ठेकेदाराच्या खून प्रकरणी लातूर मधून एकास अटक
कुरुळीतील ठेकेदाराच्या खून प्रकरणी लातूर मधून एकास अटक
घटनेनंतर केला होता आरोपीने पोबारा ;
तांत्रिक मदतीच्या आधारे खुनाचा उलगडा
चाकण : अविनाश दुधवडे
दस्तगीर उर्फ सलमान शेख |
कुरुळी (ता.खेड, जि.पुणे) येथे चाकण औद्योगिक वसाहतीत कंत्राटी कामगार पुरविण्याचा ठेका चालविणाऱ्या मारुती गंगाराम कार्लेकर (वय ३२,सध्या रा. निघोजे, ता.खेड, जि.पुणे मूळ रा. नांदेड ) याचा सुमारे आठ दिवसांपूर्वी (दि.18 जून ) कुरुळी (ता. खेड) येथील खंडोबा मंदिराजवळ डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सारख्या तांत्रिक बाबींचा आधार घेत खून करून निघोजे (ता.खेड) गावातून लातूर या आपल्या मूळ गावी पळून गेलेल्या आरोपीला जेरबंद केले आहे.
दस्तगीर उर्फ सलमान शहाबुद्दीन शेख (वय २२ सध्या रा. निघोजे ,ता.खेड, मूळ रा. महापूर लातूर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दारू पिऊन झालेल्या वादातून दस्तगीर उर्फ सलमान याने मारुती कार्लेकर याला जबर मारहाण करून व डोक्यात दगड घालून ठार मारल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी (दि.१८) रात्री आठ वाजनेचे मारुती कार्लेकर पत्नी लक्ष्मी हिला रात्री दहा वाजेपर्यंत घरी परततो असे सांगून घरातून बाहेर पडला मात्र तो घरी परतलाच नाही. लक्ष्मीने अनेकदा त्याला मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन बंद असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१९ जून ) ओळखीच्या एका इसमाने मारुती कार्लेकर याचा खून झाल्याचे लक्ष्मी हिला कळविल्यानंतर कुरुळी (ता. खेड) येथील खंडोबा मंदिराजवळ घटनास्थळी जाऊन खात्री केले असता डोक्यात दगड घालून त्याचा अज्ञाताने खून केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता डोक्याला गंभीर इजा असलेला मृतदेह कुरुळीतील खंडोबामंदिराजवळील रस्त्यालगत पडलेला मिळून आला. मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला मोठा दगडही पोलिसांना मिळून आला होता. या प्रकरणी लक्ष्मी मारुती कार्लेकर (वय २५) हिच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या खुनाच्या तपासाला सुरुवात केली होती. संबंधित परिसरातील कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यानंतर तांत्रिक मदतीच्या आधारे संशयित असलेल्या दस्तगीर उर्फ सलमान याचा पोलिसांनी शोध घेतला असता. तो चाकण एमआयडीसी मधील एम प्लस कंपनीत कामास होता. मात्र गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला लातूर येथून चाकण पोलिसांनी जेरबंद केले.
किरकोळ वादातून हत्या :
दस्तगीर उर्फ सलमान आणि मारुती कार्लेकर यांची घटनेच्या आधी दहा ते पंधरा दिवसांपूर्वी ओळख झाली होती. दोघांनाही मद्यपान करण्याची सवय होती. शनिवारी (दि.१८) सायंकाळी दोघांनीही मद्यपान केले. त्यानंतर घरी परतत असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात कुरुळी (ता. खेड) येथे वाद झाला. आणि दस्तगीर याने मारुती याच्या गुप्तांगावर लाथ मारली. त्यानंतर खाली पडलेल्या मारुती याच्या डोक्यात दगड घातला व तो निघून गेला. सकाळी नशा उतरल्यावर पुन्हा मारुती घरी गेला कि नाही हे पाहण्यासाठी तो घटनास्थळी आला असता मारुती मयत होऊन जागेवरच पडलेला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने निघोजे (ता. खेड) येथील घरी जाऊन आपल्या आई सह थेट आपल्या मूळगावी लातूरला पोबारा केला. मात्र . पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक निरीक्षक महेश ढवाण , उपनिरीक्षक महेश मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक मदतीचा आधार घेत काही कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दस्तगीर उर्फ सलमान याचा शोध घेवून त्याला लातूर मधून जेरबंद केले असून मद्यपान केल्याच्या नशेत आपणच हा खून केल्याचे दस्तगीर उर्फ सलमान याने पोलिसांना सांगितले आहे.
---------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा