहे. पुणे ग्रामीण मध्ये जवळपास सर्वत्र ऑनलाइन फिर्याद सुरू झाली आहे. राज्यभरात सुमारे १ कोटी ठाणे दैनंदिनी २.७९ लाख प्रथम खबरी अहवाल , ६.६६ लाख अदखलपात्र गुन्ह्यांच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सिटीजन पोर्टल ई-तक्रार सुविधा टायर करण्यात आली असून नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जाणार्या तक्रारदारांना तक्रार नोंदवायची असेल तर त्यांना पोलीस ठाण्यातसुध्दा येण्याची आवश्यकता नाही ते या पोर्टल द्वारे तक्रार देवू शकणार आहेत.
डॉ.जय जाधव (पोलीस अधीक्षक पुणे ग्रा.) |
नागरिकांनी ई-तक्रार सुविधा वापरावी : डॉ. जय जाधव
महाराष्ट्रात सध्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रायोगिक तत्वावर सिटीजन पोर्टल ई-तक्रार सुविधा (सीसीटीएनएस) सुरु करण्यात आली असून नागरिकांनी त्याचा वापर सुरु करावा. या माध्यमातून तक्रारदारांना तक्रार नोंदवायची असेल तर त्यांना पोलीस ठाण्यातसुध्दा येण्याची आवश्यकता नाही. तक्रार दारांच्या तक्रारींचे स्वरूप पाहून तत्काळ संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार संबंधित तक्रार दाराशी संपर्क करणार असून ई-मेल द्वारे त्यांना प्रतिसाद देणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी सांगितले. ई-काम्प्लेंट ही एफआयआर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून जिल्ह्यातून येणाऱ्या तक्रारींचा निपटारा कशा पद्धतीने करता येतो, काय सुधारणा गरजेच्या आहेत या बाबत सीसीटीएनएस व सीआयडी यांना अहवाल देण्यात येणार असून त्यानंतर राज्यभर ही सुविधा सुरु होणार असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. जाधव यांनी सांगितले.
-------------
अविनाश दुधवडे,चाकण मो. ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा