चाकणची यात्रा यंदाही बैलगाडा शर्यती, आखाड्याशिवाय
चाकणची यात्रा यंदाही बैलगाडा शर्यती, आखाड्याशिवाय
पालखी, छबीना ,मिरवणूक, लोकनाट्य कार्यक्रमांचे आयोजन
चाकण :
चाकण येथे बुधवारी (दि. १४) श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त भैरवनाथांचा अभिषेक, ग्रामसजावट, पालखी मिरवणुक व करमणुकीचे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत मात्र यंदाही सर्वांचे आकर्षण असणाऱ्या बैलगाडा शर्यती, आखाड्याशिवायच हि यात्रा संपन्न होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही चाकण येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत श्रींची पूजा, देवाचा अभिषेक, हारतुरे, मांडवडहाळे व ग्रामसजावट करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ नंतर भैरवनाथ महाराजांची पालखी, छबीना मिरवणूक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, मनोरंजनासाठी चिंचोली (ता.जुन्नर) येथील संगीतरत्न निसारभाई पटेल यांचा ताफ़्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. रात्री दहानंतर येथील मार्केट यार्डच्या आवारात कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
मागील वर्षीही येथील यात्रेत बैलगाडा शर्यती व कुस्त्यांचा आखाडा होऊ शकला नव्हता . त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर यंदा चाकणकर नागरिक गाडामालक व बैलगाडा शौकीन यांची मागणी लक्षात घेऊन यंदा चाकण (ता.खेड) येथे तीन लाख रुपये खर्च करून नवीन घाट तयार करण्यात आला होता . त्यामुळे यात्रा यावेळी लक्षवेधी ठरणार असल्याची सर्वांनाच अपेक्षा होती मात्र त्याच वेळी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयाने सर्वांच्याच अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
--------------
अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा